मोबाईल १०० टक्के चार्ज होणार फक्त १५ मिनिटांत

oppo
बार्सिलोना : स्मार्टफोन वापरणाऱ्यांना सध्या एक चिंता फार सतावत आहे ती म्हणजे त्यांच्या मोबाईलची लवकर संपणारी बॅटरी. पण त्यावर मात करण्यासाठी पर्याय म्हणून काही बॅटरी बँकही बाजारात दाखल झाल्या आहेत. आपल्या फोनसोबतच प्रत्येक स्मार्टफोनधारक हल्ली बॅटरी बँक किंवा पॉवर बॅकअप घेऊनच घराबाहेर पडतो.

अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी लवकर संपणाऱ्या बॅटरीवर उपाय म्हणून अलीकडेच लवकर चार्ज होणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मितीही सुरू केली आहे. बॅटरी रिचार्ज होण्याच्या वेळात या टब्रो चार्जिंग तंत्रज्ञानामुळे कमालीची घट झाली आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी स्मार्ट चार्जिंगसाठी आपापला स्मार्टफोन सज्ज केल्यानंतर आता ओप्पो या चीनी मोबाईल कंपनीनेही नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ओप्पोच्या दाव्यानुसार, त्यांनी फक्त १५ मिनिटात १०० टक्के चार्ज होणारी बॅटरी विकसित केली आहे. तसेच फक्त पाच मिनिटाचे चार्जिंग तुमच्या स्मार्टफोनला १० तासांपर्यंतचा टॉकटाईम उपलब्ध करून देऊ शकेल, असाही दावा ओप्पोने केला आहे.

ओप्पोने या नव्या चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा बार्सिलोनामध्ये भरलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये केली आहे. ओप्पोने शून्य ते 100 टक्क्यांपर्यंत पूर्ण बॅटरी चार्ज करण्यासाठी फक्त १५ मिनिटांचा अवधी लागणार तंत्रज्ञान बार्सिलोनामधील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्येच जगजाहीर केले आहे. या तंत्रज्ञानाचे ओप्पोने ‘सुपर व्हीओओसी’ असे नाव ठेवले आहे. या क्विक चार्जिंग टेक्नॉलॉजीने २५००mAh क्षमतेची बॅटरी फक्त १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होते. तसेच हे तंत्रज्ञान परंपरागत मायक्रो यूएसबी आणि सीटाईप यूएसबीमधून वापरता येणार आहे.

विकसित केलेले हे तंत्रज्ञान लो व्होल्टेज अल्गोरिदम वापरते असा दावा ओप्पोकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अतिशय कमीतकमी उर्जा वापरूनही बॅटरी पूर्ण चार्ज होते, तीही कमीतकमी वेळात. अवघ्या पाच मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १० तासांपर्यंतचा टॉकटाईम या तंत्रज्ञानामुळे शक्य असल्याचा ओप्पोचा दावा आहे.