देशाला या गावाने दिले आहेत ४७ आयपीएस अधिकारी

ips
जौनपुर- ग्रामीण भागातील तरूण अलिकडे कामधंदा, नोकरी करण्यासाठी आपले गाव सोडून शहराची वाट धरू लागला आहे. फक्त नोकरीच नाहीतर शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरांकडे विद्यार्थी जाताना बघायला मिळतात. ग्रामीण भागातील शिक्षणाला स्पर्धेच्या युगासाठी पुरक असे मानले जात नाही, म्हणून ही अवस्था तयार झाली असेल. पण ग्रामीण भागात राहून आणि शिक्षण घेऊनही मोठे होता येते हे जौनपुर जिल्ह्यातील माधोपट्टी या गावातील अनेकांनी सिद्ध केले आहे. देशाला फक्त ७५ घरांच्या या गावाने ४७ आयपीएस अधिकारी दिले आहेत.

आयपीएस अधिका-यांचे गाव म्हणून माधोपट्टी हे गाव ओळखले जाते. आज देशाच्या वेगवेगळ्या भागात या गावातील हे अधिकारी नोकरी करत आहेत. या गावात फक्त आयपीएस अधिकारीच आहेत असे नाहीतर देशातील मोठ मोठ्या संस्थांमध्येही येथील तरूण कार्यरत आहेत. भाभा संस्थेत आणि वर्ल्ड बँकेत या गावातील तरूण नोकरी करीत आहेत.

भारतातील प्रख्यात शायर वामिक जौनपुर यांचे वडिल मुस्तफा हुसैन यांनी १९१४ मध्ये पीसीएस परीक्षा पास करून प्रशासकिय सेवेत नोकरी सुरू केली होती. त्यानंतर १९५२ मध्ये इंदू प्रकाश सिंहने आयएएस परीक्षेत दुसरी रॅंकिंग मिळवली होती. तेव्हापासून येथील तरूणांना प्रोत्साहन मिळाले. इंदू प्रकाश स्वत: वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत होते. मोठ्या शहरातच मोठे यश मिळवण्यासाठी जावे लागते असे काही नाही, हे या गावाकडे पाहून वाटते. लहान गावातूनही चांगले शिक्षण मिळवता येते आणि त्यातून मोठे काम करता येते हे या गावाने समोर आणले आहे.

Leave a Comment