इशरत जहॉं दहशतवादीच

ishrat-jahan
मुंबईवर २००८ साली झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार मानल्या गेलेल्या डेव्हिड हेडली याने आपल्या साक्षीतून बर्‍याच खळबळजनक बाबी उघड करायला सुरूवात केली आहे. तो अमेरिकेत राहत असला तरी मूळचा पाकिस्तानी आहे आणि त्याचे पाकिस्तानातील अतिरेकी चळवळीतील लोकांशी जवळचे संबंध आहेत. त्याने दोन दिवसांपूर्वीपर्यंत दिलेल्या साक्षींमध्ये फार खळबळजनक माहिती होतीच असे नाही. साधारणपणे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांच्या संबंधात ज्या गोष्टी वारंवार उघड होत असतात आणि मानल्या जात असतात त्यांनाच त्याने दुजोरा दिला. पण कालच्या साक्षीमध्ये त्याने मुंबईजवळच्या मुंब्र्याची तरुणी इशरत जहॉं ही अतिरेकीच होती हे सांगून या संबंधातल्या समजुती, घटना आणि चर्चा यांना एक नाट्यमय वळण दिले. २००४ साली इशरत जहॉं ही १९ वर्षांची तरुणी अहमदाबाद शहराच्या बाहेरच्या बाजूस झालेल्या एका चकमकीत मारली गेली होती. तिच्या सोबत प्राणेश पिलाई उर्फ जावेद खान हाही तरुण मारला गेला होता आणि अन्य दोघे पाकिस्तानी नागरिक ठार झाले होते.

प्राणेश पिलाई आणि इशरत जहॉं यांची ओळख पटली. प्राणेश पिलाई उर्फ जावेद खान हा नुकताच धर्मांतरित झाला होता आणि नकली नोटांच्या रॅकेटमध्ये सहभागी होता. त्याच्या सोबत मारल्या गेलेल्या आणि एकाच वाहनातून प्रवास करणार्‍या अन्य दोघांची ओळख पटलीच नाही. मात्र ते दोघेही पाकिस्तानी होते हे उघड झाले. हे चौघे एका वाहनामधून रात्रभर प्रवास करून पहाटे अहमदाबादच्या हद्दीत आले तेव्हाच त्यांच्या येण्याची चाहूल लागली आणि पोलिसांनी त्यांना गाठले. त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. परंतु या चौघांनी शरण येण्याऐवजी आपल्या गाडीतून पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. त्यात चौघे मारले गेले. एक १९ वर्षाची भारतीय तरुणी अशा प्रकारे चकमकीत मारली जाताच तिच्या जातीमुळे राजकारणाचा विषय झाली. ती अतिरेकी नव्हती असा पवित्रा तिच्या नातेवाईकांनी तर घेतलाच पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी तिचा बचाव करण्यास अधिक पुढाकार घेतला. अतिउत्साही राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड त्याच भागातून निवडून येतात. त्यांनी तर तिच्या समर्थनासाठी उघड उघड भूमिका घेऊन गुजरातेतल्या भाजपा सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. इशरत जहॉं ही अतिरेकी नव्हती असे त्यांचे म्हणणे होते आणि तिला विनाकारण मारले असा त्यांचा मुद्दा होता.

ही गोष्ट गृहित धरली तरी तिच्या पाठीशी एवढ्या अहमहमिकेने उभे राहण्याचे कारण काय हे समजत नाही. मात्र मुस्लीम मतांसाठी या लोकांनी हा पवित्रा घेतला. शरद पवार, नितीशकुमार हे तिच्या मदतीला धावले. खरे म्हणजे भारतात अनेक लोक पोलिसांच्या चकमकीत मारले जातात. पण इशरत जहॉं ही जणू काही कोणीतरी मानवतावादी नेता होती असा भ्रम निर्माण करत या सगळ्या कथित सेक्युलर लोकांनी तिच्याशी झालेल्या चकमकीचे प्रचंड भांडवल केले. या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार होते. तेव्हा पासून इशरत जहॉं ही अतिरेकी होती की नाही यावर देशभर वाद जारी आहे. खरे म्हणजे तो तसा व्हायचे काही कारण नाही. दोन संशयास्पद पाकिस्तानी नागरिक आणि एक अतिरेकी यांच्यासमोर १९ वर्षांची एक गरीब मुलगी रात्री प्रवास करते, उर्वरित तिघे अतिरेकी असतात आणि ते तिघांनाही मान्य असते पण त्यांच्यासोबतची एक मुलगीच तेवढी सभ्य आणि देशप्रेमी नागरिक असते ही गोष्ट कोणीतरी मान्य करेल का?

आता हेडलीच्या साक्षीमुळे ती अतिरेकी होती हे शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु ती अतिरेकी होती हे सिध्द करण्यास हेडलीच्या साक्षीची तरी गरज का भासावी? इशरत जहॉंना वडील नव्हते आणि ती आपल्या लहान बहिणी तसेच आई यांचे पालन पोषण करण्यासाठी शिकवण्या घेत होती. अशी ही मुलगी जावेद खान उर्फ प्राणेश पिलाई याच्याशी मैत्री करून अतिरेकी कारवायांमध्ये गुंतणे सहज शक्य होते. अन्यथा त्या तिघांसोबत त्या वाहनातून कोठे प्रवास करत होती आणि या प्रवासाचे निमित्त काय होते याचा कसलाही समाधानकारक उलगडा आजपर्यंत तरी झालेला नाही. तिची कौटुंबीक पार्श्‍वभूमी पाहिली असता अशी एखादी निष्पाप तरुणी अशा लोकांसोबत रात्रीचा प्रवास करणे शक्यच नाही आणि आजपर्यंतच्या तपासात तरी तिच्या प्रवासाचे कारण कोणीच सांगितलेले नाही. मात्र ती अतिरेकी नव्हती हे वारंवार सांगितले जात होते. एखादा माणूस अतिरेकी आहे की नाही याचे काही प्रमाणपत्र नसते. तशी काही अधिकृत नोंद नसते आणि अतिरेक्यांची काही नेमणूक होत नसते. नरेंद्र मोदी यांच्या खुनाच्या कटात सहभागी असणार्‍या लोकांसोबत प्रवास करणे यापेक्षा अतिरेकी असल्याची वेगळी काय खूण असू शकते? ती अतिरेकीच होती. आता हेडलीच्या साक्षीमुळे तिच्या अतिरेकी असण्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे तिचे समर्थक अडचणीत आले आहेत आणि त्यांनी हेडली हा भाजपाचा हस्तक आहे असा जावईशोध लावला आहे. परंतु या लोकांनी मतांच्या स्वार्थासाठी कितीही कोलांटउड्या खाल्ल्या तरी जनतेच्या दरबारात ते देशद्रोह्यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणार आहेत.

Leave a Comment