नाजूक पावले : आगे कदम

shani-shingapur
शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना चौथर्‍यावर जाता येत नाही. हा अन्याय लक्षात येतातच महिला त्याचे निवारण करण्यास पुढे सरसावल्या. आजवर असे झाले नव्हते. आत्ताच ते झाले. कारण महिला आक्रमक होत आहेत. महिलांचे हे पुढे चालणे आणि व्यवहारात आक्रमक होणे, सक्रिय होणे ही गोष्ट आता कौतुकाची होत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण विभागाच्या पाहणीतसुध्दा महिलांची ही आगेकूच स्पष्टपणे दिसून आली आहे. १५ राज्यांत आणि काही केंद्रशासित प्रदेशामध्ये मोबाईलधारक आणि बँक खातेदार असलेल्या महिला तसेच पुरुष यांची पाहणी केली असता असे दिसून आले की ७५ टक्के कुटुंबातील निर्णय महिला घेतात. ही संख्या गेल्या १० वर्षामध्ये ३७ टक्क्यावरून ७५ टक्क्यावर आली आहे.

देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्या सरकारचा जनतेच्या जीवनात बदल घडवण्याच्या काही ना काही योजना असतात त्यांची अंमलबजावणी कमी वेगाने होऊ शकते. त्याचबरोबर तिच्यात जनतेचा सहभाग कमी जास्त असू शकतो. परंतु उशिराने का होईना पण त्या योजनांचे परिणाम दिसतातच. गेल्या २० वर्षांपासून देशात महिलांच्या स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्न केले सुरू आहेत आणि त्याचा परिणाम असा दिसत आहेत. भारतामध्ये रिटेल मार्केटिंग क्षेत्राचे नियोजन करण्यासाठी काही संघटनांनी ग्राहकांच्या बदलत्या मनःस्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले. तेव्हाही खरेदीसाठी महिला आता प्रत्यक्षात घराबाहेर पडत आहेत आणि हे प्रमाण वाढले आहे. असे आढळले होते.

महिलांवर घरात होणारे अत्याचार कमी व्हावेत यासाठीही काही कायदे करण्यात आले. त्यांचेही परिणाम जाणवत आहेत आणि गेल्या दहा वर्षात महिलांवर घरात होणार्‍या अत्याचारात १६ टक्के घट झाल्याचे आढळले आहे. स्वतःचे बँक खाते असणार्‍या महिला आणि साक्षर महिला यांचेही सर्वेक्षण करण्यात आले. तेव्हा असे दिसून आले की महिलांची साक्षरता काही राज्यात ८० टक्क्यांपेक्षासुध्दा जास्त आहे. तसेच स्वतःचे बँक खाते असणार्‍या महिलांची संख्या गेल्या दहा वर्षांमध्ये तिपटीने वाढली आहे. मोबाईलचा वापर करणार्‍या महिलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ते प्रमाण आंध्र प्रदेशासारख्या मागासलेल्या राज्यामध्ये ३६ टक्के आहे तर गोव्यासारख्या राज्यामध्ये ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. साधारणतः महिलांच्या या प्रगतीमध्ये गोवा, तामिळनाडू या राज्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेश हे मागासलेले राज्य असले तरी त्याच्यातही महिलांच्या प्रगतीचा इंडेक्स वाढताना दिसत आहे.

या लेखात व्यक्त करण्यात आलेले मत आणि विचार हे संबंधित लेखकाचे व्यक्तिगत मत आणि विचार असून त्याच्याशी ‘माझा पेपर’ सहमत असेल असे नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे या संदर्भात कोणताही वाद उद्भवल्यास त्यास ‘माझा पेपर’ जबाबदार राहणार नाही; याची कृपया नोंद घ्यावी.

Leave a Comment