वैचारिक घुसळणीतील सत्य

modi1
कोणत्याही देशामध्ये विचारांची लढाई होणे फार आवश्यक असते. कारण देशाची प्रगती ज्या गोष्टींनी होते त्या गोष्टींना आधी विचारांचा आधार असतो. विचार पक्का नसेल तर कृती पक्की होत नाही आणि कृती पक्की नसेल तर प्रगती चिरस्थायी होत नाही. म्हणून समाजात होणारी विचारांची घुसळण फार आवश्यक तर असतेच परंतु तिला वस्तुस्थितीचा आधार असला पाहिजे, तिच्या मागचा हेतू शुध्द असला पाहिजे आणि ती घुसळण तर्कशुध्द असली पाहिजे. आज आपल्या देशामध्ये निदान माध्यमांच्या पातळीवर तरी अशी वैचारिक घुसळण घडवून आणण्याचा काही प्रमाणात प्रयत्न होत आहे. परंतु त्या घुसळणीमधून सत्य बाहेर यावे असा आग्रह न धरता सत्य दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आपल्या देशात सुरू असलेली वैचारिक घुसळण ही निरर्थक ठरण्याचा प्रयत्न तर होत आहेच परंतु त्यात सत्याची गळचेपी होत असल्यामुळे परिणामतः या वैचारिक घुसळणीतून निर्माण होणारे नवनीत हे समाजासाठी पोषक न ठरता घातक ठरण्याची शक्यता वाटायला लागली आहे.

या सगळ्या वैचारिक घुसळणीला केंद्रातले मोदी सरकार सत्तेवर येणे ही पार्श्‍वभूमी आहे. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर येणार नाहीत अशी खात्री असणार्‍या किंवा ते सत्तेवर येऊ नयेत अशी इच्छा असणार्‍या लोकांचा या गोंधळ निर्माण करण्यात मोठा वाटा आहे. या लोकांना मोदी सत्तेवर आलेले आहेत ही वस्तुस्थिती पचवता आलेली नाही. जर कदाचित मोदी सत्तेवर आले तर या देशातले मुसलमान, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे जीवन धोक्यात येईल, त्यांना प्रचंड पक्षपाती वागणूक मिळेल, दंगली होतील, हिंदुत्ववादी विचारांचे मोठे आक्रमण समाजातल्या विविध संस्थांमध्ये होईल अशा प्रकारची भीती या लोकांनी मतदारांना घातली होती. तसा सातत्याने प्रचार करून त्यांनी मोदी सत्तेवर येण्याच्या आधीच वातावरण तयार केले होते. परंतु त्या लोकांचा अंदाज चुकवून आणि त्यांच्या अपेक्षा डावलून मोदी सत्तेवर आले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये जे विकासाचे वातावरण तयार केले होते त्यामुळे अनेक उद्योगपतींनी मोदी पंतप्रधान झाले तर देशाच्या विकासाला मोठी चालना देतील असे अंदाज वर्तवले होते. त्यामुळे मोदींना मोठा पाठिंबा मिळाला आणि ते पंतप्रधान झाले. आता त्यांना पंतप्रधान होऊन दीड वर्षे झालेली आहेत. त्यामुळे विकासाच्या वाटेवर त्यांनी कितपत वाटचाल केलेली आहे आणि त्यांच्या विरोधातल्या लोकांनी त्यांचे जे चित्र निर्माण केले होते त्या पातळीवर नेमके काय चालले आहे या दोन्हींचेही नीट परीक्षण करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

विकासाच्या वाटेवर पडलेली पावले आणि देशातली सामाजिक परिस्थिती या दोन्हींचेही वस्तुनिष्ठ परीक्षण करण्याची गरज आहे. विकासाच्या क्षेत्रात मोदी सरकारने भरपूर निर्णय घेतले आहेत. जनधन योजनेसारखी योजना राबवताना तर मोदींच्या निर्णयक्षमतेचा जो झपाटा दिसला आहे तो सगळ्या जगाने वाखाणला आहे. आर्थिक गुंतवणूक, औद्योगीकरण, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील झेप आणि देशातल्या वंचित समाजासाठी आखल्या जाणार्‍या कल्याणकारी योजना या विकासाच्या सर्व निकषांवर नीट आणि सकारात्मक दृष्टीने नजर टाकली तर असे लक्षात येते की मोदींनी दीड वर्षात फार मोठी मजल मारली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या या झपाट्याने त्यांच्या विरोधकांचे डोळे फिरायला लागले आहेत. विकासाच्या कामाचे नियोजन करताना गुंतवणूकदारांना आणि उद्योगपतींना चुचकारावे लागते. त्यांच्या कलाने काही निर्णय घ्यावे लागतात कारण शेवटी त्यांच्या प्रयत्नातूनच रोजगार निर्मिती होत असते. असे काही निर्णय घेतले की सरकार भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत आहे असे बभ्रा करण्याची संधी विरोधकांना मिळत असते आणि असे विरोधक आकड्यांचे खेळ करून सरकार गरीबांना डावलत आहे असे म्हणायला लागतात.

अशी संधी मिळू नये म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातल्या गरीबांसाठी प्रचंड मोठ्या योजना आखल्या आहेत. विमा योजना, जनधन योजना, मुद्रा कर्ज योजना आणि पीक विमा योजना अशा कितीतरी योजना गरिबांना मध्यवर्ती कल्पून आखल्या गेल्या आहेत. मात्र त्या अजून गरिबांपर्यंत १०० टक्के पोहोचल्या नाहीत आणि पोहोचणार आहेत हे मात्र नक्की. म्हणूनच त्यांचे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे समाजातल्या लहान मोठ्या अस्वस्थ करणार्‍या घटनांचे भांडवल करून देशातले गरीब धोक्यात आले असल्याची हाकाटी केली जात आहे. आपल्या समाजात जातीभेद आहे. दलितांना हिणकस वागणूक दिली जाते, काही वेळा अल्पसंख्याकांवर अन्याय होतो हे काही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून घडायला लागले आहे असे नाही. परंतु ते जणू मोदी पंतप्रधान झाल्यामुळेच घडत आहे असा आभास निर्माण करून काही विचारवंत आणि बहुसंख्य माध्यमे पराचा कावळा करून दलित, अल्पसंख्य, मागासवर्गीय आणि शेतकरी यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व समाजघटकांनी अशा बहकाव्यात न येता हे सरकार खरोखर जनतेसाठी काय करत आहे याची दखल घेतली पाहिजे आणि विविध योजनांचा लाभ घेऊन आपला विकास करून घेतला पाहिजे. विघ्नसंतोषी लोकांच्या आहारी जाऊन सरकारशी वैर घेणे हे त्यांच्यासाठी घातक ठरणार आहेच पण देशासाठीही ते योग्य ठरणार नाही.

या लेखात व्यक्त करण्यात आलेले मत आणि विचार हे संबंधित लेखकाचे व्यक्तिगत मत आणि विचार असून त्याच्याशी ‘माझा पेपर’ सहमत असेल असे नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे या संदर्भात कोणताही वाद उद्भवल्यास त्यास ‘माझा पेपर’ जबाबदार राहणार नाही; याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Comment