निस्वार्थी पंतप्रधान

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पदाचा पगार घेतात. परंतु तो एकत्र साचवून गरीब विद्यार्थ्यांना देऊन टाकतात. अशी बातमी पूर्वी प्रसिध्द झाली होती. आपल्या देशाला स्वच्छ प्रतिमेच्या पंतप्रधानांची परंपरा आहे. हे आपले सुदैव होय. कधी कधी पंतप्रधान पदाच्या प्रतिमेला किंवा प्रतिष्ठेला बाधा येईल अशा घटना घडतात. पूर्वी हेमवतीनंदन बहुगुणा हे एक केंद्रीय मंत्री होते. त्यांनी एकदा अशी वल्गना केली होती की, मी १०० कोटी रुपयेे खर्चुन भारताचा पंतप्रधान होईन. त्यांना १०० कोटी रुपये मिळाले की नाही हे काही माहीत नाही पण ते पंतप्रधान झाले नाहीत हे मात्र नक्की आहे. आपल्या सुदैवाने असे हे पद विकत घेणारा माणूस या पदावर बसला नाही. असे असले तरी बहुगुणा यांनी राजकारणातले एक वास्तव आपल्या समोर मांडले होते. त्यांनी ते सरळ सरळ बोलून दाखवले तर अन्य काही नेते त्या हेतूने धन अर्जित करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. काही नेत्यांना हे पद मिळालेले नाही पण ते या पदाचे उमेदवार म्हणून कायम चर्चेेत येत असतात आणि मागे पडतात. अशा काही नेत्यांनी शंभरच काय पण हजारो कोटी रुपये जमा केलेले आहेत.

एवढे पैसे माणसाला लागतात तरी कशाला असा सवाल आपल्यासारख्या भाबड्या लोकांच्या मनात उठू शकतो पण त्यांनी मात्र काही हेतू डोळ्यासमोर ठेवून ती संपत्ती कमावलेली असते. कदाचित आपल्याला या पदाची लॉटरी लागेल आणि २५ ते ३० खासदार कमी पडतील तेव्हा त्यांना विकत घेण्यासाठी पैसा साठवलेला बरा असा त्यांचा हिशेब असतो. असे धनदांडगे लोक पंतप्रधानपदा पर्यंत कधी पोचतच नाही हे आपले नशीबच म्हणायचे. आपल्या सुदैवाने आजवर जे पंतप्रधान आपल्याला लाभले ते पैशाच्या जोरावर पंतप्रधान झालेले नाहीत. ते आपल्या राजकीय गुणवत्तेवर या पदावर पोचले होते. असे असले तरी ते सगळेच अगदी अकिंचन होते असे सांगता येत नाही. काही पंतप्रधान बर्‍यापैकी सधन होते. त्यांनी पैशाच्या जोरावर हे पद प्राप्त केले आणि पदाचा वापर करून पैसाच कमावला असे काही घडले नाही पण ते पैशाच्या बाबतीत अगदीच तुकाराम महाराज होते असे काही सांगता येत नाही. काही पंतप्रधान मात्र आदर्शवत निष्कांचन होते. डॉ. मनमोहनसिंग हे पैशाच्या बाबतीत अगदीच निरपेक्ष होते. त्यांची मालमत्ताही मर्यादित होती. पण ते गरीब नव्हते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांना जो काही पगाराचा पैसा मिळाला असेल तो त्यांनी मालमत्ता कमावण्यासाठी गुंतवला. तीच त्यांची मालमत्ता.

पंतप्रधान म्हणून त्यांना मिळणारे वेतन गुंतवण्याचा प्रश्‍न त्यांच्याबाबतीत येतच नव्हता कारण ते या पदावर काम करताना केवळ एक रुपया एवढे नाममात्र वेतन घेत होते. या बाबतीत लालबहादूर शास्त्री यांनी तर या बाबतीत आदर्शच घालून दिला होता. ते पंतप्रधान होते तरीही अगदी साधे रहात असत. त्यांचे घर केवळ दोन खोल्यांचेच होते. त्यांनी या पदावरून काम करताना मिळालेल्या वेतनातून कोठेही जमीन किंवा घर खरेदी केलेले नव्हते. शास्त्रीजींच्या साधेपणाच्या अनेक कहाण्या आपण नेहमीच ऐकत असतो. अटल बिहारी वाजपेयी हेही असेच साधे आणि त्यागी पंतप्रधान होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होण्याचे जीवनव्र्रत स्वीकारले होते. या व्रतस्थांना मालमत्ता कमावता येत नाही तशी शपथ त्यांनी घेतलेली असते. याच प्रचार कामाचा एक भाग म्हणून ते पंतप्रधान झाले होते. त्यामुळे पंतप्रधान म्हणूनही काही कमावण्याचा प्रश्‍न नव्हता. ते आता या पदावरून खाली उतरले असले तरीही एका साध्या घरात ते एकटेच रहात आहेत कारण त्यांनी प्रचारक म्हणून आपल्या घराशी असलेला संबंधही तोडलेला होता आणि व्रताचा एक भाग म्हणून विवाहही केला नव्हता.

एकदा वाजपेयी यांनी रायगडाला भेट दिली होती. तिथल्या शिवमंदिरात त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले तेव्हा रीतीनुसार देवासमोर एखादा रुपया तरी टाकायला हवा होता म्हणून खिशात हात घातला तर काय ? खिशात एकही पैसा नव्हता. निष्कांचन अवस्थेत जगण्याची ही परमावधी झाली. आताचे पंतप्रधान याच मालिकेतले आहेत. ते बाल वयापासून संघाचे स्वयंसेवक आहेत आणि वाजपेयींच्या प्रमाणे तेही याच व्रताचा एक भाग म्हणून पंतप्रधान झालेले आहेत. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी आपली सारी मालमत्ता जाहीर केली आहे. तिच्यावरून त्यांच्या सांपत्तिक स्थितीची माहिती कळते तीही मनाला आचंबित करणारी आहे. त्यांनी कोठेही जमीन खरेदी केलेली नाही. अहमदाबादेत १६१ चौ. फूट बांधकाम केलेली एक जागा आहे. केवळ ४० लाखाच्या ठेवी आहेत. गाडी नाही आणि बँकेतली ठेव आहे तीही बचत ठेव असून तिच्यात अवघे ४ हजार ७०० रुपये आहेत. आता आता तर राजकारणात भ्रष्टाचार फार माजला आहे. राजकयि पक्षांच्या युवक शाखेचा कार्यकर्ताही कोठेतरी हात धूवून घेतो आणि लवकरच एखादी गाडी घेतो. बाकी राहणी मान आणि थाटमाट तर काही विचारूच नका. पण पंतप्रधान झाल्यावरही मोदी यांची पैशाविषयीची अनासक्ती कायम आहे. आपल्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण किती आहे हे आपण जाणतोच पण तो कमी करण्यासाठी फार कमी प्रयत्न होत आहेत. मुळात उच्च स्थानावर जाणार्‍यांनी स्वत: भ्रष्टाचारापासून दूर राहण्याची दक्षता घेतली तर भ्रष्टाचाराच्या गंगोत्रीजवळ तो कमी होईल आणि मग देशातल्या भ्रष्टाचाराला काही प्रमाणात खळ लागेल, म्हणून पंतप्रधान चांगले असणे ही गरज आहे. आज पंतप्रधान असे असल्यामुळे मनाला दिलासा मिळत आहे.

Leave a Comment