रिलायन्स नौसेनेसाठी बांधणार जहाज

anil-ambani
विशाखापट्टणम : रिलायन्स उद्योग समूह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया अभियानाच्या अंतर्गत ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून भारतीय नौसेनेसाठी जहाज बांधणार असून या आशयाचा रिलायन्स आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये करार झाला आहे.

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख अनिल अंबानी आणि आंध्राचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी संबंधित सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. आंध्रप्रदेश गुंतवणूक समिटमध्ये हा करार करण्यात आला असून या वेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रमुख उपस्थिती होती. विशाखापट्टणमपासून ७० किलोमीटर अंतरावरील रामबिली या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार असून आंध्रप्रदेशात एकाच ठिकाणी एका कंपनीने इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय नौदलाला येत्या १५ वर्षांत पाणबुड्या आणि विमानवाहू नौकांची आवश्यकता भासणार असून त्यासाठी ३ लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नव्या प्रस्तावित प्रकल्पामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार असून अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीही होणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्रोत आणि निर्मिती या दृष्टीने हा प्रकल्प जागतिक दर्जाचा राहणार असून या प्रकल्पामुळे गुजरातमधील पिपवाव या ठिकाणी असलेल्या रिलायन्सच्या अशाच प्रकल्पाची मदत होणार आहे. धोरणात्मक निर्णय घेऊन नौसेनेसाठी आधुनिक साहित्य तयार करण्यात येणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. मेक इन इंडिया उपक्रमाचे रूपांतर मेक इन आंध्र प्रदेश या उपक्रमात करण्यास या उपक्रमाची मदत होणार असल्याचे मत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केले.

Leave a Comment