दारूबंदी करा पण…

daru
बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्या पाठिंब्यावर नितीशकुमार यांचे सरकार सत्तेवर आले. नितीशकुमार यांना सध्या आपली राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करण्याच्या कल्पनेने पछाडलेले आहे. कारण ते नरेंद्र मोदी यांचा खास द्वेष करत असतात आणि या प्रतिमेच्या कल्पनेतूनच त्यांनी सत्तेवर येताच बिहारमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला. वास्तविक पाहता नितीशकुमार गेल्या काही वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी कधी दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यांच्या पूर्वी लालूप्रसाद यादव यांची सत्ता होती. त्यांनीही कधी दारूबंदीचा आग्रह धरलेला नव्हता. परंतु आताच या दोघांच्या सरकारला दारूबंदीची गरज का भासली याचे कसलेही तर्कशुध्द कारण त्यांनी दिलेले नाही. बिहारमध्ये गेली २५ वर्षे या दोघांचेच राज्य असताना बिहारची अशी काही वेगळी स्थिती होती आणि आजच ती अशी काय बिघडली आहे की ज्यामुळे सत्तेवर येताच नितीशकुमार यांना दारूबंदीची घोषणा करण्याची घाई व्हावी.

नितीशकुमार जसे नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द खास जळफळत असतात तसेच मोदींवर जळफळणारा एक वर्ग भारतामध्ये आहे. त्यामध्ये विशेषतः समाजवादी आणि साम्यवादी यांचा जास्त भरणा आहे. पुरस्कार वापसीच्या ढोंगी खेळामध्ये हेच लोक आघाडीवर होते. ज्यांना अजूनही मोदी पंतप्रधान झाले आहेत ही गोष्ट पचलेली नाही. तेव्हा अशा लोकांनी आता नितीशकुमार विरुध्द नरेंद्र मोदी यांच्यामध्ये तुलना करायला सुरूवात केली आहे आणि अशाच काही शेलक्या डाव्यांनी नितीशकुमार यांच्या दारूबंदीची मुक्तकंठाने स्तुती करायला सुरूवात केली आहे. एवढे करून त्यांची बौध्दिक खाज बुझत नाही. त्यांनी आता महाराष्ट्रात अशी दारूबंदी होत नाही म्हणून महाराष्ट्राच्या सरकारला टोमणे मारायला सुरूवात केली आहे. बिहारमध्ये दारूबंदी झाली आता महाराष्ट्रात कधी असे प्रश्‍न निर्माण करून त्यावर चर्चाही झडायला लागल्या आहेत. वास्तविक पाहता बिहारमध्ये दारूबंदी झाली तेव्हा आंध्रात कधी, कर्नाटकात कधी, दिल्लीत कधी असे अनेक राज्यांच्या निमित्ताने प्रश्‍न निर्माण करता येतात परंतु या लोकांनी केवळ महाराष्ट्रापुरताच हा प्रश्‍न निर्माण केला आहे. कारण केंद्रात नरेंद्र मोदी झाल्यापासून त्यांना जसा ठसका लागला आहे. तसाच तो महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यामुळे जास्त जोराने लागला आहे. त्यातूनच आता महाराष्ट्र शासनाच्या मद्य विषयक निर्णयाची विनाकारण चर्चा करायला त्यांनी प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रात दारूबंदी लागू केलीच पाहिजे असेच कोणी म्हणेल.

महाराष्ट्रातच कशाला पण पूर्ण देशातच दारूबंदी व्हायला ना नाही. कारण दारूपायी गरिबांच्या संसाराचे धूळधाण होत असते. दारूपायी माणसाचे नैतिक पतनही होते. मात्र सर्वच राज्य सरकारे दारूबंदीचा अंमल करत नाहीत. कारण दारूबंदी लागू केल्याने दारू बंद होत नाही. ती चोरट्या मार्गाने चालूच राहते. शिवाय दारूबंदी केली म्हणजे सरकारचे अबकारी कराचे उत्पन्नही बुडते. आजवर ज्या ज्या राज्यांनी दारूबंदी लागू केलेली नाही त्या सर्व राज्यांनी ती लागू न करण्यामागे उत्पन्न बुडते हेच कारण असल्याचे म्हटले आहे. हाही युक्तिवाद चुकीचा आहे. कारण दारूबंदी केल्यास अबकारी कराचे उत्पन्न बुडते हे खरे आहे. परंतु ते वरकरणी होणारे नुकसान आहे. प्रत्यक्षात अबकारी कर बुडत असला तरी समाजाचे दारूमुळे होणारे नुकसान हे त्यापेक्षा जास्त असते आणि ते अप्रत्यक्ष असते. म्हणून दारूबंदी आवश्यकच आहे. आज समाजात दारूला प्रतिष्ठा मिळत आहे. दारू हे व्यसन नव्हे असे म्हणणारे अनेक पुरोगामी आणि विचारवंत पुढे येत आहेत. परंतु त्यांचे सारे युक्तिवाद फोल आहेत.

दारूबंदी हवीच. तिच्यामुळे दारू सहजी उपलब्ध होत नाही आणि निदान काही लोक तरी कायद्याच्या भीतीपोटी तिच्यापासून दूर राहतात. या सगळ्या गोष्टी खर्‍या आहेत. परंतु महाराष्ट्रात वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात दारूबंदी आहे, ती खरोखर लागू आहे का याची पाहणी झाली पाहिजे. कारण दारूबंदी करायची असेल तर ती पूर्ण देशभर केली पाहिजे. एका विशिष्ट राज्यात आणि एका विशिष्ट जिल्ह्यातच ती केली तर ती करून न केल्यासारखी होते. महाराष्ट्रातच गुटखा बंदी आहे परंतु महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये ती बंदी नाही. त्यामुळे त्या राज्यातून महाराष्ट्रात सर्रास गुटखा आणला जातो आणि त्यामुळे महाराष्ट्रातली गुटखा बंदी हा चेष्टेचा विषय झाला आहे. दारूचे तसेच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे पण भंडारा जिल्ह्यात नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातले शेवटचे गाव ओलांडून जाऊन भंडार्‍यात दारू प्यायला बरेच लोक गर्दी करतात आणि भंडार्‍यात दारू पिऊन चंद्रपुरात येतात. १९९५ साली आंध्र प्रदेशामध्ये अशीच दारूबंदी लागू करण्यात आली होती. ती दारूबंदी अशा सीमेमुळेच निरर्थक ठरली. त्यामुळे शेवटी ती उठवावी लागली. तेव्हा दारूबंदीबाबत वाद नाही. ती करायचीच असेल तर पूर्ण देशभर करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की दारू कधीच पूर्ण बंद होणार नाही. दारूबंदी पेक्षा दारूवर कायद्याने नियंत्रण ठेवा. ती पूर्ण बंद करण्याच्या नादात तिची कुचेष्टाच होते.

Leave a Comment