दुष्काळ आणि साधेपणा

drought
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कोकणातील नारायण राणे यांचे कट्टर विरोधी मानले जाणारे आ. भास्कर जाधव यांनी आपल्या मुलीचा विवाह मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये मोठ्या थाटात पार पाडला. या विवाहाच्या निमित्ताने या हॉटेलाला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते आणि राजेशाही थाटाची सारी व्यवस्था होती. अशा प्रकारचे नेत्यांच्या घरचे कार्यक्रम पाहिल्यानंतर माध्यमांत त्यांच्यावर टीका केली जाते. राज्यात दुष्काळ पडला असतानाही त्याची चिंता न करता पुढारी मंडळी पैशाची उधळपट्टी करत असे समारंभ साजरे करतात. हे त्यांना शोभत नाही. असे माध्यमांचे म्हणणे असते. अशाप्रकारची पैशाची उधळपट्टी करण्यातून त्यांची असंवेदनशीलता प्रकट होते. असे माध्यमातील काही मंडळींचे म्हणणे असते. त्यामध्ये बरेच तथ्य आहे. कारण कालच या संबंधात मनाला अस्वस्थ करणारी बातमी आली आहे. बीड जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या २५ मुलींनी दुष्काळामुळे आपले विवाह पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. एका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलींचे विवाहच होऊ शकत नाहीत मात्र दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांचे नेते म्हणवणारे आमदार लग्नावर उधळपट्टी करत आहेत.

भास्कर जाधव यांची अशा प्रकारची संपत्तीचे प्रदर्शन करण्याची पहिलीच वेळ नाही. या पूर्वी त्यांनी २०१३ साली चिपळूण येथे आपल्या मुलीचा विवाह असाच थाटामाटाने केला होता. तेथेही अशीच पैशाची उधळपट्टी झाली होती. त्याहीवेळा अशीच चर्चा झाली होती. भास्कर जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार यांनी आपल्या आमदाराच्या वर्तनावर मोठ्या कठोर शब्दात नापसंती व्यक्त केली होती. अशा प्रकारची संपत्तीची उधळपट्टी करून तिचे प्रदर्शन करणार्‍यांना सार्वजनिक जीवनात कसलेच स्थान नसते. अशी टिप्पणीही पवार यांनी केली होती. भास्कर जाधव यांच्या या विवाह समारंभाची बातमी ऐकली तेव्हा आपण रात्रभर झोपू शकलो नाही असेही पवार म्हणाले. एवढेच नव्हे तर आपण असा प्रकार कधी करणार नाही. अशी कबुलीही त्यांनी जाधव यांच्याकडून घेतली होती. मात्र गंमतीचा भाग असा की या सार्‍या घटना घडून महिनाही झाला नाही तोच पवारांनी भास्कर जाधव यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रदेशअध्यक्ष म्हणून घोषित केले होते. पुढे काही कारणांनी त्यांचे हे पद गेले आणि पवारांसमोर दिलेली कबुली जाधव विसरून गेले. त्यांनी आपल्या मुलाचा विवाह पुन्हा एकदा भरपूर थाटामाटात पार पाडला. या सगळ्या घटना पाहिल्या म्हणजे आपले राजकारण कसे दिखावू झाले आहे याचा अनुभव येतो.

अशा प्रकारचे थाटामाटातले विवाह केवळ भास्कर जाधव यांनीच पार पाडले आहेत असे नाही. सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कधीतरी असे प्रकार केलेले आहेत. मग त्यांचे असे थाटामाटातले विवाह पार पडले तेव्हा नेमका दुष्काळ होताच असे काही म्हणता येत नाही. परंतु दुष्काळ पडला असल्यास नेत्यांनी उधळपट्टी करून पैशाचे प्रदर्शन करू नये. असा संकेत मानायला काही हरकत नाही. हा विषय केवळ विवाहापुरता मर्यादित नाही. एकंदरीतच या देशातल्या नेतेमंडळींनी कशा प्रकारचे जीवन जगावे असा हा व्यापक विषय आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा उल्लेख सुटबुटकी सरकार असा करण्यामागे असाच व्यापक विषय लपलेला आहे. आपल्या देशातले करोडो लोक दोन वेळा जेवायला मोताद असताना नरेंद्र मोदी भारीचा कोट परिधान करतात यामागे त्यांची संवेदनहीनता दिसते असे सूचित करणे हा राहुल गांधींचा हेतू असतो. आता हा सारा प्रकार मान्य करायचा झाला तर एकंदरच राजकीय कार्यकर्त्यांसाठी एक आचारसंहिता जारी करावी लागेल. या देशात दरवर्षी कोठे ना कोठे तरी दुष्काळ असतोच. मग देशाच्या पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसारखे कपडे घालावेत असे म्हणता येईल का या गोष्टीचा विचार झाला पाहिजे.

मात्र असा विचार करताना खूप गोष्टी समोर येतील. मुळात आपल्या देशातल्या लोकांची अशी अवस्था का झाली? ज्या कॉंग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले त्या कॉंग्रेसने जनतेच्या या दुरवस्थेमागच्या कारणांचा जाब देण्याऐवजी आता नरेंद्र मोदींनी विजार आणि नेहरु शर्टच घातला पाहिजे असे म्हणावे हा त्यांचा ढोंगीपणा होतो. शिवाय आज राहुल गांधी विरोधात आहेत म्हणून मोदींना उपदेश करत आहेत. परंतु कधी ना कधी त्यांचे पिताजी, आजी, पणजोबा हेही सत्तेवर होते आणि त्यांच्याही काळात याही पेक्षा भीषण दुष्काळ पडले होते. मग त्या काळामध्ये राहुल गांधींच्या वाडवडिलांची राहणी साधी होती का? याचे उत्तर राहुल गांधींसाठी फार अडचणीचे ठरेल. किंबहुना आज राहुल गांधी मोदींना किती उपदेश करत असले तरी आणि मोदींच्या तुलनेत स्वतः साधे कपडे घालत असले तरी हेच राहुल गांधी देशात दुष्काळ पडला असताना थंड हवा खाण्यासाठी आणि मेडिटेशन करण्यासाठी परदेशात कसे काय जाऊ शकतात? अर्थात त्यांना हा प्रश्‍न कोणी विचारणार नाही कारण अशा प्रश्‍नांची उत्तरे सर्वांसाठीच गैरसोयीची असतात. एकूणात काय तर देशातली परिस्थिती वाईट आहे तिची जाणीव सर्वांनी ठेवावी.

Leave a Comment