
रोम : तब्बल २८ वर्षांनी उत्तर इटलीतील ओसटाना नावाच्या एका लहानशा गावात एका बाळाचा जन्म झाला असून येथील तुरिन इस्पितळात गेल्या आठवड्यात या बाळाचा जन्म झाला. पाबलो असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या बाळाच्या आगमनामुळे आता गावात मोठा जल्लोष साजरा होत असून आटा गावाच्या वेशीवर एका करकोच्याचे शिल्प उभारण्यात आले आहे. या करकोच्याच्या चोचीत एका निळ्या कपड्यात एक बाळ दिसते आहे.
२८ वर्षांनी हलला या गावात पाळणा
बाळाचा जन्म ही या गावासाठी खूप मोठी घटना असून या गावाची लोकसंख्या गेल्या १०० वर्षांत झपाट्याने कमी होत गेली आहे. खासकरुन दुसऱ्या
महायुद्धानंतर अनेक जण हे गाव सोडून इतरत्र स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे १९७२ ते १९८७ मध्ये या गावात फक्त १७ बाळांचा जन्म झाला आहे. आता लोक येथे रहावेत यासाठी येथील काऊन्सिलने लोकांना रोजगारात आणि उद्योग धंद्यात करसवलतीसारख्या अनेक सवलती दिल्या आहेत. पाबलोचे कुटुंबीयसुद्धा याच कारणामुळे या गावात राहिले. इटलीत अनेक गावांत लोकसंख्या घटण्याची समस्या आहे.
