राहुल गांधी खरेच देशभक्त

rahul-gandhi
राहुल गांधी यांनी आपल्या रक्तात देशभक्ती असल्याचे म्हटले आहे. आता त्यांच्या राजकारणाने एवढा विचित्र मोड घेतला आहे की त्यांना आपण राष्ट्रभक्त असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगावेे लागत आहे. ज्यांनी एकेकाळी देशाचा पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहिली त्यांच्यावर अशी पाळी यावी ही मोठीच विचित्र गोष्ट आहे. आज राजस्थानातल्या एका भाजपा खासदाराने तर राहुल गांधी यांना राष्ट्रद्रोह्यांना पाठींबा दिल्याबद्दल गोळ्या घालाव्यात असे मोठे भडक विधान केले आहे. हे विधान अविचाराने केलेले आहे. त्यात राजकारण आहे. त्यामुळे आपण त्याकडे काही क्षण दुर्लक्ष करू शकतो पण गेल्या काही दिवसांत राहुल गांधी यांच्या कामाची दिशा किती चुकली आहे याचे हे द्योतक आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. हैदराबाद विद्यापीठापासून ते कालच्या जेएनयुतील घटनेपर्यंत राहुल गांधी ज्या भूमिका घेत आले आहेत त्या पाहिल्या म्हणजे त्यांना आपण राष्ट्रप्रेमी आहोत हे का सांगावे लागत आहे याची कल्पना येते.

या सगळ्या घटनांत त्यांनी केवळ नरेन्द्र मोदी यांना आणि त्यांच्या सरकारला मध्यवर्ती ठेवले आहे. ज्या घटनेने मोदी सरकारवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही तरी दोष ठेवता येतो तिथे ते धावून गेले आहेत. अर्थात ते विरोधी पक्षाचे कामच असते. पण सरकारच्या विरोधात अशी हालचाल करताना त्यांनी काही तारतम्य ठेवायला हवे होते. त्यांची ही जमेल तिकडे धावून जाण्याची घाई अरविंद केजरीवाल यांच्या सवंग राजकारणाप्रमाणे ठरली आहे. केजरीवाल आणि राहुल गांधी या दोघांनाही मोदी द्वेषाचा विंचू चावला आहे. त्यामुळे ते अशी धावाधाव करायला लागले आहेत. पण केवळ मोदी विरोध हा मुद्दा धरून अशी दिशाहीन धावपळ करताना आपण नकळतपणे नेमका कोणाला पाठींबा देत आहोत आणि त्यातून नेमके आपलेच दोष उघड होत नाहीत ना याचे भान त्यांना ठेवता येत नाही. हैदराबादेत रोहीत विमुला यांच्या आत्महत्येचे प्रकरण तापताच राहुल गांधी तिकडे धावले आणि त्यांनी सरकारवर टीका केली. विमुला हा याकुब मेमनचा समर्थक होता आणि घराघरात याकुब मेमन जन्माला यावेत अशी त्याची प्रार्थना होती. पण ते विसरून राहुल गांधी तिकडे धावले. देशात आता मोदींच्या विरोधात मोठी नाराजी आहे आणि आपण हैदराबादला गेलो की ही नाराजी आपल्या मागे उभी राहणार आहे अशी काहीशी राहुल गांधी यांची अटकळ होती.

रोहीत विमुला हा दलित समाजातला होता की नाही हे शेवटपर्यंत कळले नाही पण मोदींच्या विरोधात सतत काही तरी बवाल उभा करण्यास टपलेल्यांनी तसे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्याला दलित समाजात आपोआपच सहानुभूती मिळेल अशीही राहुल गांधी यांची अपेक्षा आहे. त्यामुळे ते हैदराबादला धावले आणि त्यांनी तिथे जाऊन मोदींच्या विरोेधात काही विधाने केली पण आपण या राजकारणात याकूब मेमन याच्या समर्थकांच्या बाजूला उभे रहात आहोत आणि आपल्या देशभक्तीच्या बाबतीत आपल्याच हाताने प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत आहोत याचे त्यांना भान राहिले नाही. विमुला हा याकूब मेमनचा समर्थक होता आणि याच मेमनने मुंबईत बॉँबस्फोट घडवून २५० पेक्षाही अधिक लोकांचे प्राण घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा माणसाचे समर्थन करणार्‍या रोहीत विमुलाला पाठींबा दाखवून राहुल गांधी यांनी दलित समाजाचा किती पाठींबा मिळाला हा प्रश्‍नच आहे पण त्यांनी स्वत:ची देशभक्ती किती तकलादू आहे हे मात्र दाखवून दिले. या सगळ्या प्रकारात याकूब मेमनची फाशी योग्यच होती असे काही त्यांनी ठामपणे म्हटले नाही कारण तसे सांगायला गेलो तर विमुलाचे समर्थक आपल्यावर नाराज होतील अशी भीती त्यांना वाटली.

अशा या मतांच्या राजकारणात राहुल गांधी यांनी आपली देशभक्ती लपवून ठेवली. तोच प्रकार त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केला. तिथेही मतांचे आणि मोदी विरोधाचे राजकारण केले. हैदराबादेत त्यांनी याकूब मेमनला नकळतपणे समर्थन दिले आणि दिल्लीत त्यांनी अफझल गुरूला समर्थन दिले. ज्यांनी कोणी अफझल गुरूच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या त्यांनी त्या द्यायला नको होत्या असे त्यांनी चुकूनही म्हटले नाही. मतांची लाचारी त्यांना महत्त्वाची वाटली. यातली सर्वात मोठी विसंगती अशी की, या दोन विद्यापीठांत अफझल गुरू आणि याकूब मेमन या दोघांच्या फाशीच्या निमित्ताने राजकारण झाले तिथे राहुल गांधी यांनी परिपक्वतेचा अभाव दाखवून दिला आणि ते या दोन देशद्रोह्यांच्या समर्थकांच्या मागे फरपटत गेले. या दोन्ही प्रकारांत मोदींच्या विरोधात नाराजी निर्माण होण्याचे काही कारण नव्हते कारण त्यांना मोदींनी फाशी दिलेली नाही. या दोघांनाही केन्द्रातल्या मनमोहनसिंग यांच्या सरकारने फाशी दिलेली आहे. या दोघांच्या फाशीला राहुल गांधी यांचा पाठींबा होता. या फाशीच्या शिक्षांचा अंमल झाला तेव्हा फाशी देणे हीच देशभक्ती असल्याची कॉंग्रेस पक्षाची भावना होती पण आता मोदींच्या विराेधात वातावरण तापतेय असे दिसायला लागताच राहुल यांनी या फाशीला विरोध करणारांचे समर्थन केले. आता मात्र आपण राष्ट्रभक्त आहोत असे सांगावे लागत आहे. जिथे राष्ट्रभक्तीचा कस लागला तिथे मात्र त्यांनी मतांच्या राजकारणाला प्राधान्य दिले.

Leave a Comment