ही तर केवळ भाषेतली चूक

shripal-sabnis
महात्मा गांधी हा मोठा माणूस होता. असे म्हटले तरी काही बिघडत नाही. हा मोठा माणूस हा उल्लेख अपमानास्पद समजला जात नाही. त्यांचा गौरव करताना एखादे वाक्य असे म्हटले म्हणजे त्यातून गांधीजींना कमीपणा आला असे समजले जात नाही. असा उल्लेख करताना आपण त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी काही आक्षेप नोंदवले असले तरीही काही बिघडत नाही. कारण वैचारिक मतभेद हेही काही आक्षेपार्ह मानले जात नाहीत. पण आपण त्यांच्याविषयी अनुदार उद्गार काढले तर मात्र तो त्यांचा अधीक्षेप मानला जातो. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनिस हे सध्या अशाच एका प्रकरणात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यासंबंधाने वादाचा विषय झाले आहेत.

महाराष्ट्रात जुन्या काळात काही वाद गाजले आहेत. पण त्या वादांत काही मुद्दे होते. पण आता होत असलेले वाद हे मुद्यांवर होत नाहीत. तर वादातले मुद्दे मांडताना वापरल्या जाणार्‍या भाषेवरून होत आहेत. मोदी जगभर दौरे करीत आहेत असे म्हणण्याऐवजी सबनिस म्हणाले, ‘हा माणूस जगभर बांेंबलत फिरत आहे.’ त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता होती असे सांगताना सबनिस म्हणाले, ‘तसे झाले असते तर पाडगावकरांच्या ऐवजी मोदीलाच श्रद्धांजली वहावी लागली असती.’ सबनिसांची चूक काय झाली हे आता लोकांच्या लक्षात यायला काही हरकत नाही. म्हणजे सबनिस मुद्दा मांडण्यात काही चुकलेले नाहीत तर ते भाषेत चुकले आहेत.

ते ज्या परिसरातून आले आहेत त्या परिसरात अशीच भाषा वापरतात. आपल्या प्रेमाच्या माणसाला हाक मारताना, ‘ए रंडकीच्या’ अशी हाक मारतात. ती भाषेची ढब आहे. वास्तविक ही शिवी आहे पण ती शिवी प्रेमापोटी दिलेली आहे. तेव्हा सबनिसांना ‘जगभर दौरे करण्या’साठी ‘बोंबलत फिरणे’ हा शब्द आठवणे आणि जीवाला धोका होता हे सूचित करताना, श्रद्धांजली वहावी लागली असती असे शब्द सुचणे हे त्यांच्यावरच्या बालपणीच्या संस्कारानुसारच आहे. म्हणजे ही भाषेची चूक आहे. तशी ती अन्य कोणी केली असती तर समजून घेता आले असते पण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाकडून भाषेची चूक होणे हे अक्षम्य आहे. या वादातही त्यांना आपली चूक लक्षात आली नाही. आता ते आपली डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारांत आपली गोची होत असल्याची तक्रार करायला लागले आहेत. वास्तविक ही गोची विचारांमुळे होत नाही तर चुकीच्या भाषेमुळे होत आहे. त्यांनी भाषा वापरताना जीभ घसरणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.

Leave a Comment