भारताचा बांगलादेशसोबत ऊर्जा करार

bangladesh
नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये १.६ अब्ज डॉलर्सच्या कंत्राटाला भारतीय सरकारी कंपनीने सहमती दिल्यामुळे चीनला भारताकडून आणखी एक झटका बसला आहे. अनेक वर्षांच्या चर्चेनंतर भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (भेल) दक्षिण बांगला देशच्या खुलनामध्ये १३२० मेगावॅट औष्णिक ऊर्जा केंद्र स्थापन करण्यासाठी २८ फेबुवारीला करारावर स्वाक्ष-या करणार असल्याची पुष्टी दोन्ही देशांच्या अधिका-यांनी दिली. चीनची हार्बिन इलेक्ट्रीक इंटरनॅशनल कंपनी लिमिटेडचे इराण, तुर्कस्तान आणि इंडोनेशिया समवेत अनेक देशांमध्ये ऊर्जा प्रकल्प आहेत. चिनी कंपनीला तांत्रिक आधारावर बांगला देशातील ऊर्जा प्रकल्पाची अनुमती मिळाली नसल्याचे समजते.

भेलने सर्वात कमी बोली लावली होती असे बांगला देश-भारत पेंडशिप पॉवर कंपनी लिमिटेडचे प्रवक्ते अनवरुल अजिम यांनी सांगितले. भारतीय सरकारला विदेशात प्रकल्पासाठी कर्ज उपलब्ध करविणा-या अ‍ॅक्झिम बँकेने या प्रकल्पासाठी मदत केली. बँक या प्रकल्पासाठीचा ७० टक्के खर्च कमी व्याजदरावर उपलब्ध करणार आहे. भारतीय ऊर्जा कंपनीचा हा विदेशातील सर्वात मोठा प्रकल्प असेल. याआधी भारताने रवांडामध्ये एक ऊर्जाप्रकल्प उभारला आहे. आणि श्रीलंकेत तयारी सुरू आहे. बांगला देशात प्रकल्प मिळविण्यासाठी प्रयत्नशील चिनी कंपनीने आतापर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Comment