नोकरशाही बलवत्तर

fadnvis
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत नोकरशाही म्हणावी तेवढी सक्रिय नसल्याचा आरोप केला आहे आणि त्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांनी प्रशासन व्यवस्थेत मोठे बदल करण्याची शक्यता सूचित केली आहे. खरे म्हणजे कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री बदलले की ते आपल्या मर्जीतले अधिकारी मोक्याच्या पदावर आणून बसवत असतात आणि त्या निमित्ताने प्रशासनात मोठे फेरबदल करतात. मोठ्या घाऊक प्रमाणात बदल्या करतात. मुख्यमंत्रीव फडणवीस यांनी आता सूचित केलेल्या बदल्या या धर्तीच्या नाहीत. एकूणच शासन कार्यरत करण्याचा एक उपाय म्हणून ते बदल्या करणार आहेत. खरे म्हणजे अशा बदल्यांना एक मर्यादा असते. सध्या या फेरबदलाचा एक भाग म्हणून ५२ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या अपेक्षित आहेत.

म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या जागी दुसर्‍या क्रमांकाचा अधिकारी येईल तर दुसर्‍या क्रमांकाच्या जागी तिसरा येईल. फक्त नावे आणि पदे बदलतील. त्यातून मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असलेली गती मिळेलच याची शाश्‍वती देता येत नाही. कारण हा प्रश्‍न अ च्या जागी ब ला नेमण्याचा आणि ब च्या जागी क ला नेमण्याचा नाही. तर अ, ब आणि क तिघांच्याही मनोवृत्तीचा आहे. अ ला एका खात्यातून उचलून दुसर्‍या खात्यात टाकले तर तो तिथे फार काही वेगळे करत नाही. पहिल्या खात्यात दिरंगाईने काम करत होता तो दुसर्‍या खात्यात दिरंगाईनेच काम करेल. प्रश्‍न दिरंगाईच्या मनोवृत्तीचा आहे आणि शासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांची दिरंगाई हा फार पुरातन विषय आहे. आजच नव्हे तर ६० वर्षांपूर्वीही तो होता.

१९९५ साली महाराष्ट्रातली कॉंग्रेसची प्रदीर्घकाळ असलेली सत्ता बरखास्त झाली आणि भाजपा-सेना युतीचा भगवा विधानसभेवर फडकला. कॉंग्रेसची सत्ता असताना विरोधी पक्षांच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची सचिवालयातली कामे कधीच होत नसत. परंतु आता आपल्या हातात सत्ता आल्यामुळे ही कामे भराभर होतील असे त्यांना वाटायला लागले. मात्र जेव्हा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला लागले तेव्हा असे लक्षात आले की राज्यातली कॉंग्रेसशाही संपून शिवशाही अवतरली असली तरी मंत्रालयातली नोकरशाही तीच आहे. शासकीय पातळीवरची लोकांची कामे करवून देणार्‍या दलालांची फौज काही बदललेली नाही. त्यामुळे सत्ता भाजपा-सेना युतीची असली तरी कामे मात्र त्याच लोकांची होतात ज्यांना कागदावरचे वजन कसे ठेवावे आणि किती ठेवावे याचा हिशोब माहीत असतो.

या लेखात व्यक्त करण्यात आलेले मत आणि विचार हे संबंधित लेखकाचे व्यक्तिगत मत आणि विचार असून त्याच्याशी ‘माझा पेपर’ सहमत असेल असे नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे या संदर्भात कोणताही वाद उद्भवल्यास त्यास ‘माझा पेपर’ जबाबदार राहणार नाही; याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Comment