जातीचा पगडा कायम आहे

honor-killing
महाराष्ट्रात ऑनर किलिंग हा शब्द फारसा प्रचलित नाही पण ऑनर किलिंगमागची जातीच्या अभिमानाची भावना मात्र जागी आहेे. त्यातूनच राज्यात काही ठिकाणी आंतरजातीय विवाहातून काही हत्या झाल्या आहेत. एखाद्या तरुणाने किंवा तरुणीने आपली जात सोडून दुसर्‍या जातीतला जोडीदार स्वतःच्या पसंतीने निवडला आणि त्याच्याशी विवाह केला की त्यामुळे आपल्या जातीला कमीपणा येतो असे मानणारे लोक अजूनही या महाराष्ट्रात आहेत. असे विवाह मुलामुलींच्या आईवडिलांच्या संमतीने किंवा अनुमतीने होत नाहीत. किंबहुना त्यांचा त्यांना विरोधच असतो आणि तो विरोध डावलून हे विवाह होत असतात. त्यामुळे जातीतले लोक केवळ चिडतातच असे नाही तर आईवडिलांना दूषण द्यायला लागतात. त्यातूनच आपल्या मुलीला शिक्षा केली पाहिजे ही भावना वाढते.

या पालकांची मुलगी आपल्या जातीतला वर शोधायचे सोडून दुसर्‍या जातीतल्या तरुणाबरोबर विवाह करून मोकळी झाली हा केवळ त्या पालकांचाच अपमान नसून पूर्ण जातीचाच अपमान आहे, असे बोलले जाते. त्यातून त्या पालकांना कधी कधी जातीतून बहिष्कृतसुध्दा केले जाते. या संबंधात सरकारची काही कायदे प्रभावी नाहीत आणि जे काही कायदे आहेत त्या कायद्याखाली बहिष्काराबद्दल कोणालाही शिक्षा होत नाही. कारण बहिष्कार ही कृतीच कसलाही पुरावा न देणारी असते आणि बहिष्कृत झालेले कुटुंब जातीच्या पंचांच्या विरोधात जाऊन कायद्याचा आश्रय घेत नाही. त्यामुळे त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. काही कुटुंबात झालेल्या आंतरजातीय विवाहामुळे निरनिराळ्या समस्या उद्भवतात. एक मुलगी आंतरजातीय विवाह करून घरातून निघून गेली त्यामुळे ते कुटुंब त्या मुलीचे नाव टाकून देते. एवढेच नव्हे तर ती आम्हाला मेली असे जाहीर करते. तिच्याशी कुटुंबाचा कसलाही संबंध राहत नाही.

एवढ्याने भागत नाही. ज्या कुटुंबात अशी घटना घडते त्या कुटुंबातल्या दुसर्‍या मुलामुलींच्या विवाहामध्ये अडचणी यायला लागतात किंवा तशी शक्यता दिसते. त्यामुळे अशी कुटुंबे फार हाल सहन करत राहतात आणि शेवटी जात पंचायतीला शरण जातात. आजकाल शहरांमध्ये आणि सुशिक्षित कुटुंबांमध्ये आंतरजातीय विवाह बर्‍याच मोठ्या संख्येने व्हायला लागले आहेत. तिथे अशा विवाहांमुळे फार खळबळ माजत नाही. परंतु अशिक्षित समाजात, ग्रामीण भागात आणि जिथे अजून जातीच्या भावना टोकदार आहेत तिथे अशा विवाहांमुळे मोठी खळबळ माजते आणि त्यातून त्या मुला मुलीच्या हत्याही होतात.

Leave a Comment