हायड्रोजन बॉम्बचा धक्का

north-korea
उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब तयार केल्याचा दावा केला आहे. या स्फोटाने जगाच्या राजकारणाला विशेषतः आशिया खंडाच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर कोरियाने कसला तरी स्फोट केला आहे म्हणजे जमिनीच्या आत कसल्या तरी आण्विक साधनाची चाचणी घेतली आहे हे नक्की. परंतु अजूनही अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा स्फोट हायड्रोजन बॉम्बचा नव्हता. कारण उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याची क्षमता अजून विकसित झालेली नाही असे त्यांचे मत आहे. उत्तर कोरियाची ती क्षमता असो की नसो पण हा देश आता आण्विक शक्ती म्हणून पुढची पावले टाकायला लागला आहे हे नक्की.

दुसर्‍या महायुध्दानंतर युरोपातील काही देश आणि अमेरिका यांनीच केवळ अण्वस्त्रे विकसित केली होती. १९६४ साली अशा देशांच्या यादीत चीनचा समावेश झाला आणि चीन हा अण्वस्त्रे तयार करणारा पहिला आशियाई देश ठरला. युरोप खंडातील तीन देश अण्वस्त्र सज्ज आहेत. मात्र युरोप खंडातल्या देशांना निदान तूर्तास तरी युध्दाचे परिणाम लक्षात यायला लागले आहेत आणि त्यामुळे सारा युरोप खंडच आज शांततेच्या मार्गावर जाण्याच्या मनःस्थितीत आहे. त्यामुळे युरोपातील देशांनी अण्वस्त्रे तयार करणे हा जागतिक शांततेसाठी फारसा चिंतेचा विषय नाही. मात्र चीनच्या पाठोपाठ भारत आणि पाकिस्तान यांनीही अणुबॉम्ब तयार केले त्यामुळे अण्वस्त्र सज्ज देशांची आशिया खंडातली संख्या युरोपाच्याही पुढे गेली.

आशिया खंड अण्वस्त्राच्या ढिगांवर राहत असून जोखमीचे जीवन जगत आहे. ही जोखीम केवळ अण्वस्त्रांमुळे आहे असे नाही तर आशिया खंडात आज जी अशांतता नांदत आहे तिच्यामुळे ही जोखीम अधिक गंभीर झाली आहे. पश्‍चिम आशियामध्ये किती हिंसक लढाया सुरू आहे हे आपल्याला माहितच आहे. त्याशिवाय भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये धुसफूस सुरूच आहे. त्याचबरोबर दक्षिण आणि उत्तर कोरिया, चीन, जपान याही एकमेकास लागून असलेल्या देशांमध्ये सीमेचे वाद कायम सुरू आहेत. अफगणिस्तान तर गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने हिंसाचाराने पोळून निघत आहे. अशा सार्‍या अशांत टापूमध्ये एखादा लहान देश अण्वस्त्र सज्जता वाढवत नेतो तेव्हा ती सज्जता अशांतीच्या वातावरणाला अधिक गंभीर करण्यास कारणीभूत ठरू शकतो. उत्तर कोरियाचे अण्वस्त्र सज्जतेतील पुढचे पाऊल प्रामुख्याने दक्षिण कोरियासाठी धोकादायक आहे. कारण या दोन देशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत संघर्ष सुरू आहे.

Leave a Comment