राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे

combo
भारतीय जनता पार्टीला पीडणार्‍या लोकांमध्ये राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे हे आघाडीवर आहेत. परंतु या दोघांमध्ये काही साम्ये आहेत असे आता दिसायला लागले आहे. त्यातले एक साम्य म्हणजे फार सारासार विचार न करता आणि अभ्यास न करता सरकारच्या विरोधात काही तरी बोलत राहणे. भाजपाचे सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आपल्यामागे हात धुवून लागले आहेत असा देखावा राहुल गांधी सतत उभा करत आहेत. मात्र त्यासाठी आपण कोणत्या पातळीला जावे हे काही त्यांच्या लक्षात येत नाही. असा आरोप करताना आपण हास्यास्पद ठरत आहोत याचेही भान त्यांना नाही. आसाममधल्या एका मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या महिलांनी आपल्याला दारावर अडवले हा राहुल गांधींचा आरोप असाच बालिशपणाचा ठरला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिला नसतात याचाही त्यांनी विचार केलेला नाही. मुळात त्यांना या मंदिरात अडवण्याचा प्रकार मुळातच घडलेला नाही. हे आता उघड झाले आहे. राहुल गांधींना मंदिरात जाण्यास प्रतिबंध करण्याचे तसे कसलेच कारण नाही आणि तशी शक्यताही नाही. राहुल गांधींनी हा आरोप करून लोकांच्या चेष्टेला एक विषय उपस्थित करून दिला एवढे मात्र खरे. उध्दव ठाकरे यांचाही स्मार्ट सिटीला असलेला विरोध असाच आहे. स्मार्ट सिटी योजनेचा त्यांनी साधासुध्दा अभ्यास केलेला नाही. परंतु स्मार्ट सिटी म्हणजे मुंबईमध्ये नवे माफिया निर्माण करण्याचे कारस्थान आहे असा आरोप त्यांनी ठोकून दिला. तसाच आरोप राज ठाकरे यांनीसुध्दा केला होता. परंतु त्यांचा स्मार्ट सिटीला असलेला विरोध चोवीस ताससुध्दा टिकला नाही. उध्दव ठाकरे यांनी मात्र स्मार्ट सिटी योजनेमुळे मुंबईचे नुकसान होणार आहे अशी आवई उठवली.

मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिले तेव्हा उध्दव ठाकरे यांना स्मार्ट सिटी योजनेविषयी अगदी सामान्यशीसुध्दा माहिती नाही हे दिसून आले. उध्दव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि ते सरकारच्या विरुध्द विधाने करताना मोठी कडक भाषा वापरतात. पण कडक भाषा म्हणजे विद्वत्ता नव्हे आणि व्यासंगही नव्हे. कडक भाषेमध्ये फारतर भाषेचे ज्ञान प्रकट होते मात्र त्या मुद्यावरून सरकारला कडक भाषेत विरोध करत आहोत त्या मुद्याविषयीचे अज्ञान दिसून येते. किंबहुना मुद्याचे ज्ञान झाकण्यासाठीच कडक भाषेचे आवरण घातलेले असते. त्यांनी स्मार्ट सिटी योजनेला विरोध केला खरा पण तो तर्कशुध्द नसल्यामुळे पुढचे दोनचार दिवससुध्दा तो टिकणार नाही. त्यांनी असे आरोप केले की वृत्तपत्रामध्ये मोठ्या बातम्या येतात खर्‍या पण तो विरोध चारदोन दिवससुध्दा टिकत नाही कारण तो तर्कशुध्द नसतो.

Leave a Comment