
नवी दिल्ली – पिपावाव डिफेन्स आणि ऑफशोर इंजिनियरिंग कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापन मंडळाचा ताबा रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडने आपल्याकडे घेतला असून यासंबंधात रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडने निवेदन जारी केले आहे. आता या कंपनीचे अनिल अंबानी प्रमुख होणार आहेत. रिलायन्सने पिपावावच्या ३६.५ टक्के इक्विटीची खरेदी केली आहे. आता या कंपनीचे नामांतर करण्यात येणार असून ते ‘रिलायन्स डिफेन्स आणि इंजीनियरिंग लिमिटेड’ असे करण्यात येणार आहे. पिपावाव कंपनी जहाजबांधणी, दुरुस्ती, देखरेख क्षेत्रातील अग्रेसर कंपनी आहे.
रिलायन्स इन्फ्राकडे पिपावाव डिफेन्सची मालकी
संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे अधिग्रहण आहे. रिलायन्सकडून पिपावावचे अधिग्रहण करण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पुढील पाच वर्षामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये १,२०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. माझगाव डॉक लिमिटेडचे माची प्रमुख आणि महासंचालक, निवृत्त व्हाईस ऍडमिरल एच. एस. माल्ही यांना पुर्णवेळ सीईओ आणि संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
माल्ही यांना भारतीय नौदलाचा ३६ वर्षांचा अनुभव असून निवृत्त एअर चीफ मार्शल फली होमी मेजर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांना स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये रिलायन्स डिफेन्सला संरक्षण क्षेत्रासंबंधात १२ महत्त्वाच्या परवानग्या मिळाल्या आहेत. यामध्ये विमान उत्पादन, हेलिकॉप्टर निर्मिती, मानवरहित वाहने, कॉम्बट वाहने, नाईट व्हिजन उपकरणे, सेन्सर यांचा समावेश आहे.
लष्करावर करण्यात येणारा खर्च आणि युद्धसामुग्रीच्या आयातीमध्ये भारताची जगातील पहिल्या 10 देशांमध्ये समावेश होतो. जगाची तुलना करता भारतीय सैन्य तिसऱया स्थानी, हवाईदल चौथ्या, तर नौदल सातव्या स्थानी आहे. 2013-14 मध्ये भारताने लष्करावर 50 बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत.
