भुजबळ अडचणीत

chagan-bhujbal
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सामाजिक न्यायावर भाषण करण्यासाठी अमेरिकेत गेले असतानाच त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना न्यायालयाचा जबरदस्त झटका बसला. त्यांना काल न्यायालयाच्या आदेशावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. भुजबळ अमेरिकेला गेल्यामुळे बचावले की काय हे माहीत नाही परंतु कदाचित ते भारतात असते तर त्यांनाही अटक झाली असती का हा प्रश्‍न तूर्तास तरी अनुत्तरित आहे. मात्र समीर भुजबळ यांना अटक होणे ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात निश्‍चितच ऐतिहासिक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात भ्रष्टाचारावर खूप चर्चा होत आहे. त्या चर्चांमधून एक नकारात्मक सूर पुढे येत आहे. पुढारी मंडळी भ्रष्टाचार करतात खरी पण त्यातला कोणीच सापडत नाही आणि शिक्षा भोगत नाही तेव्हा ही सारी चर्चा आणि कारवाया हे सारे व्यर्थ असे या लोकांचे म्हणणे असते. मात्र या संबंधात काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. कारण हा नकारात्मक सूर चुकीचा आहे. भारतातले काही पुढारी शिक्षा भोगत आहेत आणि काही भोगून बाहेर पडलेले आहेत. नकारात्मक सूर लावण्याची काही गरज नाही.

लालूप्रसाद यादव शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. ओमप्रकाश चौताला सध्या जेलमध्ये आहेत. सुखराम यांना शिक्षा झालेली आहे. ए. राजा. जगनमोहन रेड्डी, कनिमोझी हे नेते अलीकडच्या काळात प्रदीर्घकाळच्या न्यायालयीन कोठडीतून जामीनावर बाहेर पडलेले आहेत. पण त्यांना प्रदीर्घकाळ आत रहावे लागले आहे. महाराष्ट्रातले जवळपास सगळ्या पक्षात फिरून आलेले नेते सुरेश जैन हे गेल्या ३ वर्षांपासून कोठडीत आहेत. महाराष्ट्रातले आणखी एक नेते सुरेश कलमाडी यांना शिक्षा झाली नाही परंतु ते राजकारणातून संपले आहेत. एवढ्या शिक्षा होऊ शकतात तेव्हा नकारात्मक सूर लावण्याची गरज नाही. विदर्भातील असेच एक कॉंग्रेसचे आमदार दिलीप सानंदा हेसुध्दा आज न्यायालयीन कोठडीत गेलेले आहेत. कर्नाटकातील खाण सम्राट रेड्डी बंधू अजूनही कोठडीत आहेत. आज भुजबळ कुटुंबाच्या विरोधात जी कारवाई सुरू आहे ती पाहिली म्हणजे कधी ना कधी भुजबळ यांची अवस्था सुध्दा अशीच होऊ शकते. अशी शक्यता वाटायला लागली आहे. भ्रष्टाचाराच्या संबंधात सारा काही अंधार आहे अशी निराशा वाटण्याचे काही कारण नाही.

अशा प्रकारच्या कोणत्याही कारवाईमध्ये प्रत्यक्ष अटकेला फार महत्त्व असते. कारण तो क्षण निर्णायक असतो. जेव्हा निवडणुकीचे राजकारण चाललेले असते तेव्हा विरोधी पक्षाचे लोक सत्ताधारी पक्षावर टीका करताना भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि अमक्या अमक्या नेत्याच्या हातात हातकड्या घालू अशी घोषणा करतात. अशा आव्हानाला प्रति आव्हान देताना आरोप झालेले नेते हातात हातकड्या घालूनच दाखवा असे आव्हान देतात. अशा आव्हान प्रतिआव्हानांमध्ये अटक होणे याला महत्त्व दिले जाते. अन्यथा चौकशीसाठी ताब्यात घेणे, उलटतपासणी घेणे, घरी येऊन चौकशी करणे, वकिलामार्फत हजर राहणे किंवा घरावर, कार्यालयांवर छापे टाकणे अशा कारवाया होत असतात. या कारवाया म्हणजे निर्णायक कृती नव्हेत. पण अटक होण्याला मात्र निर्णायक महत्त्व असते. चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे सज्जड पुरावे असतातच असे नाही. परंतु अटक करताना मात्र काहीना काही तरी सबळ पुरावा हाती असावाच लागतो.

