पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

prithviraj-chavan
माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एक खंत व्यक्त केली आहे. ज्यावेळी कॉंग्रेस पक्ष सत्तेवर होता आणि भारतीय जनता पार्टी विरोधी बाकावर बसली होती तेव्हा कॉंग्रेस पक्षाचा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एखादा भ्रष्टाचार सापडला की भाजपाचे नेते कॉंग्रेस पक्षावर हल्ला करत असत. सरकारने भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी करत असत आणि एवढ्यावर भागले नाही तर राज्यपालांकडे तक्रार करत एवढ्यावरही भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई झाली नाही तर सरळ न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रकरणाची तड लावण्याचा प्रयत्न करत असत. सध्या छगन भुजबळ यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईमध्ये असेच झाले. एवढेच नव्हे तर आणखी एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनासुध्दा अशाच माध्यमातून आदर्श गृहनिर्माण भ्रष्टाचारात गुंतवले गेले. त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. आता चित्र बदलेले आहे. कॉंग्रेसचा भ्रष्टाचार काढणारे भाजपाचे नेते सत्तेवर आलेले आहेत आणि कॉंग्रेस पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे.

कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी भाजपाच्या नेत्यांची काही प्रकरणे बाहेर काढली आहेत. त्यात पंकजा मुंडे यांचे चिक्कीचे प्रकरण, विनोद तावडे यांचे छायाचित्रांच्या खरेदीचे प्रकरण तसेच गिरीश बापट यांच्यावर आरोप झालेले दाळीच्या व्यवहारातील प्रकरण यांचा समावेश आहे. या सार्‍या प्रकरणांमध्ये कॉंग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी भरपूर आरडाओरडा केला. विधानसभेत प्रकरणे गाजवली आणि माध्यमांनीही त्यांना सहकार्य केले. एवढे सगळे होऊनही यातल्या एकाही प्रकरणात कोणाही कॉंग्रेसच्या आमदाराने जनहित याचिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची तड लावण्याचा प्रयत्न केला नाही. असे का व्हावे या प्रश्‍नाने पृथ्वीराज चव्हाण अस्वस्थ आहेत. विरोधी पक्ष म्हणून आपण भूमिका स्वीकारलेली आहे. याच नात्याने सरकारवर अंकुश ठेवायचा म्हणून भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहोत. त्यावर बराच आरडाओरडाही करत आहोत. परंतु आरडाओरडा भाजपच्याही नेत्यांना करता येतो. त्यांनी तसा तो करून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही असे खुलासे केले आणि आता महाराष्ट्रातल्या लोकांना मुंडे, तावडे, बापट यांच्यावरील तथाकथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा विसर पडला आहे. राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसच्या आमदारांनी या प्रकरणात न्यायालयात का जाऊ नये असा प्रश्‍न पृथ्वीराज चव्हाण विचारत आहेत.

या प्रश्‍नाची दोन प्रकारे उत्तरे देता येतात. पहिली गोष्ट म्हणजे कॉंग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार भ्रष्टाचाराची प्रकरणे काढत असले तरी ती पुरेशा पुराव्यानिशी काढत नसावेत. त्यामुळे आपल्यावर झालेल्या आरोपाचे खुलासे भाजपाच्या नेत्यांनी केले की आरोप करणारे कॉंग्रेसचे आमदार त्या खुलाश्याची चिरफाड करत नाहीत किंवा ते खुलासे कसे तकलादू आहेत हे सिध्द करू शकत नाहीत. याचा अर्थ हे आरोप बिनबुडाचे असावेत किंवा ते करण्यापूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी पुरेसा गृहपाठ केलेला नसावा. म्हणजेच पूर्वी सत्ताधारी असलेले हे आमदार अजून विरोधी पक्षाच्या भूमिकेत पुरते शिरलेले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आरोपाल पुष्टी देण्याइतके पुरावे या लोकांच्या हातात नसल्यामुळे ते न्यायालयात जाण्याची हिंमत करत नसावेत. एरवी एखादा आरोप करून त्याला माध्यमातून प्रसिध्दी देणे सोपे असते. कारण माध्यमांचे प्रतिनिधी केल्या जाणार्‍या आरोपांची बातमी करतात. त्या आरोपाला दुजोरा देणारे पुरावे मागत नाहीत. तेव्हा माध्यमातून आरोप करणे सोपे असते. म्हणून भाजपामध्ये काही खुट्ट वाजले की नवाब मलिक वृत्तवाहिन्यांवर जातात आणि काहीतरी बेफाट आरोप करतात.

अशाच एखाद्या आरोपाच्या संबंधात न्यायालयात जायची वेळ येते किंवा जनहित याचिका दाखल करण्याची वेळ येते तेव्हा कॉंग्रेसच्या आमदारांचे हातापायातले बळ जाते. कारण न्यायालय अशी याचिका दाखल करताना पुरावे मागतात. भाजपचे आमदार किरिट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांना त्रस्त केले आहे. परंतु तसे करताना त्यांनी त्यांच्या विरोधातले पुरावे परिश्रमपूर्वक जमा केलेले आहेत. तेवढे परिश्रम करण्याची तयारी कॉंग्रेसच्या आमदारांत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या प्रकरणात जनहित याचिका दाखल करायची झाली तर ती दाखल करणारा कार्यकर्ता स्वतः तेवढा निष्कलंक असावा लागतो. अशा कार्यकर्त्यांची कॉंग्रेसमध्ये फार वानवा आहे. त्यामुळे कदाचित ते एखादी जनहित याचिका दाखल करण्याचा विचार करत असतील तेव्हा त्यांना एका म्हणीची आठवण होत असेल. ज्यांचे घर काचेचे बनले आहे त्यांनी लोकांच्या घरावर दगड फेकू नयेत. कॉंग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये आकंठ बुडालेले आहेत त्यामुळे कदाचित भाजपच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार झाला तरी हे कॉंग्रेसचे नेते भाजपाच्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवू शकणार नाहीत. ही सारी परिस्थिती पृथ्वीराज चव्हाण यांना माहीत आहे. पण त्यांनी व्यक्त केलेल्या खंतीमधून ती पुन्हा स्पष्ट झालेली आहे.

Leave a Comment