निष्काळजीपणाचे बळी

murud
रायगड जिल्ह्यातल्या मुरुड येथील समुद्र किनार्‍यावर काल पुण्यातल्या एका महाविद्यालयातील १४ विद्यार्थी समुद्रात बुडून मरण पावले. सहलीसाठी म्हणून गेलेले हे विद्यार्थी समुद्राला भरती आलेली असताना समुद्राच्या पाण्यात शिरले असे आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून कळते. असे अपघात होऊन गेल्यानंतर खूप चर्चा चालते आणि काही करायला हवे होते यावर बरेच काही बोलले जाते. नंतर काही नियम केले जातात. परंतु काही दिवसांनंतर अशा प्रकारची चर्चा संपत येते. गेल्या चार वर्षांत कोकणातल्या विविध समुद्र किनार्‍यांवर अशाच प्रकारे अनेक लोकांनी जीव गमावलेले आहेत. समुद्राच्या किनारी येणार्‍या पर्यटकांना असा जीवाचा धोका होऊ नये म्हणून सरकारने निश्‍चितच काही उपाय योजना केल्या आहेत परंतु त्या उपाय योजनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.

कोकणातल्या निदान काही समुद्र किनार्‍यांवर तरी पर्यटकांना धोक्याची सूचना देणारे मोठमोठे फलक लावलेले आहेत. काही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी तर विविध लॉजेसमध्येसुध्दा तसे फलक लिहून ठेवले आहेत. अशा प्रकारच्या सावधानतेच्या सूचना मिळूनसुध्दा अशा प्रकारे पर्यटक जीव गमावतात याचा अर्थ तिथे लावलेल्या फलकांचा त्यांच्या मनावर काही परिणाम होत नाही असा होतो. म्हणजे सूचना देऊनसुध्दा त्या न पाळण्याकडेच लोकांचा कल असतो. अशा प्रकारची बेदरकार वृत्ती तरुणांच्या मनामध्ये विशेषत्त्वाने असते आणि त्याचाच परिणाम काल झालेला दिसत आहे. विशेष म्हणजे मरणार्‍या १३ विद्यार्थ्यांमध्ये ९ मुली आहेत.

या संबंधात चर्चा होत असताना सरकारवर सारा दोष दिला जातो खरा पण निदान या प्रकरणात तरी खुद्द विद्यार्थी आणि त्यातल्या त्या त्यांचे शिक्षक अधिक जबाबदार आहेत. कोणत्याही शाळेची किंवा विद्यालयाची सहल जाते तेव्हा त्यांच्यासोबत शिक्षकांना पाठवले जाते. मुलांनी उत्साहाच्या भरात असा काही तरी वेडेपणा करू नये आणि त्यावेळी त्यांना आवर घालता यावा हाच शिक्षकांना पाठवण्यामागचा हेतू असतो. मुरुडच्या अपघातामध्ये किनार्‍यावरच्या स्थानिक मंडळींनी या मुलामुलींना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु तो त्यांनी मानला नाही आणि उत्साहाच्या भरात ती मुले खोल समुद्रात गेली. यावेळी त्यांचे शिक्षक काय करत होते हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. या संबंधात अजून तरी काही खुलासा झालेला नाही. परंतु या शिक्षकांची चौकशी झाली पाहिजे आणि बरीच मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली पाहिजे.

या लेखात व्यक्त करण्यात आलेले मत आणि विचार हे संबंधित लेखकाचे व्यक्तिगत मत आणि विचार असून त्याच्याशी ‘माझा पेपर’ सहमत असेल असे नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे या संदर्भात कोणताही वाद उद्भवल्यास त्यास ‘माझा पेपर’ जबाबदार राहणार नाही; याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Comment