कारण चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने बदनामी होत नाही. हातात हातकड्या पडणे म्हणजे अटक होणे. याने मात्र बदनामी होते. छगन भुजबळ, त्यांचा मुलगा आणि पुतण्या अशा तिघांवर गेल्या काही दिवसांपासून एकामागे एक गंभीर स्वरूपाचे आरोप होत आलेले आहेत. त्या संबंधात त्यांच्यावर छापे पडले, त्यांना ताब्यात घेण्यात आले परंतु तेवढ्याने भागले नाही. काल त्यांच्या २९ कार्यालयांवर छापे पडून समीर भुजबळला अटक झाली. तेव्हा मात्र भुजबळ यांचे साम्राज्य खर्‍या अर्थाने हादरले. या अटकेमागे न्यायालयाचा आदेशसुध्दा आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ यांच्यावरची कारवाई थोडीशी ढिली पडत आहे की काय असे वाटायला लागले होते. परंतु गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांना झापले आणि भुजबळ यांच्यावर कठोर कारवाई करावी असा आदेश न्यायालयाने दिला. ही मात्रा लागू पडली आणि २९ ठिकाणांवर धाडीची कारवाई होऊन समीर भुजबळ आत पडले. ही कारवाई होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ताबडतोबच ही राजकीय सूडबुध्दीने केलेली कारवाई आहे असा आरोप लावला. अर्थात नवाब मलिकांच्या आरोपावर शेंबडे पोरही विश्‍वास ठेवणार नाही. कारण ही कारवाई आता न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे.

सध्या लोकशाही आहे. कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे आणि माध्यमे हाताशी आहेतच. त्यांचा गैरवापर करून न्यायालयाच्या कारवाईवर राजकीय सूडबुध्दीचा आरोप लावण्याचा उद्योग नवाब मलिक यांनी केला आहे. ते पूर्णपणे अनुचित आहे. राज्य सरकारला कोणावर सूडबुध्दीने कारवाई करायचीच असती तर ती भुजबळ यांच्यावर कशाला केली असती. छगन भुजबळ किंवा कुटुंबीय हे काही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी नाहीत. त्यामुळे राजकीय सूडबुध्दी म्हणून त्यांच्यावर सूड उगवण्याचे काहीच कारण नाही. भुजबळ कुटुंबीयांनी काही वर्षांमध्ये भरपूर मालमत्ता कमावली आहे. त्यांच्या एकेका प्रकरणाचे गौप्यस्फोट झालेले आहेत. त्या सर्वांचेच अगदी सबळ पुरावे समोर येऊन त्यांचे गुन्हे सिध्द झालेले नसले तरी एक दोन नव्हे तर २०-२२ प्रकरणांत त्यांच्यावरच आरोप का व्हावेत हा विचार करायला लावणारा प्रश्‍न आहे. भुजबळांवरील आरोपांचे पुरावे लोकांच्या हाती असल्याची खात्री नसली तरी सत्तेवर आल्यापासून त्यांनी कमावलेली संपत्ती ही लोकांना दिसत आहेच ना? त्यावर नवाब मलिका काय उत्तर देणार आहेत. राजकारणात काहीही घडले की असा उथळ आरोप करण्याची फॅशन आहे परंतु तिच्यामुळे मूळ भ्रष्टाचाराचे गांभिर्य कमी होते हे नवाब मलिक यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

या लेखात व्यक्त करण्यात आलेले मत आणि विचार हे संबंधित लेखकाचे व्यक्तिगत मत आणि विचार असून त्याच्याशी ‘माझा पेपर’ सहमत असेल असे नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे या संदर्भात कोणताही वाद उद्भवल्यास त्यास ‘माझा पेपर’ जबाबदार राहणार नाही; याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Comment