फ्लिपकार्टच्या मुकेश बन्सल यांचा राजीनामा

mukesh-bansal
नवी दिल्ली – पुन्हा एकदा ऑनलाईन खरेदी विक्री क्षेत्रातील कंपनी फ्लिपकार्टच्या वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनात मोठे बदल झाले असून मिंत्राचे संस्थापक व फ्लिपकार्टच्या कॉमर्स व अॅडव्हर्टायझिंग विभागाचे प्रमुख मुकेश बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी अंकित नागोरी यांनी देखील स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्यासाठी कंपनीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बिनी बन्सल यांची नियुक्ती झाल्याच्या काही आठवड्यांत झालेले हे नवे बदल लक्षवेधी ठरले आहेत.

मिंत्राचे फ्लिपकार्टने अधिग्रहण केल्यानंतर मुकेश बन्सल फ्लिपकार्टमध्ये सामील झाले होते. २०१४साली फ्लिपकार्टने मिंत्राची खरेदी केली होती. कराराची रक्कम दोन्ही कंपन्यांनी सार्वजनिक केली नव्हती परंतु हा करार सुमारे २,००० कोटी रुपयांना झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयआयटी कानपूर अभियांत्रिकी पदवी मिळवणाऱ्या मुकेश बन्सल यांनी मिंत्रा व फ्लिपकार्टच्या व्यवसायाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

आता बन्सल ३ ते ६ महिन्यांची विश्रांती कुटुंबाला वेळ देण्यासाठी घेणार आहेत व नंतर ते स्वतःचा व्यवसाय सुरु करतील, असे बोलले जात आहेत. परंतु ते फ्लिपकार्टमधून बाहेर पडल्यानंतरदेखील कंपनीच्या सल्लागारपदी कायम राहतील. क्रीडा क्षेत्रात नवी स्टार्टअप कंपनीचे व्यवसाय अधिकारी अंकित नागोरी हे सुरु करणार आहेत. विशेष म्हणजे, फ्लिपकार्टचे सचिन व बिनी बन्सल हे या कंपनीचे पहिले गुंतवणूकदार आहेत. अंकित नागोरी मे महिन्यापर्यंत आपले काम सुरु ठेवतील तर मुकेश बन्सल मार्च महिन्यात बाहेर पडतील.

Leave a Comment