विद्यापीठातले राजकारण

jnu
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या राजकारणाचा आता नवा अध्याय लिहिला जात आहे. आजवर या विद्यापीठाला डाव्या चळवळीचा अड्डा म्हटले जात होते. तिथल्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत या अड्ड्याचा प्रभाव दिसत असे. या निवडणुका स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा सरळ सरळ दोन गटांत होत असत. या दोन संघटनांच्या आडून कम्युनिष्ट आणि भारतीय जनता पार्टी आपला प्रभाव आजमावून पहात असत. फार करून डाव्या चळवळीतल्या स्टुडंटस् फेडरेशनचाच वरचष्मा दिसत असे पण अ.भा.विद्यार्थी परिषदेत फेडरेेशनला शह देण्याची मोठी ताकद होती. कधी कधी या राजकारणात कॉंग्रेसचाही शिरकाव होत असे. आता मात्र अ. भा. विद्यार्थी परिषद आणि अन्य सगळे असा सामना रंंगायला लागला आहे. नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून या राजकारणाला गती आली आहे कारण समाजवादी, कॉंग्रेस, जनता दल आणि साम्यवादी अशा सर्वांनाच मोदी इफेक्ट जाणचवायला लागला आहे. मोदींचे सारे विरोधक शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने विद्यार्थी परिषदेच्या विरोधात संघटित झाले आहेत.

या सार्‍या लोकांनी मोदी यांची बदनामी करण्याची संधी ज्या प्रकरणात सापडते त्या प्रकरणात मोदींचा नामोहरम करण्याची संधी पाहून एक व्हायला सुरूवात केली आहे. त्यातून अनेक विसंंगती निर्माण झाल्या आहेत आणि होत आहेत. राहूल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना तर काय करू आणि काय नको असे झाले आहे. जिथे मोदींना चार शिव्या हासडायची संधी मिळते तिथे हे दोघे एक होत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही अफजल गुरू प्रेमींनी हिंदुस्थान मुर्दाबादचे नारे लावले. कारण अफझल गुरू याला दिलेली फाशी चुकीची आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या नार्‍यांनी सरकार आणि संघ परिवार चिडला. त्यातून संघर्ष निर्माण झाला. तक्रारी झाल्या आणि मुर्दाबादवादी विद्यार्थी नेता अटकेत पडला. या कारवाईमुळे अफझलवादी विरुद्ध मोदी असा सामना होणार असे दिसायला लागले. तसे दिसताच राहुल गांधी यांनी या विद्यापीठात धाव घेतली आणि तिथे येऊन आपली मोदी विरोधी मळमळ व्यक्त केली. ते या घटनेकडे मोदी विरोधाची संधी म्हणून पहात असल्याने तिथे धाव घेणे हे आपलेही कर्तव्य आहे असे वाटून केजरीवालही तिकडे धावले. खरे तर सियाचेन भागात भारताच्या हणमंतप्पाने हौतात्म्य पत्करले. सारा देश हळहळलाच पण देशाने या वीर जवानाला आदरयुक्त श्रद्धांजली वाहिली.

मोदी विरोधाची हौस भागायची संधी दिसताच तिकडे तत्परतेने धाव घेणारी राहुल आणि केजरीवाल ही पोरकट राजकारणी जोडी हणमंतप्पाला साधी बघायलाही गेली नाही. हणमंतप्पावर तर दिल्लीतच उपचार सुरू होते. राहुल आणि केजरीवाल यांना हैदराबादकडे धाव घ्यायला सवड आहे. दिल्लीतल्या विद्यापीठात धाव घेऊन देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठींबा द्यायला सवड आहे पण देशासाठी बलीदान करणार्‍या हणमंतप्पासाठी त्यांंना सवड नाही. यावरून या दोघांच्या राजकारणाचा दर्जा लक्षात येतो. अफझल गुरूला फाशी दिल्याचा निषेध करणार्‍या देशद्रोही लोकांना त्यांनी पाठींबा दिला. या ठिकाणी सर्वांनाच एका गोष्टीचा विसर पडला आहे की, अफझल गुरूला मोदींच्या सरकारने फाशी दिलेली नाही तर राहुल गांधी यांच्याच सरकारने फाशी दिली आहे. ती देताना युपीए सरकारचे गृहमंत्री सुशीलकुमार यांनी मोठा राष्ट्रप्रेमी असल्याचा आव आणला होता. अफजल गुरूला फाशी देणार्‍या या सरकारचे नेते फाशी दिल्यानंतर छाती काढून फिरले पण आता हेच राहुल गांधी अफझल गुरूच्या फाशीचा निषेध करणारांना पाठींबा देत आहेत.

आपण नकळतपणे आपलाच निषेध करणारांचे समर्थन करीत आहोत याचे राहुल गांधी यांना भान नाही. आणि ज्ञान तर नाहीच नाही. गंमतीचा भाग असा की, गुरूला फाशी दिल्यानंतर या विद्यापीठात निषेधाचा एकही आवाज उठला नव्हता. अफजलच्या फाशीला वर्ष झाले तेव्हाही या विद्यापीठात हुं की चुं झाले नाही. पण त्याला दोन वर्षे झाल्यानंतरच या विद्यापीठात हे सारे प्रकार का घडले. विद्यापीठातल्या या कार्यकर्त्यांना अफझल गुरूशी काही देणे घेणे नव्हते आणि नाही. त्यांना आता मोदींना बदनाम करण्यासाठी काही तरी निमित्तच हवे होते ते त्यांना अफझलच्या स्वरूपात मिळाले. त्यावर ज्यांना ज्यांना मोदी पंतप्रधान झाल्यापासून ठसका लागला आहे ते सारे डावे, मध्यम डावे आणि अतिडावे असे सारे अफझलच्या बहाण्याने एकत्र आले आहेत. त्यांची मोदी विरोधी पोटदुखी समजू शकतो पण ती प्रकट करण्यासाठी आपण एक देशद्रोह्याला देव करायला निघालो आहोत याचे या लोकांना भान नाही. कारण त्यांची मोदी विरोधी पोटदुखी केवळ पोटापुरती राहिलेली नाही तर ती त्यांच्या डोक्यातही शिरली आहे. याच डोके दुखीचा एक भाग म्हणून शरद पवार यांच्यासह सार्‍या वेड्यांनी याकूब मेमन, इशरत जहॉ आणि अफझल गुरू यांना आपले दैवत मानायला सुरूवात केली आहे. मुस्लिमांची मते मिळावीत म्हणून करीत असलेल्या त्यांच्या नवसाला ही तीन दैवते पावतील असे त्यांना वाटत आहे. मतांच्या लाचारीने किती अध:पतन होऊ शकते हे दिसत आहे.

Leave a Comment