२०१८ मध्ये अवतरणार ‘टायटॅनिक-२’

titanic
सिडनी : १०६ वर्षांपूर्वी मूळ टायटॅनिक जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडून १५०० पेक्षा जास्त लोक मरण पावलेल्या ऐतिहासिक जहाजाची प्रतिकृती रॉयल मरीन सर्व्हिसेस ‘टायटॅनिक-२’ या नावाने २०१८ मध्ये सेवेत रुजू करणार आहे.

२१ व्या शतकातील सुरक्षेच्या गरजा नजरेसमोर ठेवून आणखी दोन वर्षांनी जलावतरण करणारे टायटॅनिक जहाज बनविण्यात येत आहे. त्यानुसार मूळ जहाजापेक्षा नवे चार मीटर रुंद असेल. ऑस्ट्रेलियातील अब्जाधीश क्लाईव्ह पामर आणि त्यांची कंपनी ब्लू स्टार यांची टायटॅनिक-२ या जहाजाची कल्पना असून या नव्या जहाजाचा १९१२ मध्ये तयार झालेल्या टायटॅनिकसारखाच तोंडवळा असेल; परंतु नवी आवृत्ती चार मीटर रुंद असेल.

पुरेशा जीवरक्षक बोटी बुडालेल्या टायटॅनिकमध्ये नव्हत्या. आता ती उणीव दूर केली जाईल. संकटात समुद्रातून सुटका करण्याची व्यवस्थाही त्याच्या जोडीला आहे. २७० मीटर लांब, ५३ मीटर उंच आणि ४० हजार टन वजनाची ‘टायटॅनिक -२’ असेल, असे सांगण्यात येत आहे.

जुन्या बोटीत होते त्याचप्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीची तिकिटे नव्या टायटॅनिकमध्येही असतील. नऊ मजल्यांच्या या बोटीमध्ये २४०० प्रवासी आणि ९०० कर्मचाऱ्यांना समावून घेण्यासाठी ८४० केबीन असतील. पोहण्याचा तलाव, तुर्कीश बाथरूम्स आणि जिमखाना या जहाजावर असेल. उपग्रहाद्वारे या जहाजाचे नियंत्रण होईल व त्याला डिजिटल नॅव्हिगेशन आणि रडार सिस्टीम असेल, असे ब्लू स्टार लाईनचे मार्केटिंग संचालक जेम्स मॅकडोनाल्ड यांनी सांगितले.

साउदम्पटन ते न्यूयॉर्क असा मूळ जहाजाचा प्रवास होता. मात्र आता नवा प्रवास पूर्व चीनमधील जियांगसू येथून दुबई असा असेल. १९१२ मध्ये मूळ टायटॅनिक जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासाला निघाल्यानंतर उत्तर अटलांटिक महासागरात हिमनगाला धडकून बुडाले व १५०० पेक्षा जास्त लोकांना जलसमाधी मिळाली होती.

Leave a Comment