मातीच्या गणेशमूर्ती कलाकारांना अनुदान मिळणार

anesh
मुंबई – गणेशोत्सव प्रत्यक्षात अजून दूर असला तरी आत्तापासूनच गणेशमूर्ती कलाकार मूर्ती बनविण्याच्या कामात गुंतले आहेत. यंदा प्रथमच पर्यावरण पुरक गणेश मूर्ती तयार करणार्‍या मूर्तीकारांना अनुदान देण्याची योजना महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे समजते. पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे यनी या संदर्भात माहिती दिली.

प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा प्लॅस्टीकपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रमाण राज्यात मोठे आहे. त्याचबरोबर मूर्तींसाठी वापरले जाणारे रंगही अनेकदा घातक असतात व या सार्‍याचा परिणाम मूर्ती पाण्यात विसर्जन केल्यानंतर जलप्रदूषणात होतो. त्यामुळे राज्यात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती संदर्भात जागृती केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. मातीपासून व हानीकारक रंगांचा वापर न करता पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जाव्यात यासाठी मूर्तीकारांना अनुदान द्यावे असा सरकारचा विचार आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात बुडत नाहीत तसेच हानीकारक रंगांमुळे पाणी प्रदूषण होऊन जलचरांना हानी पोहोचते. शाडू पासून मूर्ती बनविण्याचा खर्च अधिक असतो व त्यामुळे त्या महाग पडतात. या मूर्ती ग्राहकांना परवडणार्‍या किंमतीत मिळाव्यात व मूर्तीकारांचे नुकसानही होऊ नये यासाठी अनुदान उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment