स्वामी नावाची पीडा

subramainam-swamy
भारताच्या राजकारणामध्ये फारसा जनाधार नसूनही राजकीय उलथापालथी घडवणारे काही बुध्दीमान लोक आहेत. उदाहरणादाखल काही नावे आठवतात. ऍड. राम जेठमलानी हा एक असा माणूस आहे. प्रशांत भूषण ह्याही एका माणसाचे नाव या संदर्भात घेता येईल. असा आणखी एक उपद्व्यापी माणूस म्हणजे सुब्रमण्यम स्वामी. ज्याने आज राजकारणामध्ये मोठी खळबळ माजवून दिली आहे. सोनिया गांधींची झोप त्यांनी उडवली आहे. त्यांची आणि सोनिया गांधींचे खरोखर काय वैर आहे हे बर्‍याच लोकांना माहीत नाही. परंतु त्याचा एक इतिहास आहे. गांधी घराण्याशी सुब्रमण्यम स्वामी यांचे बरे आणि वाईट असे ३० वर्षांपेक्षाही अधिक काळाचे संबंध आहेत. ते काही काळ गांधी घराण्याच्या जवळही होते पण बराच मोठा काळ ते या घराण्याच्या विरोधातही होते. मात्र सर्वसाधारणपणे सुब्रमण्यम स्वामी हे गांधी घराण्याला त्रस्त करण्यासाठी आणि त्याला धडा शिकवून त्यांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आता हेरॉल्ड प्रकरण उपस्थित केले आहे. डॉ. स्वामी आणि सोनिया गांधी यांचे खरे तर मोठे घनिष्ट संबंध आहेत. एकेकाळी सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी यांना मदत सुध्दा केली हेाती. पण आज मात्र डॉ. स्वामी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना पूर्ण बरबाद करण्यासाठी कंबर कसली आहे. याचे कारण काय आहे याची बर्‍याच लोकांना माहिती नाही. पण हा तीन पिढ्यांपासून सुरू असलेला संघर्ष आहे. या संघर्षाची बीजे १९७० च्या दशकापर्यंत जातात. डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे दिल्ली आयआयटीमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. परंतु त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर एक पुस्तक लिहिले. ते पुस्तक इंदिरा गांधींना फार झोंबले आणि त्यांनी सुब्रमण्यम स्वामी यांना नोकरीतून काढायला लावले. तेव्हा स्वामी चिडले आणि त्यांनी इंदिरा गांधी यांना स्वस्थ बसू द्यायचे नाही असे ठरवले. इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी उठवावी यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणार्‍यांमध्ये डॉ. स्वामी आघाडीवर होते. इंदिरा गांधी हयात असेपर्यंत त्यांचे हे वैर जारी राहिले. मात्र इंदिरा गांधींच्या निधनानंतर सुब्रमण्यम स्वामी राजीव गांधींचे मात्र मित्र झाले आणि त्यातूनच त्यांचे सोनिया गांधी यांच्याशीही बोलणेचालणे सुरू झाले. राजीव गांधी यांच्या प्रभावानंतर सत्तेवर आलेले विश्‍वनाथ प्रतापसिंग यांचे सरकार पाडण्यात सुब्रमण्यम स्वामी आघाडीवर होते. त्यानंतर बर्‍याच राजकीय उलथापालथी होऊन १९९८ साली वाजपेयी सरकार सत्तेवर आले.

त्या सरकारमध्ये आपल्याला अर्थमंत्री केले जावे अशी सुब्रमण्यम स्वामी यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु वाजपेयी त्यांना अनुकूल नव्हते. त्यामुळे स्वामी यांनी जयललिता यांना गळ घातली. आपल्याला अर्थमंत्री करण्याच्या अटीवरच जयललिता यांनी वाजपेयी यांना पाठिंबा द्यावा असा हट्ट स्वामींनी धरला. पण तेवढा हट्टीपणा जयललिता यांनी केला नाही. त्यामुळे स्वामी खट्टू झाले. वाजपेयी सरकार सत्तेवर येऊन १ वर्षही झाले नाही तोच जयललितांनी ते सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. सोनिया गांधींनासुध्दा वाजपेयी सरकार पाडायचे होते. त्यामुळे त्यांनी आधी जयललितांशी हातमिळवणी केली. जयललितांचे २७ खासदार संसदेत होते आणि वाजपेयी यांचे सरकार काठावर बहुमतात होते. तेव्हा जयललितांनी पाठिंबा काढून घेतला की हे सरकार पडते. हे सोनिया गांधींच्या लक्षात आले आणि त्यांना जयललितांशी मैत्री करण्याची गरज वाटू लागली. अर्थात हे काम करणारा एखादा उपद्व्यापी मध्यस्थ त्यांना हवा होता. तसा मध्यस्थ म्हणजे सुब्रमण्यम स्वामी. स्वामींच्या जुन्या ओळखीची सोनियांना आठवण झाली. खुद्द स्वामीसुध्दा वाजपेयीवर नाराज होतेच. त्यामुळे त्यांनी जयललिता आणि सोनिया गांधी यांची मोट बांधली. वाजपेयी सरकार पडले.

आज सुब्रमण्यम स्वामी भाजपामध्ये आहेत. परंतु ९८ साली त्यांनी भाजपाचेच सरकार पाडण्यासाठी जयललिता आणि सोनिया गांधी यांना मदत केली होती. दिल्लीतले राजकारण कसे चालते याचा हा एक नमुनाच होय. १९९९ साली सोनिया गांधींचे मित्र असलेले स्वामी आता त्यांच्यावर का उलटले हा प्रश्‍न सर्वांना पडला असेलच. यमुना नदीच्या पुलाखालून गेल्या दहा वर्षात बरेच पाणी वाहून गेले आहे आणि स्वामी आता सोनिया गांधींना बरबाद करण्यास प्रयत्नशील आहेत. ही वैराची ठिणगी ९९ सालीच पडली. वाजपेयी सरकार पाडण्याचा निर्णय झाला तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याला एका अटीवर सहकार्य केले होते. वाजपेयी सरकार पडले तर सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायचे नाही अशी स्वामींची अट होती. पण सोनिया गांधींनी ती अट मोडली आणि पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही पण सुब्रमण्यम स्वामी चिडले आणि तेव्हापासून ते सोनिया गांधींच्या मागे हात धुवून लागले आहेत. आजवर स्वामींनी सोनिया गांधींची चार प्रकरणे बाहेर काढली. त्या सर्वात स्वामींना यश आले नाही पण टूजी स्पेक्ट्रम आणि नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ते सोनिया गांधींना बर्‍यापैकी चिमटीत पकडू शकले. सोनिया गांधी भारतातल्या पुराण वस्तूंची तस्करी करतात अशा एका आरोपावर संशोधन सुरू आहेच. शिवाय राहुल गांधींनी स्वतःला ब्रिटीश नागरिक जाहीर केले आहे. असेही एक प्रकरण आहे. एक गोष्ट खरी की सुब्रमण्यम स्वामींना एक ना एक दिवस देशाचा अर्थमंत्री व्हायचे आहे. त्याच्या आड जो येईल तो त्यांचा शत्रू होतो. सोनिया गांधी तशाच शत्रू झालेल्या आहेत. पण एक गोष्ट खरी की त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवणे सोपे आहे म्हणून स्वामी त्या मार्गाने त्यांना धडा शिकवायचा प्रयत्न करत आहेत. जयललितांना तर त्यांनी जेलमध्ये पाठवलेलेच आहे.