रोजगाराच्या नव्या वर्षात मुबलक संधी

vacancy
नवी दिल्ली : रोजगार क्षेत्राला नवीन वर्षात अच्छे दिन येणार असून तरुणांना रोजगाराच्या, नोकरीच्या मुबलक संधी उपलब्ध होण्याची शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने यंदा केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि ई कॉमर्स क्षेत्रांवर भिस्त असेल, असा दावाही या तज्ज्ञांनी केला आहे.

सरकारी कर्मचा-यांचे वेतन सातव्या वेतन आयोगामुळे मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने खाजगी क्षेत्रात एकंदरीत असंतोष आहे. परंतु या वेतनवाढीचा अप्रत्यक्ष दबाव खाजगी क्षेत्रावरही वाढेल आणि याचा परिणाम म्हणून खाजगी क्षेत्राकडूनही वेतनवाढ दिली जाईल, असाही तज्ज्ञांचा कयास आहे.
यावर्षी कंपन्यांनी १० ते १२ टक्के सरासरी वेतनवाढ दिली आहे. त्याचप्रमाणे पदोन्नतीचे प्रमाणही यंदा २५ टक्के आहे. मात्र यात आगामी वर्षात वाढ होत सर्वच क्षेत्रांत सरासरी १२ ते १५ टक्के वेतनवाढ दिसून येईल, तसेच पदोन्नतीचे प्रमाणही पूर्वीपेक्षा ५ टक्क्यांने अधिक म्हणजे एकून ३० टक्के झाल्याचे दिसून येईल, असा दावा तज्ज्ञांनी अभ्यासाअंती केला आहे.

ई-कॉमर्स आणि इंटरनेट क्षेत्रात मुबलक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांनी नव्या नोकरभरतीसाठी पुढील वर्ष राखून ठेवल्याचेही दिसत आहे. विशेषतः ई-कॉमर्स आणि इंटरनेटवर आधारित व्यवसाय क्षेत्रांतून नवी नोकरभरती मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चालू वर्षी नवीन रोजगार निर्मिती करण्यात अभियांत्रिकी क्षेत्र आघाडीवर राहिले.

याच क्षेत्रासाठी आगामी वर्षही आशादायी असेल. एकूण कंपन्यांपैकी ८८ टक्के कंपन्यांनी नवे कर्मचारी भरती करण्याचे योजिले आहे, तर मेक इन इंडिया मोहिमेतून निर्मिती तसेच ऑटोमेशन या क्षेत्रांनाही सुगीचे दिवस येणार आहेत. त्यासाठी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा आधार घेत देशात १०० स्मार्ट शहरांच्या निर्मिती प्रक्रियेमुळे विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणावर पुढील वर्षी रोजगार निर्माण होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डिजिटल इंडिया व स्मार्ट सिटी या योजनांमुळे देशातील विकसनशील शहरात अशी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Leave a Comment