देऊळगावात उभारणार सीड हब

cm
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फलोत्पादनाला चालना देण्यासाठी आणि फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्याचा कृषि विभाग आणि पेप्सिको कंपनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे मोन्सेन्टो कंपनीतर्फे देशातील सर्वांत मोठे सिड हब उभारण्यात येणार असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. उद्योगमंत्री सुभाष देसाई व अमेरिकेचे भारतातील कौन्सुलेट जनरल टॉम वायडा या वेळी उपस्थित होते.

अमेरिकेतील ३० नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळाने मेक इन इंडिया सप्ताहाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. अमेरिकेचे कौन्सुलेट जनरल टॉम वायडा यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. महाराष्ट्रात फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला. या करारानुसार महाराष्ट्रातील संत्रा, मोसंबी फळांवर प्रक्रिया करून त्याचा रस बनविण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील संत्रा आणि मोसंबी फळउत्पादक शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र हे जागतिक दर्जाचे फ्रुट हब होण्यासाठी पेप्सिको इंडिया सहाय्य करेल. या प्रकल्पात सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावरील संत्रा व मोसंबी फळ पिकावर प्रक्रिया केली जाणार आहे. या सोबतच पेप्सिको आंबा, डाळिंब या फळांपासून रस बनवित असल्याने राज्यातील या फळउत्पादक शेतक-यांनाही फायदा होणार आहे. अमेरिकेतील मोन्सेटो कंपनीतर्फे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे देशातील सर्वांत मोठे सिड हब उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

Leave a Comment