मोदींना इशारा

modi
येत्या काही दिवसांत देशात निवडणुकीचे वारे जोरात वहायला सुरूवात होणार आहे कारण पाच विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. तसे या निवडणुकांचे फार काही महत्त्व नाही पण मोदी आणि त्यांची लोकप्रियता हा विषय या निवडणुकांत गुंतलेला असल्यामुळे त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आसामात जाहीर सभा घेतली आणि गांधी कुटुंबावर टीका केली. याचा अर्थ त्यांनी आता निवडणूक प्रचाराच्या ढोलावर टिपरू टाकले आहे. आपण देशाचा विकास करत आहोत पण विरोधी पक्ष म्हणवणारा कॉंग्रेस पक्ष संसदेतल्या कामात नेहमी अडथळे आणून सरकारला काम करू देत नाही आणि विकास कामात अडचणी आणत आहे, कॉंग्रेस पक्षाची ही सारी थेरे केवळ गांधी कुटुंबाला भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचवण्यासाठी चाललेली आहेत असाही टोला मोदी यांनी लगावला. आता निवडणूक प्रचाराची रणधुमाळी म्हणताच अरे ला कारे आलेच. राहुल गांधी यांना ही टीका झोंबलीच असणार.

ते तर आता चांगलेच फॉर्मात आले आहेत आणि सतत मोदींच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्यागत उभे रहायला लागले आहेत. त्यांना अशा पवित्र्यातून आपली आक्रमक छबी उभी करायची आहे. त्यातून त्यांना दोन हेतू साधायचे आहेत. निवडणुकीत चमक दाखवून त्यांना पक्षाचा अध्यक्ष व्हायचे आहेच पण त्यांचा खरा सामना आपल्या भगिनीशी आहे. सध्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत फार निराश झाले आहेत. राहुल गांधी यांच्यात प्रति मोदी होण्याची क्षमता नाही हे आता पक्षात उघडपणे बोलले जायला लागले आहे. आजारी असलेल्या सोनिया गांधी आणि बालीश राहुल गांधी यांच्या हातून पक्षाला काही चांगले दिवस येणार नाहीत यावर आता पक्षात एकमत होत आहे. अर्थात अशा कॉंग्रेस नेत्यांनी अगदीच काही आशा सोडलेली नाही. त्यांच्यासमोर प्रियंका वड्रा हा पर्याय आहे. आता पक्षाला वाचवण्यासाठी प्रियंकालाच समोर आणा अशी मागणी करून पक्षात कधी उठाव होईल याचा काही नेम सांगता येत नाही. कसा काही संघर्ष पक्षात मुळात अस्तित्वातच नाही असे कितीही खुलासे पक्षातून केले जात असले तरी त्यात नाही तथ्य नाही कारण राहुल गांधी अशा स्पर्धेच्या तणावाखाली आहेत हे नाकारता येत नाही. म्हणून ते अधिक आक्रमक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात पण त्यात त्यांचा आक्रमकपणा दिसण्याऐवजी हसेच होते. कारण ते या निमित्ताने करीत असलेल्या विधानांत काही दम नसतो आणि त्यांची बुद्धीमत्ताही दिसत नसते.

नरेन्द्र मोदी यांनी राज्यसभेतल्या कॉंग्रेसच्या असहकाराचा उल्लेख करताच राहुल गांधी यांनी मोदींना उत्तर दिले. मोदी यांनी काम करून दाखवावे, त्यांनी बहाणे सांगू नयेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष म्हणून असेच काही तरी म्हणायचे असते अशी त्यांची कल्पना आहे. पण त्यांच्या या म्हणण्यात काहीही तर्कशुद्धता नाही. मोदी यांनी आपल्या कामांची पूर्तता न होण्यास अन्य काही बहाणे सांगितले असते तर राहुल गांधी यांना मोदींनी बहाणे करू नयेत असे म्हणता आले असते पण येथे मोदींच्या वाटेत राहुल गांधी हेच अडथळे आणत आहेत आणि त्यांना बहाणे न करण्याचा इशारा देत आहेत. यावर एका दैनिकाने छान व्यंगचित्र काढले आहे. मोदींची गाडी जात आहे, त्यांच्या वाटेत राहुल गांधी झोपून त्यांची गाडी अडवत आहेत आणि म्हणत आहेत, बहाणे सांगू नका, गाडी चालवा. अनेकदा मोठा लेख लिहून जे सांगता येत नाही ते एका व्यंगचित्रातून सांगता येते असे म्हणतात ते या व्यंगचित्रातून सिद्ध झाले आहे. मोदी आणि राहुल गांधी यांच्या संबंधात आज जी जुगलबंदी सुरू आहे तशीच चार वर्षांखाली सुरू झाली होती. मात्र त्यांच्या भूमिका नेमक्या उलट्या होत्या.

त्या काळात दिग्विजयसिंग यांच्यासारखे खुषमस्करे राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान व्हावे अशी मखलाशी करीत होते. पण राहुल गांधी यांच्यात ती क्षमता आहे की नाही याबाबत त्यांच्या कॉंग्रेस पक्षातच शंका व्यक्त होत होत्या. या शंका देशातलेही अनेक लोक विचारत होतेच. त्या सर्वांचे म्हणणे असे होते की, राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानपदावर झेप न घेता आधी केन्द्रातले एखादे खाते हाती घ्यावे आणि त्या खात्यात आपल्या कामाची झलक दाखवून द्यावी. त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांना एखादे खाते मागितले असते तर त्यांना ते सहज मिळालेही असते. खरेच राहुल गांधी यांना ती किती छान संधी होती पण ती त्यांना वाया घालवली. खरेच सांगायचे तर त्यांनी ते आव्हान नाकारले. कारण त्यांना आपल्याच कार्यक्षमतेवर विश्‍वास वाटत नव्हता, आता मोदींना बहाणे न सांगण्याचा सल्ला देणारे राहुल गांधी हे तर त्या काळात कसला बहाणाही सांगत नव्हते. अर्थात ते सांगण्याची गरजही नव्हती कारण राहुल गांधी यांच्यात ती क्षमता नाही हे सगळेच लोक जाणून होते. बहाणा हा शब्द समोर आला की आणखी एक प्रसंग आठवतो. मनमोहन सिंग सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते तेव्हा राहुल गांधी यांनी ही अकार्यक्षमता मान्य केली होती पण आपले सरकार हे आघाडीचे सरकार असल्यामुळे कार्यक्षमता दाखवता येत नाही असा बहाणा सांगितला होता. आता ते मोदी यांना बहाणे न सांगण्याचा सल्ला देत आहेत पण मोदी यांचेही सरकार हे आघाडीचे सरकार आहे याचा त्यांना विसर पडलेला दिसत आहे.

Leave a Comment