‘मेक इन इंडिया’ सप्ताहाची यशस्वी सांगता

Make-in-India
मुंबई: मेक इन इंडिया सप्ताहात १५ लाख २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी कटिबध्दता दर्शविण्यात आल्याची माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत यांनी दिली. मेक इन इंडिया सप्ताह समारोपाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईत आयोजित केलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाला अभूतपूर्व यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला. या सप्ताहाने उत्पादन, रचना आणि शोध यांना केंद्रस्थानी आणल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला या सप्ताहाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात तब्बल ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात यश मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचे वास्तव गुंतवणूकीत रुपांतर होण्याची खातरजमा करण्यासाठी राज्याच्या उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदल स्थापन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेक इन इंडिया सेंटर एक्स्पो आणि इतर कार्यक्रमांना ८ लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली. यामध्ये ४९ हजार ७३४ नोंदणीकृत प्रतिनिधी उपस्थित होते. मेगा एक्स्पोमध्ये १०२ देशांनी सहभाग घेतला. मेक इन इंडिया सप्ताहांतर्गत १५० कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विविध चर्चासत्रात २५ हजार जण सहभागी झाले. व्यापार आणि समाजाशी संलग्न मुद्दयांवर विविध मंत्री, मुख्यमंत्री, धोरणकर्ते, उद्योगपती, शिक्षणतज्ञ, आध्यात्मिक गुरु अशा सुमारे १ हजार २०० तज्ञांनी आपले विचार मांडले.

मेक इन इंडिया प्रदर्शनात ऑटोमोबाईल्स, अवकाश आणि संरक्षण, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स, बांधकाम यंत्रसामग्री, अन्नप्रक्रिया, पायाभूत क्षेत्रे, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक साहित्य आणि यंत्रसामग्री, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, औषधनिर्माण आणि वस्त्रोद्योग यासारख्या ११ क्षेत्रातील २१५ प्रदर्शकांनी आपली क्षमता आणि उपलब्ध संधीचेही दर्शन घडविले. मेक इन इंडिया सेंटरमध्ये भारतातील १७ राज्ये आणि जर्मनी, स्वीडन आणि पोलंड या तीन देशांची दालने होती.

मेक इन इंडिया सप्ताहाने व्यापार ते व्यापार, व्यापार ते सरकार आणि सरकार-सरकारमधल्या सुमारे ८ हजार २०० बैठकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. जर्मनीतल्या लघु आणि मध्यम उद्योगांनी भारतात उत्पादन केंद्र उभारावीत यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात आला. १९ कंपन्यानी त्यासाठी नोंदणी केली होती. मेक इन इंडिया सप्ताहात रचना, शोध आणि स्टार्ट अप्सवर प्रामुख्याने भर देण्यात आला असे अमिताभ कांत यांनी सांगितले. भारतातल्या स्टार्ट अपसाठी क्वालकॉमकडून दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
आयआयटी संघांनी आयोजित केलेल्या हॅकेथॉनमुळे अभियंते, प्रोगॅमर्सना मंच मिळाला. पाणी, ऊर्जा आणि वाहतूकीबाबत कल्पक उपाययोजना सुचविणाऱ्या दोन संघांना या सप्ताहात पारितोषिकाने गौरवण्यात आले.
याशिवाय मेक इन इंडिया सप्ताहात उदयोग-शैक्षणिक भागीदारी, उत्पादन क्षेत्रात रचनांची भूमिका, यासारखे उपक्रम देशांतर्गंत उत्पादन, डिजीटल इंडिया उपक्रम, स्मार्ट सिटीज्‌ आणि स्किल इंडिया उपक्रम, यांना केंद्रस्थानी ठेऊन चर्चासत्रही झाली.

जाहीर झालेली धोरणे
• इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन क्षेत्रातल्या शोध, संशोधन आणि विकासाला वित्तीय पाठबळ देण्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स विकास निधीचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडून अनावरण.
• जागतिक स्पर्धेला तोंड देण्याच्या दृष्टीने भांडवली वस्तू क्षेत्रासाठी इकोसिस्टिम निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण अवजड उदयोग मंत्री अनंत गीते यांच्याकडून जाहीर
• अन्न प्रक्रिया उद्योगातल्या गुंतवणूक संधी हरसिमरत कौर बादल यांच्याकडून विषद.
• देशातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या ३६० टोलनाक्यांसाठी ई टोल धोरण

महाराष्ट्राची विशेष धोरणे
महाराष्ट्र किरकोळ धोरण
एक खिडकी धोरण
महाराष्ट्र सागरी उदयोग धोरण
एफएबी उत्पादनासहित इलेक्ट्रॉनिक्स धोरण
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी विशेष पॅकेजेस.