मुंबईत होणार पहिला ताडोबा फेस्टिव्हल

tadoba
मुंबई : राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढलेली असून गेल्या काही महिन्यांपासून व्याघ्र प्रकल्पांना जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी आणि तेथील पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून व्याघ्र प्रकल्पांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी एमआयडीसीच्या मदतीने एप्रिलच्या दुस-या आठवड्यात मुंबईत पहिला ताडोबा फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार म्हणाले, एमटीडीसी राज्यात कालिदास फेस्टिव्हल, अजंता फेस्टिव्हल, काळा घोडा फेस्टिव्हल असे आठ फेस्टिव्हल आयोजित करते. राज्यात एकूण सहा व्याघ्रप्रकल्प असून मेळघाट, पेंच व ताडोबा-अंधारी व्हेरी गुड वर्ग मिळाला असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला गुड वर्ग मिळाला आहे. तेथे पर्यटन सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पांची माहिती जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहोचवावी आणि तेथे पर्यटकांची संख्या वाढवावी यासाठी ताडोबा फेस्टिव्हल घ्यावा, अशी सूचना एमटीडीसीला केली. एमटीडीसीलाही ही कल्पना आवडली आणि त्याबाबतची योजना तयार केली जात आहे.

एप्रिलच्या दुस-या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हल आयोजित केला जाणार आहे. ताडोबा फेस्टिव्हलबद्दल माहिती देताना वनमंत्री म्हणाले, हा फेस्टिव्हल गेट वे ऑफ इंडिया येथे घेतला जाणार असून या ठिकाणी टूर ऑपरेटर, हॉटेल व्यावसायिक, पर्यटनावर लिहिणारे लेखक, ब्लॉगर्स आणि देशाच्या विविध भागातील वन्यजीव संरक्षक या ठिकाणी येऊन पर्यटकांना माहिती देणार आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या विभागातील कारागीर आपली कलाही या ठिकाणी सादर करणार आहोत.

Leave a Comment