विदेशी वंशाच्या महिलेने केली आहे परमवीर चक्राची रचना!

paramvir-chakra
मुंबई – भारताचा सर्वोच्च वीर सन्मान म्हणजे परमवीर चक्र. आपल्या देशासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावली त्यांना दिला जाणारा हा सर्वात मोठा सन्मान असून या परमवीर चक्राचा इतिहास देखील तेवढाच रंजक आहे. या सन्मानाने आतापर्यंत २१ जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

२६ जानेवारी १९५० ला या पुरस्काराची सुरुवात झाली होती. आतापर्यंत चार युद्धे झाली आहेत परंतु फक्त २१ जणांनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यावरुनच पुरस्काराचे महत्व लक्षात येऊ शकते. २१ सैनिकांपैकी १४ जणांना हा पुरस्कार मरणोप्रांत दिला गेला आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा प्रवास गणतंत्र बनण्याकडे सुरू झाला. ज्या सैनिकांनी १९४७-४८ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात आपले शौर्य गाजवले त्यांना सन्मानित करता यावे त्यासाठी परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र यांची घोषणा करण्यात आली. १९५२ ला अशोक चक्राची घोषणा करण्यात आली.

परमवीर चक्राचा इतिहास – ब्रिटीशांच्या काळात सर्वोच्च वीर पुरस्कार हा व्हिक्टोरिया क्रॉस समजला जात असे. आपल्या राज्यकर्त्यांनी हा पुरस्कार त्याच दर्जाचा एक पुरस्कार असावा असे ठरवून सुरू केला. व्हिक्टोरिया क्रॉस इतकाच या पुरस्काराला सन्मान असून लेफ्टनंट पदापेक्षा कमी पद असलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळाल्यास त्यांना पेंशन आणि नगदी रक्कम सुद्धा दिली जाते.

एका विदेशी वंशाच्या महिलेने परमवीर चक्राचे डिजाईन केले असून सावित्रीबाई खानोलकर यांच्यावर भारतीय सेनेने परमवीर चक्र बनविण्याची जबाबदारी सोपवली होती. इवावोन लिंडा मेडे डे मारोस असे त्यांचे खरे नाव होते. कॅ. विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला आणि हिंदू धर्म स्वीकारला. त्यांनीच परमवीर चक्राचे डि़जाइन तयार केले होते. त्यांनी हा पुरस्कार बनविण्याचा जेव्हा विचार सुरू केला तेव्हा त्यांच्या डोक्यात एक संकल्पना होती की हा पुरस्कार भारतीय मूल्ये आणि परंपरा यांचे निदर्शक असावे. त्यांनी अनेक पौराणिक संदर्भांचा अभ्यास करून परमवीर चक्रावर इंद्राचे हत्यार वज्र टाकले. हे हत्यार बनावे म्हणून महर्षि दधिचींनी आपली हाडे दान केली होती. त्यांच्या त्यागाचे प्रतीक आणि वज्राचा कठोरपणा लक्षात ठेऊन परमवीर चक्राची निर्मिती केली होती.

Leave a Comment