विषमता कमी कधी होणार?

shani-shignapur
महाराष्ट्रात १९६० च्या दशकात दलिताच्या मंदिर प्रवेशावरून मोठे धर्मजागरण झाले. साधारणतः मोठ्या मंदिरातून आता दलितांना किंवा पूर्वास्पृश्यांना प्रवेशबंदी नाही. परंतु खेड्यापाड्यामधून दलित समाज मंदिरापासून दूरच आहे. एखादा दलित माणूस एखाद्या मारुतीच्या मंदिराच्या पायरीवर जरी बसला तरी त्याला सवर्णांकडून मारहाण होते अशा काही बातम्या नित्य ऐकण्यात येतात. शनी शिंगणापूरच्या मंदिरावरून आता असाच वाद जारी आहे. शनी मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून महाराष्ट्रात सामाजिक जीवनामध्ये मोठे वादळ निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यातील सोळशी या गावात पुन्हा एकदा असाच प्रकारे घडला आहे. तिथे महिलांना बंदी केली नाही परंतु महिला दर्शन घेऊन गेल्यानंतर मंदिर गोमूत्राने शुध्द करून घेतले आहे. हिंदू धर्मामध्ये विशेषतः महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी समाजसुधारकांनी समाजाच्या उत्कर्षासाठी अशा प्रकारच्या रूढींच्या विरुध्द संघर्ष उभे केले आणि त्यात धैर्याने सहभागी होऊन समाजाची सुधारणा घडवून आणली.

सध्या अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून अशाच प्रकारचा एक वैचारिक संघर्ष उभा राहिलेला दिसत आहे. खरे म्हणजे हिंदू धर्मात अशा प्रकारचे आदेश कोठे लिहिलेले आहेत असे काही आढळत नाही. आज २५ डिसेंबर हा दिवस भारत सरकार सुशासन दिन म्हणून साजरा करणार आहे. परंतु महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारवंतांच्या दृष्टीने या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. १९२७ साली याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीची होळी केली होती. मनुस्मृती हे विषमतेचे द्योतक आहे. सर्वसाधारण हिंदू लोक धार्मिक आचार म्हणून किंवा सामाजिक नियम म्हणून ज्या गोष्टींचे पालन करतात त्या गोष्टी मनुस्मृतीमध्ये नमूद केलेल्या आहेत. विशेषतः मनुस्मृतीमध्ये जातीय विषमतेचे मोठे समर्थन केलेले आहे. उच्च जातीच्या लोकांनी कनिष्ठ जातीतल्या लोकांशी कसा व्यवहार करावा याचे नियम सांगताना अतीशय विषमता दाखवलेली आहे. त्यातल्या त्यात चातुर्वण्यामध्ये ज्यांचा उल्लेख शूद्र म्हणून केला जातो त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्याचे समर्थन याच ग्रंथामध्ये केलेले आहे. विषमतेच्या ज्वाला केवळ शूद्रांनाच नव्हे तर उच्चवर्णातील महिलांनासुध्दा होरपळून काढत असतात. त्याचे समर्थन याच मनुस्मृतीत केलेले आहे. एकंदरीत मनुस्मृतीमध्ये दाखवलेले सामाजिक विषमतेचे सगळे नियम हिंदू लोक पाळतात. त्यामुळेच हिंदू समाज विषमतेचे पोषण करणारा समाज ठरला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या विषमतेच्या विरोधात रणशिंग फुंकायचे होते. त्यामुळे त्यांनी विषमतेचे प्रतिक झालेली मनुस्मृती जाहीरपणे जाळली. तोही दिवस २५ डिसेंबरचा होता. त्यामुळे सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे अनेक पुरोगामी कार्यकर्ते आज मनुस्मृती दहन दिनसुध्दा पाळत आहेत. नेमक्या याच दिवशी पुन्हा एकदा शनी शिंगणापूरचा विषय पुढे आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे. ती एका पदवीधर युवतीने मोडली आणि महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. खरे म्हणजे शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असावी असे मनुस्मृतीतसुध्दा म्हटलेले नाही. एवढेच काय पण शनी शिंगणापूर वगळता अन्य ठिकाणच्या कोणत्याही शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी नाही. शनी शिंगणापूरच्या मंदिरातच ती कोठून आली. याचा काही लाग लागत नाही. सातारा जिल्ह्यातील एका सोळशी या गावात नंदगिरी महाराजांनी शनीचे मंदिर उभे केले आहे. हे शनी मंदिर म्हणजे प्रति शनी शिगणापूर आहे असा या महाराजांचा दावा आहे. अर्थात ते प्रति शनी शिंगणापूर आहे हा दावा स्वघोषितच आहे. कारण हिंदू धर्मामध्ये अशा दाव्याला पुष्टी देणारी कसलीही अधिकृत यंत्रणा कार्यरत नाही.

कोणीतरी मंदिर उभे करावे आणि ते प्रति बालाजी आहे असे म्हणावे. आणखी कोणीतरी मंदिर उभे करावे आणि ते प्रति पंढरपूर आहे असे म्हणावे. भोळ्या भाविकांनी तसे मानावे आणि आपल्याल प्रचिती आल्याचे सांगावे की लोकांची गर्दी उसळतेच. तेव्हा अशा प्रति शिंगणापूर होण्याच्या दाव्याला कोणी हरकत घेत नाही. मात्र सोळशीच्या या मंदिरात शनी शिंगणापूरचे नियम पाळले जातात आणि या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याचा फलक तिथे लावला जातो. या फलकाच्या विरोधात काल आंदोलन झाले आणि काही महिलांनी मंदिरात प्रवेश करून देवाचे दर्शन घेतले. या मंदिरात सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या महिलांना कोणी अटकाव केला नाही. त्यांचे स्वागतच झाले एका मराठी वृत्तपत्रात प्रसिध्द झाले आहे. या महिलांना कोणी अटकाव केला नसला तरी त्यांच्या जाण्यानंतर नंदगिरी महाराजांनी मंदिर गोमूत्राने शुध्द करून घेतले असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात आले आहे. महिलेच्या प्रवेशाने जे मंदिर अपवित्र होते ते मंदिर गाईच्या लघवीने शुध्द होते असे या धर्मात मानले जाते यापरते या धर्माचे अधःपतन ते कोणते असेल आणि हा समाज आधुनिक युगात कसा तग धरून राहू शकणार आहे?

Leave a Comment