आता हिंदुत्वाची गर्जना

raj-thackray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा घोष करायला सुरूवात केली आहे. हिंदी भाषकांविषयी द्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात पुरेसे यश येत नाही याचा अनुभव घेतल्यानंतर आता त्यांनी हिंदुत्वाची कास धरण्याचे ठरवलेले दिसत आहे. एकंदरीत त्यांनी हिंदुत्ववाद म्हणले काय की महाराष्ट्रवाद म्हटले काय त्यांचा राजकारणाचा बाज नकारार्थी असल्यामुळे त्यांना राजकारणात कधीही चिरस्थायी स्वरूपाचे यश मिळण्याची शक्यता नाही. परंतु राजकारणातले हे सकारात्मक विचारांचे महत्त्व त्यांना कधीच पटणार नाही आणि ते सातत्याने अशी तिकडमबाजी करतच राजकारण करत राहणार आहेत. राजकीय पक्ष स्थापन करून त्याचा राजकीय क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी जी वैचारिक क्षमता असावी लागते ती राज ठाकरे यांच्याकडे तीळमात्र नाही. त्यामुळे त्यांना अशा उड्या मारतच राजकारण करण्यात धन्यता वाटत राहणार आहे आणि या उपरही त्यांच्या कथित चाहत्यांना राजसाहेबांचे डावपेच हे मोठे चातुर्याचे वाटत राहणार आहेत.

२००५ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष निर्माण केला. शिवसेनेमध्ये आपल्यापेक्षा उध्दव ठाकरेंना जास्त महत्त्व दिले जाते या एकमेव चिडीपोटी त्यांनी हे पाऊल उचलले होते. मनसे पक्षाच्या स्थापनेमागे केवळ अहंकार हाच एक आधार होता. राज ठाकरे हे उध्दव ठाकरेंपेक्षा सरस आहेत म्हणजे नेमके काय तर ते बाळासाहेबांसारखे भाषण करतात आणि आक्रमकपणे तसेच शिवराळ भाषण करतात. त्याच एका भ्रमात ते स्वतःला अधिक सक्षम मानत होते. बाकी आपल्या भोवतालच्या समस्यांची जाण, त्यांचा अभ्यास आणि सामाजिक विषयाचा व्यासंग याबाबतीत राज ठाकरे यांच्या खात्यावर फारसे काही जमा नव्हते. उध्दव ठाकरे यांच्या खात्यावरही फार जमा नाही. याबाबतीत दोघेही सारखेच आहेत. परंतु बाळासाहेबांसारखे भाषण या एका मुद्यावरून राज ठाकरे स्वतःला सरस समजत होते. पण तरीही बाळासाहेबांनी उध्दवलाच आपले वारस म्हणून जाहीर केले. याचा राग मनात धरून राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. शिवसेनेतून बाहेर पडलेला एखादा पक्ष कॉंग्रेसवाल्यांना हवाच होता. कारण शिवसेनेला जेवढे धक्के बसतील तेवढा आपला राजकीय फायदा होईल हे साधे राजकीय गणित त्यांना समजत होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेले नारायण राणे आणि राज ठाकरे हे भलतेच मोठे नेते आहेत असे वातावरण तयार केले.

नारायण राणे यांना तर कॉंग्रेस पक्षातच घेऊन टाकले. त्यामुळे राणे यांच्या मनात आपण फार मोठे नेते आहोत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारे खरेखुरे एकमेव नेते आहोत असा भ्रम निर्माण झाला. आता त्या भम्राचा निरास झालेला आहे आणि कॉंग्रेसमध्ये आणून त्यांना पूर्ण निष्प्रभ करण्याचा कार्यक्रम कॉंग्रेस पक्षाचे नेते व्यवस्थित राबवत आहेत. याबाबतीत राज ठाकरे थोडे हुशार निघाले. ते नारायण राणे यांच्याप्रमाणे कॉंग्रेसमध्ये गेले नाहीत. मात्र त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यांना कॉंग्रेसपक्षाने बरेच नैतिक बळ दिले. भाजप आणि सेना युतीला पाण्यात पाहणार्‍या वृत्तपत्रांनी तर राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे परिवर्तन घडवू शकणारे थोर नेते अशी त्यांची प्रतिमा तयार केली. प्रत्यक्षात राज ठाकरे हे साधारणतः नगरसेवक होण्याच्या पात्रतेचे आणि अतीशय सुमार दर्जाचे पुढारी आहेत. परंतु त्यांनाही आपण महाराष्ट्राच्या उध्दारासाठी जन्माला आलो आहोत असे वाटायला लागले. ते मध्येच गुजरातमध्ये जाऊन आले आणि आपण महाराष्ट्राचा उध्दार गुजरातसारखा करू असे फोल दावे करायला लागले.

महाराष्ट्राचे नरेंद्र मोदी होण्याचे स्वप्न बघायला लागले. पण प्रत्यक्षात त्यांना प्रशासकीय आणि सामाजिक कार्याचा कसलाच अनुभव नव्हता. मात्र उपरोधिक भाषेतील शिवीगाळ करणारे भाषण करणे एवढ्या एका भांडवलावर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमाच्या पूंंजीवर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना १३ जागा मिळाल्या. पुढे मात्र त्यांच्या क्षमता आणि मर्यादा या जनतेला उघडपणे दिसायला लागल्या. विशेषतः नाशिक महानगरपालिकेत राज ठाकरे आणि मनसे यांचा वकूब चांगलाच उघडकीस आला. त्यामुळे २००९ नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत राज ठाकरे यांचा करिश्मा कधीच दिसून आला नाही. परिणामी आता राज ठाकरे संपण्याच्या बेतास आहेत. कधी तरी भाषण करावे, कोणाला तरी शब्दाने ठोकून काढावे आणि झंझावाती दौरा केल्याचे सोंग आणून सभा गाजवाव्यात या पलीकडे त्यांना काही येत नाही हे दिसायला लागले आहे. मनसेची स्थापना केली तेव्हा शिवसेनेपेक्षा अधिक कट्टर मराठीवादी होऊन राजकीय फायदा करून घ्यावा असा डाव त्यांनी टाकला. परंतु तो फारसा फायदेशीर ठरत हे आता दिसायला लागले आहे.

आता राज ठाकरे यांना भाजपाचा हिंदुत्ववादी मतदार भाजपापासून दूर जात असल्याचे दिसायला लागले आहे. तो मतदार आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी त्यांनी आता मराठीवादी भूमिका सोडून हिंदुत्ववादी भूमिका घेण्याचे संकेत द्यायला सुरूवात केली आहे. कै. बाळासाहेब ठाकरे यांचीही राजकीय फरपट अशीच झाली होती. मुळात त्यांनी शिवसेना स्थापन केली ती महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून पण नंतर त्यांना मराठीवादी भूमिकेच्या मर्यादा कळायला लागल्या आणि ते हिंदुत्ववादी बनले. नेमकी राज ठाकरे यांची फरपट नेमकी अशीच जारी आहे. त्यामुळे जे बाळासाहेबांचे झाले तेच राज ठाकरे यांचे होणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे हे त्यांचे कायमचे स्वप्न होऊन बसणार आहे.

Leave a Comment