पहाटे पाच ते रात्री ११ पर्यंत केव्हाही करा खरेदी

general-stores
मुंबई – राज्य सरकारने रोजगाराच्या जास्तीतजास्त संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जाहीर केलेल्या किरकोळ व्यापार (रिटेल) धोरणाची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार असून २४ तास दुकाने उघडी ठेवण्याची मुभा व्यापाऱ्यांना मिळणार आहे. विक्रीकरिता प्रत्यक्षात पहाटे पाच ते रात्रौ ११ पर्यंत तर मध्यरात्री विक्रीऐवजी सामानाची हाताळणी किंवा वाहतुकीकरिता दुकाने उघडी ठेवता येतील.

पहाटे पाच ते रात्रौ ११ पर्यंत किरकोळ क्षेत्रातील दुकाने विक्रीकरिता उघडी ठेवता येतील. मध्यरात्री ११ ते पहाटे पाचपर्यंत दुकाने उघडी ठेवता येतील, पण त्या काळात मालाची हाताळणी, वाहतूक किंवा अन्य प्रक्रिया करता येऊ शकेल. रात्रौ १० पर्यंतच दुकानांमध्ये महिलांना काम करता येऊ शकेल. दुकाने वर्षभर उघडी ठेवण्याची मुभा मिळणार आहे. नव्या धोरणात आठवडय़ातून एक दिवस दुकान बंद ठेवणे व वेळेची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. राज्य शासनाने या धोरणाची घोषणा ‘मेक इन इंडिया’ परिषदेत केली असून त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी हा राज्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून, या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री या धोरणाच्या अंमलबजावणीकरिता बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment