घोरी पंथाच्या पाईकांसाठी…

ghori
घोरी पंथ म्हणताच आपल्या डोळ्यासमोर एकदम महंमद घोरी उभा राहत असेल. परंतु अलीकडे हा घोरी पंथ फार प्रसिध्द झाला आहे. तो महंमद घोरीचा नाही. तो घोरणार्‍यांचा आहे. काही काही लोक झोपेत घोरत असतात. घोरणे ही घोरणार्‍यांसाठी आपत्ती नसते तर ती घोरणार्‍यांच्या शेजारी झोपणार्‍यांसाठी असते. कारण घोरणारा बिनघोरपणे घोरत राहतो आणि त्याच्या शेजार्‍याची झोप मोडत असते. अशा झोपमोडीतून अमेरिकेमध्ये अनेक संसारसुध्दा मोडले गेले आहेत. कारण शांत झोपणार्‍या बायकोला घोरणारा नवरा नकोसा वाटतो आणि त्या आधारावर ती घटस्फोट मागते.

घोरणार्‍या लोकांची एक गंमत असते. त्यांचे घोरणे त्यांना ऐकू येत नाही. जेव्हा त्यांच्या घोरण्याने झोपमोड होणारे लोक त्यांच्या घोरण्याविषयी तक्रार करतात तेव्हा त्याला आश्‍चर्य वाटते कारण आपण घोरत असतो हे त्यांनाच माहीत नसते. कारण त्यांचे घोरणे त्याला ऐकू येत नसते. म्हणून लोक जेव्हा आपल्याला मोहंमद घोरी म्हणतात तेव्हा अशा घोरी पंथियांनी आपल्या घोरण्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत.

वाढलेले वजन हे घोरण्याचे महत्त्वाचे कारण आहे. विशेष म्हणजे घोरणार्‍या १०० लोकांची पाहणी केली असता त्यातले ८० घोरी हे पुरुष असल्याचे आढळले म्हणजे मुख्यत्त्वे घोरणे हा पुरुषांचा आजार आहे. वजन वाढत चालले की मध्यमवयीन पुरुष घोरायला लागतात. त्याशिवाय घोरणे हे विविध आजारांशी निगडित असते. विशेषतः दारू पिणारे आणि सिगारेट ओढणारे लोक अधिक घोरतात. विविध प्रकारच्या ऍलर्जींनी बाधित असणार्‍या लोकांनाही घोरण्याचा विकार जडलेला असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे घोरणे हे तुमच्या झोपण्याच्या स्थितीवरसुध्दा अवलंबून असते. डाव्या कुशीवर झोपल्यास घोरणे कमी होते.

Leave a Comment