गोड उद्योगांना कडू डोस

factory
महाराष्ट्रातले साखर कारखाने विशेषतः सहकारी साखर कारखाने म्हणजे जगातला एक अभूतपूर्व प्रयोग असल्याचा दावा आजवर केला जात होता आणि सातत्याने त्याचे कौतुक केले जात होते. अर्थात ज्या लोकांनी हा प्रयोग सुरू केला आणि त्याचे राजकीय लाभ घेतले त्यांच्याकडूनच हे कौतुक होत होते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे आणि काय असेल या विषयी खरोखर आत्मसंधोशन कधीच केले जात नव्हते. विशेषतः राजकारणामध्ये दंग असलेल्या लोकांना आत्मसंशोधन परवडत नाही. समाजात निर्माण करून सोडलेले खरे आणि खोटे भास हाच त्यांच्या राजकारणाचा आधार असतो आणि वस्तुस्थितीच्या भासाशी वैर असते. म्हणूनच आत्मसंशोधन वगैरे गोष्टी राजकारण्यांना परवडत नाहीत. म्हणून महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाविषयी कधीच आत्मसंशोधन केले गेले नाही.

कोणी तसा प्रयत्न केला तर त्याला या राजकारणी मंडळींनी ग्रामीण महाराष्ट्राचे शत्रू ठरवून टाकले. आत्मसंशोधन करण्याचा आग्रह धरणार्‍यांना काही वेळा बहुजन समाजाचे आणि शेतकर्‍यांचे वैरीही मानण्यात आले. पण वस्तुस्थिती अशाप्रकारे दडपली तरी ती तिचे परिणाम मात्र घडवत असतेच. तसेच झालेले आहे. आजवर चर्चा झाली नसली तरी साखर कारखानदारीला म्हणावे तसे स्थैर्य आलेले नाही. महाराष्ट्रातले साखर कारखाने हे शेतकर्‍यांनी चालवलेले साखर कारखाने आहेत. त्यांचे स्वरूप शेतकर्‍यांनी एकत्र येऊन स्वतःचा ऊस गाळावा असे आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची अस्थैर्य शेवटी शेतकर्‍यांच्याच मुळावर आले आहे. सहकारी साखर कारखाने सुरू करण्यामागे ऊसाला चांगला भाव मिळावा हा हेतू होता. परंतु तोच साध्य झालेला नाही. त्यामुळे साखर कारखानदारीला शेतकर्‍यांची स्थिती सुधरवता आलेली नाही.

साखर कारखान्याच्या व्यवस्थापनांना चांगले व्यवस्थापन करता येत नाही आणि कारखाने तोट्यात जातात. त्यातच साखरेचे भाव खालीवर होत जातात आणि त्या सगळ्यांचे तोटे शेतकर्‍यांच्या ऊसाला कमी भाव देऊन भरून काढले जातात. आता मात्र महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांच्या उसाला किमान आधार मूल्याएवढा भाव न देणार्‍या १२ साखर कारखान्यांचे परवाने निलंबित केले आहेत. त्याच बरोबर अन्यही २५ साखर कारखान्यांवर या संबंधात निरनिराळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या उपायांमुळे साखर कारखानदार चिडणार आणि महाराष्ट्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढत आहे असा आरोप करणार मात्र सरकारने न डगमगता आणि अशा आरोपांची दखल न घेता आपली कारवाई शेवटास नेली पाहिजे कारण तिच्यातूनच साखर कारखानदारी सुधारणार आहे.

Leave a Comment