पाकिस्तनातील दहशतवाद

bacha-khan
पाकिस्तानची अवस्था भस्मासुरासारखी झाली आहे. त्यांनी इतर देशांना त्रास देण्यासाठी निर्माण केलेला आणि वाढवलेला दहशतवाद आता त्यांच्यावर उलटला आहे. अन्य देशात घातपाती कारवाया करण्यासाठी निर्माण झालेल्या संघटना आता आपल्याच देशामध्ये लोकांचे बळी घ्यायला लागल्या आहेत. पाकिस्तानच्या पेशावर शहरामध्ये एका विद्यापीठात अतिरेक्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात २० लोक ठार झाले. पाकिस्तानने आजवर भारतात दहशतवादी कारवाया केल्या. परंतु गेल्या वर्षदीडवर्षात भारताच्या अंतर्गत भागात होणार्‍या या पाकिस्तानच्या या दहशतवादी कारवाया बर्‍याच कमी झाल्या आहेत आणि आता त्यांच्याच देशामध्ये त्या वाढायला लागल्या आहेत. पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला नाही असा एकही दिवस जात नाही.

पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांनी आपल्याकडे ६०० आत्मघातकी मानवी बॉम्ब तयार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर विश्‍वास बसावा अशी स्थिती आहे. पाकिस्तानातले हे मानवी बॉम्ब आपल्याच देशाला भाजून काढत आहेत. या हल्ल्यात हल्लेखोरांनी निर्दयतेचा एवढा कळस गाठला की पाकिस्तानात अलीकडच्या काळात झालेल्या कोणत्याही हिंसक हल्ल्याची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना गाठून त्यांच्या डोक्यात गोळीबार करून अतिरेक्यांनी त्यांना ठार मारले आहे.

या हल्ल्यात ५० लोक जखमी झाले आहेत. मात्र त्यात बरेच जखमी हे गंभीर आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काव्य गायनाचा कार्यक्रम सुरू असतानाच हा हल्ला झाला. म्हणजे तिथे उपस्थित असलेले लोक आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी जमा झाले होते आणि त्यांना आपल्यावर असा हल्ला होईल याची तीळमात्र जाणीव नव्हती. सुमारे ३ हजार विद्यार्थी तिथे एकत्र जमले होते. असा मोठा जमाव बंदिस्त जागेत एकत्र आला असतानाच दहशतवाद्यांनी त्यावर हल्ला केला. त्यामुळे हल्ल्याला बळी पडलेल्या लोकांना सुखरूपपणे बाहेर पडणेसुध्दा मुश्कील झाले. म्हणून जखमींचा आकडा मोठा आहे. हा हल्ला झाल्याबरोबर सुरक्षा रक्षकांनी विद्यापीठाला घेराव केला आणि हा हल्ला करणार्‍या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. म्हणून त्यातल्या त्यात कमी मनुष्यहानी झाली. दहशतवादी मारले गेले नसते तर या ठिकाणी फार मोठा रक्तपात झाला असता. हा हल्ला तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा दावा या संघटनेनेच केला आहे.