येन केन प्रकरण…

manish-tiwari
काही लोकांना प्रसिध्दीचा एवढा हव्यास असतो की तिच्यासाठी आपण नेमके काय करत आहोत याचेही त्यांना भान नसते. कॉंग्रेसचे प्रवक्ते माजी मंत्री मनीष तिवारी यांनी या प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे. भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या सरकारला कसलीही कल्पना न देता दिल्लीकडे निघाल्या होत्या. ही २०१२ सालची घटना आता उकरून काढून मनीष तिवारी यांनी ती खरी असल्याचे सांगितले आहे. या माहितीमुळे खळबळ उडण्यापलिकडे काहीही होणार नाही. परंतु त्यातून अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण होतात. याचे भान मनीष तिवारी यांना नाही. आपल्या म्हणण्याला विश्‍वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी त्यांनी त्यावेळी आपण संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य होतो असे सांगितले आहे. थापेबाजी करणारी माणसे कशी वागतात याचा हा एक नमुना आहे. मुळात त्या काळात मनीष तिवारी संरक्षण मंत्रालयाच्या कोणत्याही समितीवर नव्हते. परंतु त्यांनी तसा दावा करून खोटारडेपणाची हद्द केली आहे. एवढ्यावरही ते त्या स्थायी समितीचे सदस्य होते असे वादासाठी गृहित धरले तरी त्यांच्या म्हणण्यावर विश्‍वास ठेवता येत नाही.

कोणत्याही मंत्रालयाशी संबंधित असलेली सांसदीय स्थायी समिती ही लष्कराच्या हालचालींच्या बाबतीत कसलीही माहिती प्राप्त करू शकत नाही. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असलेली विधेयके लोकसभेत चर्चेला येण्यापूर्वी त्या विधेयकांचा मसुदा अंतिम स्वरूपात तयार करण्याचे काम या समितीकडे असते. त्या या समितीमध्ये काम करणार्‍या एखाद्या खासदाराने लष्कराच्या हालचालींच्या संदर्भातील माहिती खरी आहे असे म्हणणे आणि आपली माहिती आपण त्या समितीचे सदस्य असल्यामुळे खरी मानावी असा दावा करणे हे पूर्णपणे बेजबाबदारपणाचे आहे. पण तरीही मनीष तिवारी तसा दावा ठोकत आहेत. सुदैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पक्षानेच त्यांचे म्हणणे खोडून काढले आहे. लष्कराच्या हालचालीची ती बातमी खोटी होती असे तर कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहेच पण मनीष तिवारी त्यावेळी कोणत्याही सांसदीय स्थायी समितीवर नव्हते असाही खुलासा केला आहे. मनीष तिवारी सारख्या काही नेत्यांकडून शिळ्या झालेल्या काही मुद्यांना ताजी फोडणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०१२ साली डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर असताना प्रसिध्द झालेली ती बातमी पूर्णपणे खोटी होती आणि त्यावेळी तसा खुलासाही झाला होता. आता परराष्ट्र राज्यमंत्री असलेले सेवानिवृत्त जनरल व्ही. के. सिंग हे त्यावेळी लष्करप्रमुख होते. त्यांनीसुध्दा लष्कराने दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला ही बातमी सपशेल खोटी असल्याचे दाखवूनही दिले होते.

हे प्रकरण पूर्णपणे मिटलेले असतानाच कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी या जुन्या मुद्याला नवी फोडणी दिली आहे. अतीशय चुकीची बातमी म्हणून निकालात निघालेली ही घटना खरी होती असा नवा शोध मनीष तिवारी यांनी लावला आहे. मात्र हा शोध जाहीर करताना मनीष तिवारी यांनी कसलेही नवे पुरावे समोर ठेवण्याची तसदी घेतलेली नाही. त्यांच्या या नस्त्या उठाठेवीमुळे त्यांच्या या नव्या रहस्योद्घाटनामागे राजकीय कारण असावे असे दिसायला लागले आहे. त्याचे कारण असे की त्यावेळी लष्कर प्रमुख असलेले जनरल व्ही. के. सिंग हे आता केंद्रात मंत्री आहेत आणि अशा रितीने शिळ्या कढीला ऊत आणला की वादाचे वादळ उठते आणि कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीकडे अंगुलीनिर्देश करता येतो. मनीष तिवारी यांचा असा हेतू असला तरीही त्यांच्या पक्षाने मात्र हात झाडले आहेत आणि लष्करी तुकड्यांच्या त्या हालचालींची बातमी पूर्णपणे खोटी होती असे म्हटले आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी खुलासा केला असून पक्ष मनीष तिवारी यांच्याशी सहमत नाही असे स्पष्ट केले आहे.

एकंदरीत मनीष तिवारी हे कॉंग्रेस पक्षात एकाकी तर पडले आहेतच परंतु कॉंग्रेस पक्षातले मतभेदसुध्दा या निमित्ताने पुढे आले आहेत. ही बातमी खरी असो की खोटी असो कॉंग्रेसला ती खरी आहे हे म्हणण्यात अडचण आहे कारण त्यामुळे त्यांच्याच सरकारची अकार्यक्षमता दिसून येण्याची शक्यता आहे. कारण काहीही असो परंतु कॉंग्रेसने ही बातमी नाकारली हे परीने बरे झाले. कारण ही बातमी देण्यात तर वावदूकपणा होताच परंतु तो वाद उकरून काढण्यातसुध्दा बेजबाबदारपणा आहे. मुळात भारतातल्या सर्वोच्च सेवांचे अधिकार भारतीय घटनेने इतक्या कौशल्याने वितरित केलेले आहेत आणि त्यांचे एकमेकांवर असे काही नियंत्रण निर्माण केलेले आहे की लष्कराला सरकारच्या विरोधात कधीच बंड करता येत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात लष्कराचा असा प्रयत्न दुरान्वयानेसुध्दा झालेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लष्कराच्या दोन तुकड्या दिल्लीकडे कूच करत चालत याव्यात आणि त्यांनी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारच्या कसल्याही घटना या तुकड्यांच्या हालचालींच्यापूर्वी घडलेल्या नव्हत्या. या दोन तुकड्या त्यांच्या ठिकाणावरून निघाल्या परंतु तो नेहमीच्या कवायतीचा एक भाग होता. परंतु सनसनाटी बातम्या देण्यास चटावलेल्या त्या पत्रकाराने उठवळपणा करून या कवायतीलाच लष्करी बंडाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. अशा बातम्यातून आपण आपल्या लोकशाहीला धोका पोहोचवत असतो एवढी पोच त्या बातमीदारालाही नाही आणि आता ते प्रकरण उकरून काढून प्रसिध्दीच्या झोतात येण्याचा व्यर्थ प्रयत्न करणार्‍या मनीष तिवारी यांनासुध्दा नाही. सध्या आपल्या देशात बेजबाबदार विधाने करून खळबळ उडवून देण्याची चटकच लोकांना लागलेली आहे त्यातून निष्कारण वाद, गैरसमज निर्माण होतात याचे भान कोणालाच राहिलेले नाही.

Leave a Comment