भावनेचे नको, विचारांचे अधिष्ठान हवे

politics
विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते खरोखर त्या पक्षाचे काम कोणत्या भावनेतून करत असतात याचा विचार केल्यास फार चमत्कारिक आणि मनोरंजक गोष्टी समोर येतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते शरद पवार यांचे केवळ भक्तच नव्हे तर अंध भक्त असतात. मात्र ही अंध भक्ती कशातून निर्माण होते याचा शोध घेतल्यास फार विचित्र प्रकार समोर येतात. एका कार्यकर्त्याची पवार साहेबांशी ओळख झाली आणि चार वर्षांनंतर भेटल्यावरसुध्दा त्याचे नाव पवारांनी बरोबर लक्षात ठेवले. तो चार वर्षांनंतर भेटला तेव्हा साहेबांनी त्याला त्याच्या नावाने हाक मारली. त्यावर हा कार्यकर्ता एवढा प्रभावित झाला की तो पवारांचा कायमचा अंकितच होऊन गेला. राजकारणात पवार जे काही करतील तेच तो करतो. पवारांच्या शिवाय तो कसला विचार करत नाही. त्याच्या घरात पवारांची मोठी तसबीर लावलेली आहे. आपण पवारांच्या एवढे आहारी का गेलो याचा त्यानेसुध्दा कधी विचार केलेला नाही. खरे म्हणजे पवारांनी त्याला आपल्या स्मरणशक्तीचा करिश्मा दाखवला होता आणि स्मरणशक्ती ही काही मोठा नेता होण्याची पात्रता नसते. मात्र त्या कार्यकर्त्याला त्याचीच भुरळ पडली. राजकारणात नेहमी असेच होते.

राजकीय कार्यकर्ते म्हणवणारे तरुण भावनेच्या आहारी जाऊन किंवा अन्य कसल्यातरी कारणांनी नेत्यांचे अंकित होऊन जातात. त्या नेत्यांची अन्य पात्रता कशी का असेना? राजीव गांधी यांचे बरेच चाहते त्यांच्या रुपाकडे बघून चाहते झालेले होते. त्यांना मतदान केलेल्या अनेक महिलांनीसुध्दा राजीव गांधी यांच्या पर्सनॅलिटीचा आपल्यावर प्रभाव पडला असे सांगितल्याचे वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले होते. महाराष्ट्रात काही वेडे तरुण राज ठाकरे यांना आपले दैवत मानतात. या मागचे कारण विचारले तर ते राजसाहेबांच्या भाषणांचा उल्लेख करतात. त्यांचे भाषण एवढे सुंदर असते की त्यामुळे आपण मनसेत गेले पाहिजे असे त्यांना वाटायला लागते. राजकीय नेत्यांच्या भाषणामध्ये विरोधकांचा उपहास हे एक मोठे शस्त्र म्हणून वापरले जात असते आणि त्यात राज ठाकरे बरेच वाकब्गार आहेत. विशेषतः आजच्या तरुण पिढीला आवडणार्‍या भाषेत ते आपल्या राजकीय विरोधकांचा उपहास करत असतात. तो भाषण ऐकण्यापुरता श्रवणीय वाटला तरी त्या पोटी आपण राज ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्याची शिफारस करत असतो हा काय वेडेपणा आहे?

वास्तविक राज ठाकरे यांनी एखाद्या ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचासुध्दा अनुभव घेतलेला नाही. ते केवळ चांगले भाषण करतात. (ते भाषण निर्विवादपणे चांगले असतेच असे नाही पण ते काही लोकांना आवडते) चांगले भाषण करणे ही काही मुख्यमंत्री पदाची पात्रता असते का? पण भोळ्याभाबड्या नागरिकांना तेवढी पोच असतेच असे नाही. वास्तविक पाहता हा एक राजकीय प्रबोधनाचा विषय आहे. १९८२-८३ साली आंध्र प्रदेशाच्या राजकारणात एन. टी. रामाराव हे एखाद्या धूमकेतूसारखे उगवले. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचासुध्दा अनुभव घेतलेला नव्हता. परंतु लोकांनी त्यांना विधानसभेत पाठवले. प्रचंड बहुमत मिळवून दिले एवढेच नव्हेतर त्यांना मुख्यमंत्रीसुध्दा केले. याची कारणमीमांसा केली असता असे लक्षात आले की आंध्र प्रदेशातले मतदार एन. टी. रामाराव यांना मत देताना आपण रामाला मतदान करत आहोत असे समजत होते. कारण रामाराव यांनी चित्रपटात प्रदीर्घ काळ रामाची भूमिका केलेली होती. आंध्रातल्या जनतेला पडद्यावरचा राम आणि प्रत्यक्ष जीवनातले रामाराव यात फरक करता आला नाही. आपल्या देशात काही निवडणुका पार पडल्या की काही राजकीय विश्‍लेषक भारतीय जनतेच्या सामूहिक जबाबदारीच्या भावनेचे मोठे कौतुक करतात. परंतु काही वेळा या कौतुकाला ही जनता पात्र आहे का असा प्रश्‍न पडल्याविना राहत नाही.

मतदार काय की राजकीय कार्यकर्ते काय खरोखरच आपले मतदान ठरवताना किंवा आपल्या कामाचा राजकीय पक्ष ठरवताना खरोखरच काय विचार करतात हा एक संशोधनाचा विषय आहे. तो आपल्या देशाच्या लोकशाहीशी निगडित असल्यामुळे गंभीरसुध्दा आहे. राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीचे विश्‍लेषण करताना दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी याबाबत काही विचार मांडले होेते. ते आज आठवतात. राज ठाकरे असोत की विविध प्रादेशिक पक्षांचे काम करणारे कार्यकर्ते असोत आपल्या राजकीय प्रवासाची दिशा ठरवताना आधी देशाच्या सगळ्या समस्यांचा नीट विचार करतात का? असा सवाल शरद जोशी यांनी केला होता. प्रत्येक कार्यकर्ता विशिष्ट संस्कारातून पुढे आलेला असतो आणि त्या संस्कारातून त्याचा भावनिक कल निश्‍चित झालेला असतो. तो त्या कलानुसार आपल्या राजकीय प्रवासाची दिशा ठरवतो. त्यात एखाद्याला राज्य महत्त्वाचे वाटते, एखाद्याला धर्म महत्त्वाचा वाटतो तर एखाद्याला एखादा नेताच धु्रवतार्‍यासारखा वाटतो. पण या सगळ्या प्रवृत्ती भावनिक आहेत. त्याऐवजी त्या वैचारिक आणि बौध्दिक असल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी आपली दिशा ठरवताना आपल्या समाजासमोरच्या खर्‍या समस्या कोणत्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या विचारांची गरज आहे. याचा समग्र अभ्यास केला पाहिजे. तरच देशाची राजकीय प्रगल्भता वाढणार आहे.

Leave a Comment