३५ टक्के पुणेकर बसून घालवतात वेळ

pune
पुणे – चालणे हा निरोगी आयुष्यासाठी उत्तम व्यायाम आहे. मात्र चालण्याबाबत ३५ टक्के पुणेकर आळशी असून ते बसून वेळ घालवतात, असे ‘मॅक्स बुपा वॉक फॉर हेल्थ’ तर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशा स्वरुपाचा करण्यात आलेला हा पहिलाच अभ्यास असून यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे आणि जयपूर या शहरातील १३०० हून अधिक चालणाऱ्यांची मते नोंदविण्यात आली.

नियमित चालण्यात पुणेकरांच्या सर्वांत मोठा अडथळा रोजचा उशिरापर्यंतचा प्रवास (२३ टक्के) हे ठरले आहे. इतर अडथळ्यात कार्यालयातील कामाचे अधिक तास (२० टक्के), प्रदूषण (१९ टक्के), चालण्यासाठी सोबत नसणे (१६ टक्के) व घरच्या व्यापात गर्क असणे (१३ टक्के) यांचा समावेश आहे. गंमत म्हणजे १३ टक्के प्रतिसाददात्यांनी चालण्यासारख्या सोप्या व्यायामापेक्षा आहार नियंत्रणाला (डाएटिंग) प्राधान्य दिले आहे. २४ टक्के पुरुषांनी कार्यालयातील कामाचे अधिक तास हा चालण्यातील सर्वांत मोठा अडथळा असल्याचे, तर २४ टक्के महिलांनी प्रदूषणाची वाढती पातळी हे न चालण्यामागील कारण असल्याचे बोलून दाखवले आहे.

आरोग्याचा आढावा घेता पुणेकर हे रक्तदाब (१५ टक्के), मधुमेह (१० टक्के) कोलेस्टेरॉल (१० टक्के), स्थूलता (१० टक्के), पाठीच्या समस्या (११ टक्के) व दुर्बळ नजर (१६ टक्के) अशा विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. जे ६५ टक्के पुणेकर चालण्याचा व्यायाम करतात त्यामागे स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा हेतू असतो. यातील ३८ टक्के प्रतिसाददात्यांना चालणे हे हृदयासाठी चांगले वाटते तर ३६ टक्के लोकांना ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याचे वाटते, २८ टक्के लोकांना ते फुप्फुसांसाठी चांगले वाटते, तर २० टक्के लोकांना नुसते सुखदायी वाटते.

लिंगनिहाय वर्गवारी केली असता ३९ टक्के महिलांना चालणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त वाटते. असे वाटणाऱ्या पुरुषांचे प्रमाण २९ टक्के आहे. ३० टक्के महिला तरुण राहण्यासाठी चालतात, तर ३० टक्के पुरुष उत्साही राहण्यासाठी चालतात. महिलांच्या चालण्यामागे सोईच्या दुकानात खरेदीस जाणे हे कारण असते (५८ टक्के) आणि ५२ टक्के पुरुष फोनवर बोलत चालतात. पुणे हे टेकनोसेव्ही शहर असल्याने ४५ टक्के प्रतिसाददाते चालताना विविध उपकरणांचा (गॅजेट्स) वापर करतात. त्यातही पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment