डायलिसीसची गरज संपविणारी मायक्रोचीप तयार

chip
अमेरिकन संशोधकांनी किडनी फेल झाल्यावर डायलिसिसची गरज भासणार नाही अशी एक मायक्रोचीप बनविण्यात यश संपादन केले आहे. या चीपच्या चाचण्या माणसांवर लवकरच सुरू होत असून येत्या ३ ते चार वर्षात ती वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल असे समजते. टेनेसी मधील बँडरविल्ड विद्यापीठातील वैद्यकीय प्रोफेसर डॉ.विलीयम एस फिसेल व त्यांच्या टीमने ही चीप तयार केली आहे.

डॉ. फिसेल यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची टीम बायो हायब्रिड डिव्हायसेस तयार करते. त्यानुसार तयार करण्यात आलेली ही चीप सर्वसामान्य किडनीप्रमाणेच काम करेल व रूग्णाच्या हृदयाच्या उर्जेवर ती चालेल. त्यासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा आधार घेतला गेला आहे. ही चीप मीठ, पाणी फिल्टर करेल व त्यामुळे किडनी फेल झाली असली तरी डायलिसिसची गरज लागणार नाही. ही चीप अतिशय छोटी आहे व त्यामुळे ती किडनीमध्ये सहज ट्रान्सप्लांट करता येईल. तिच्या भोवतीने किडनीच्या पेशी फिट केल्या जातील. त्यामुळे ती नैसर्गिक पद्धतीनेच किडनीचे काम करेल. सिलीकन नॅनो टेक्नॉलॉजी असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे.

या चीपचे थ्री डी डिझाईन तयार आहे. ही चीप शरीराला अपायकारक अन्य घटकांपासूनही शरीराचे संरक्षण करेल व शिरांमधील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासही मदत करेल. यामुळे रक्तात गुठळी होण्याची शक्यताही कमी होईल. सुरवातीला या चीपची किंमत अधिक असेल मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यावर किंमती कमी होतील असेही त्यांनी सांगितले.