विश्‍वव्यापी भारतीय

vikhe-patil
नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीमध्ये ज्या कुटुंबाचे नाव आघाडीवर घेतले जाते त्या विखे-पाटील कुटुंबातील निला अशोक विखे या तरुणीने स्वीडनमध्ये जाऊन मोठा पराक्रम गाजवला आहे. महाराष्ट्राची ही कन्या स्वीडनच्या पंतप्रधानांची सल्लागार म्हणून नेमली गेली आहे. स्वीडनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात ती गेल्या काही दिवसांपासून सल्लागार म्हणून काम करत आहे. निला विखे यांनी स्वीडनच्या गोथेनबर्ग या विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि कायदा या पदव्या संपादन केल्या आणि नंतर त्यांनी एमबीए पूर्ण केले. अशी शैक्षणिक कारकिर्द असली तरी घराण्याची राजकीय परंपरा त्यांना गप्प बसू देईना. त्यांनी तिथेही राजकारणात भाग घेतला आणि ग्रीन पार्टी या पक्षाच्या माध्यमातून त्या राजकारणात सक्रिय झाल्या. एवढेच नव्हे तर त्यात त्यांनी यशही मिळवले. त्याचाच परिणाम म्हणून त्या आताा पंतप्रधान कार्यालयाच्या सल्लागार झाल्या आहेत.

अशाच प्रकारे भारतातले १ कोटी ६० लाख पेक्षाही अधिक तरुण जगाच्या विविध देशांमध्ये, विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. जगाच्या पाठीवर अशा रितीने परदेशात जाऊन महत्त्वाची पदे भूषवणार्‍या देशात भारताचा पहिला क्रमांक आहे. या बाबतीत चीन भारताच्या नंतर आहे. आपल्या देशातले हे बुध्दीमान तरुण परदेशात जातात ही गोष्ट योग्य की अयोग्य यावर नेहमीच चर्चा होत असते परंतु भारताच्या उद्योग विश्‍वात एवढ्या बुध्दीमान तरुणांना सामावून घेण्याची नाहीतरी क्षमता नाहीच त्यामुळे १२५ कोटींपैकी २ कोटी लोक परदेशी गेले म्हणून काही बिघडत नाही. उलट परदेशात नोकर्‍या करणारे तरुण तिथे कमावलेल्या पैशाचा काही भाग भारतात पाठवतात. गतवर्षी या मार्गातून भारताला ७५ अब्ज डॉलर मिळालेले आहेत. म्हणजे एक प्रकारे आपल्या देशातले तरुण परदेशात जाऊन कमाईच करत आहेत.

भारताच्या प्रगतीचे हे लक्षण आहे. त्यामुळेच येत्या दहा ते पंधरा वर्षात सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर भारतीयांची कमांड असेल असे बोलले जात आहे. अमेरिकेत अनेक कंपन्यांचे सीईओ हे भारतीय आहेत. त्यामध्ये पेप्सीकोला, मायक्रोसॉफ्ट अशा विश्‍वव्यापी कंपन्यासुध्दा आहेत. अमेरिकेच्या संगणक उद्योगात आघाडीवर असलेल्या सिलीकॉन व्हॅलीमध्ये ६० ते ७० टक्के मनुष्यबळ हे भारतीय आहे. भारतीय लोक बुध्दीमत्तेच्या बाबतीत आणि प्रशासन कौशल्यात जगात अव्वल आहेत ही गोष्ट आता जगाला मान्य व्हायला लागली आहे. त्याचेच हे लक्षण आहे.

Leave a Comment