प्रश्‍न सुटू शकतो

melghat
मेळघाटातील आदिवासी बालकांचे कुपोषणामुळे आणि किरकोळ आजारामुळे होणारे मृत्यू हा एक मोठा सामाजिक प्रश्‍न आहे आणि गेल्या २०-२५ वर्षांपासून त्यावर बरीच चर्चा सुरू आहे. परंतु चर्चेपेक्षा अधिक काहीच होताना दिसत नव्हते. आता मात्र या भागातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटले असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ एवढी गंभीर सामाजिक समस्या कधी ना कधी तरी सुटण्याचा मार्ग दिसू शकतो. या प्रश्‍नात नेमके काय झाले? आपल्या देशातल्या अनेक सामाजिक प्रश्‍नांचे मूळ अज्ञानात असते. आदिवासी भागांत आता शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. मूल आजारी पडल्यास त्यावर झाडपाल्याचे अशास्त्रीय उपाय न योजिता त्याला डॉक्टरकडे नेले पाहिजे हे आता तिथल्या लोकांना समजायला लागले आहे.

आधीच या भागात डॉक्टर पाहिजे त्या प्रमाणात नाहीत आणि सरकारी दवाखान्यांची अवस्था फारच वाईट आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या न्यायाने लोकांच्या मनात आधीच डॉक्टरपेक्षा वैदूवर जास्त विश्‍वास आणि त्यातच दवाखाने वाईट अवस्थेत त्यामुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होती. वैदू मंडळी आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी लोकांना डॉक्टरकडे जाण्यापासून परावृत्त करत होते. या उपरही एखादा आदिवासी मुलाला घेऊन डॉक्टरकडे गेलाच तर त्याच्यावर दबाव आणून त्याला आपल्याकडे आणण्यास भाग पाडत होते. शेवटी का होईना परंतु ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आली आणि वैदूंवर काही उपाय योजला तर समस्येवर मार्ग निघू शकेल हे लक्षात आले.

त्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना यशही आले आहे आणि या वर्षी कुपोषणाने आणि विविध आजारांनी मरणार्‍या मुलांची संख्या घटली आहे. अजूनही हा प्रश्‍न पूर्ण सुटला आहे असे म्हणता येत नाही. परंतु बालमृत्युचे प्रमाण २३५ वरून १८० वर येणे हे सुध्दा स्वागतार्ह आहे आणि याच दिशेने प्रयत्न केल्यास मार्ग निघू शकेल अशी आशा वाढवणारे आहे. या उपाययोजनेमध्ये वैदूंशी संघर्ष करण्याऐवजी त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर देण्यात आला. शेवटी आदिवासींचे अज्ञान हेच त्यांचे भांडवल होते आणि त्यांच्या उपजीविकेचेही साधनही होते. तेव्हा त्यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा त्यांना जीविकेचे पर्यायी साधन उपलब्ध करून देणे हे आवश्यक असल्याचे लक्षात आले. सरकारने त्यांना विविध सामाजिक योजनांखाली मानधन द्यायला सुरूवात केली आणि बघता बघता आदिवासींच्या भोवती पडलेला वेढा बराचसा शिथिल होण्याचा मार्ग मोकळा झाला. मुलाला आजारी पडल्यानंतर दवाखान्यात नेणार्‍या आदिवासींवर आता वैदूंचा दबाव राहिला नाही आणि त्याची फळे मिळायला लागली. उशिराने का होईना परंतु हा उपाय सापडला.

Leave a Comment