विदेशात दरवळलो हापूसचो वास…

hapus
गेली अनेक वर्षे विपरित हवामानाचा सामना करत असलेल्या हापूस उत्पादकांना यंदाचा सीझन चेहर्‍यावर हसू आणणारा ठरला आहे. वाशीच्या ठोक मंडईत दररोज उत्तम प्रतीच्या हापूसच्या ९०० ते १००० पेट्यांची आवक सुरू झाली आहे आणि यातील ३० टक्के माल परदेशात निर्यात होत आहे. हा माल प्रामुख्याने दुबई, न्यूझीलंड, अन्य अरब देशात तसेच आशियाई देशात निर्यात होत आहे. लवकरच हापूस अमेरिकावारीवरही जात असल्याचे समजते.

गेली कांही वर्षे नोव्हबर ते जानेवारीत पाऊस झाल्याने आंबा उत्पादक अडचणीत आले होते. यंदा मात्र हवामान स्वच्छ राहिल्याने आंब्याला चांगला मोहर आला आहे आणि आंब्यावर कोणतीही कीड पडलेली नाही. सध्या येणारे फळ आकाराने मोठे आणि स्वादिष्ट असल्याने परदेशातून हापूसला मोठी मागणी येत आहे.गतवर्षी युरोपियन बाजाराने हापूस आयातीवर घातलेली बंदीही उठविली गेली असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर आंबा निर्यात होईल आणि उत्पादकांना बँकांची जुनी देणी सहज फेडता येतील असा विश्वास हापूस उत्पादक व्यक्त करत आहेत.

देवगडचा हापूस हा नंबर एक समजला जातो. तेथील उत्पादक विजय जाधव म्हणाले, यंदा हवामान अतिशय अनुकुल राहिल्याने आंबा चांगला पोसला गेला आहे. तसेच फारशी कीडनाशके न वापरता नैसर्गिक पद्धतीनेच आंब्याचे निर्जंतूकरण करण्याच्या प्रक्रियेसही वेग आला आहे. यंदा विदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात अपेक्षित आहे तसेच स्थानिक बाजारातही दर्जेदार फळ ग्राहकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल.

Leave a Comment