नव्या ‘इस्ट इंडिया कंपनी’ला आमंत्रण नको: प्रभुदेसाई

prabhudesai
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारी ‘मेक इन इंडिया’ ही योजना उत्तम असली तरीही त्याबरोबर भारतीय उद्योगांना बळ देणे गरजेचे आहे. अन्यथा ही योजना म्हणजे नव्या ‘इस्ट इंडिया कंपनी’ला आमंत्रण ठरेल; असा इशारा ‘पितांबरी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स’चे कार्यकारी संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी ‘माझा पेपर’शी बोलताना दिला.

‘मेक इन इंडिया’च्या प्रसारासाठी मुंबई येथे मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जात असताना आणि त्याच्या आयोजनात महाराष्ट्राने पुढाकार घेतला असताना स्वत: आघाडीचे उद्योजक असलेल्या प्रभुदेसाई यांनी दिलेला हा सूचक इशारा उल्लेखनीय आहे.
केवळ विदेशी कंपन्या आणि विदेशी गुंतवणुकीतून स्थिर स्वरूपाचा विकास साधणार नाही. त्यासाठी भारतीय उद्योगांना आणि नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारकडून आश्वासक पावले पडताना दिसत नाहीत; अशी खंत प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली. मात्र याबाबतीत केवळ सरकारवर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यासाठी प्रस्थापित उद्योगांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे; असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मराठी युवक आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये अद्याप धोका पत्करून उद्योगात पदार्पण करण्याऐवजी नोकरी करून दरमहा ठराविक उत्पन्न मिळविण्याची मानसिकता दिसून येते. मात्र कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी उद्योगांचे मोठे महत्व आहे. त्यासाठी मराठी युवकांनी उद्योजक बनणे आवश्यक आहे; असे मत व्यक्त करून; मराठी युवकांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी यशस्वी उद्योजकांच्या सहभागातून स्थिर स्वरूपाची आणि व्यापक उद्दिष्ट नजरेसमोर असलेली संस्था उभारण्यात येईल; असेही प्रभुदेसाई यांनी जाहीर केले.

या संस्थेच्या माध्यमातून युवा उद्योजकांना उद्योजकतेसाठी आवश्यक प्रशिक्षण देणे, उत्पादने, त्याचे मार्केटींग, बाजारपेठेत घडणारे बदल, आवश्यक कायदे कानून, अत्याधुनिक तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचप्रमाणे नव्या उद्योजकांना पतपुरवठा करण्यासाठी स्थिर स्वरूपाचा निधीही उभारण्यात येईल; असेही ते म्हणाले.

Leave a Comment