किडनी चोरीचे रॅकेट

kidney
केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेसह अनेक प्रगत देशामध्ये अवयव दानाचे चोरटे रॅकेट सातत्याने कार्यरत असते. कारण थोड्याबहुत पैशाच्या आशेने किडनीसारखा आपला अवयव देण्यास उद्युक्त झालेले गरीब लोकही या जगात आहेत आणि त्यांना पैशाची लालूच दाखवून त्यांची किडनी काढून घेणारे गरजू लोकही जगात आहेत. जोपर्यंत हे दोन्ही घटक कार्यरत आहेत तोपर्यंत किडनी चोरीचे रॅकेट या जगात जारी राहणार आहे. देणारा राजी आहे, घेणारा राजी आहे तेव्हा चोरीचा प्रकार उघड होण्याची शक्यताच नाही. एखादा माणूस मरतो तेव्हा तो मरण पावला असला तरी त्याच्या शरीरातले काही अवयव विशेषतः डोळे, किडनी, यकृत असे आठ अवयव काढून ते जिवंत व्यक्तीला बसवता येतात. माणसाने कितीही शास्त्रीय प्रगती केलेली असली तरी माणसाच्या अवयवासारखे अवयव आणि रक्तासारखे रक्त प्रयोग शाळेत तयार करण्यात त्यांना यश आलेले नाही. निसर्गाने हा अधिकार आपल्या हातात ठेवलेला आहे. म्हणून एखाद्या माणसाचे आयुष्य एखादा अवयव निकामी झाल्यामुळे बरबाद होण्याची वेळ येते तेव्हा त्याचे जीवन सुखकर व्हावे म्हणून त्याच्या शरीरात तो अवयव रोपित करावा लागतो.

असा अवयव मिळाल्याने आजारी व्यक्तीला जीवदान मिळते. विशेषतः अशी वेळ धनिक लोकांवर आली की ते कोणाचा तरी अवयव दानाच्या स्वरूपात मिळावा यासाठी प्रयत्न करायला लागतात आणि त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होतात. इथेच रॅकेट सुरू होते. या रॅकेटला कायद्याचे बंधनाने जोर येतो. कारण जी गोष्ट कायद्याने बंद केलेली असते तिथे भ्रष्टाचाराचा उगम होत असतो. आपल्या देशातला अवयव दानाविषयीचा कायदा असे सांगतो की, एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळावे म्हणून अवयव दान केले जात असेल तर ते अवयव दान पैसे घेऊन केलेले असता कामा नये. ते परोपकाराच्या भावनेने आणि खरोखरच सहानुभूतीने केले गेले पाहिजे. असे स्वेच्छा अवयव दान किडनीच्या बाबतीत करता येते. कारण माणसाच्या शरीरात दोन किडन्या असतात आणि त्यातली एक किडनी काढली तरी उरलेल्या एका किडनीवर तो चांगले जीवन जगू शकतो. या वस्तुस्थितीमुळे किडनी दानाच्या बाबतीत डॉक्टरांपासून एजंटांपर्यंत सगळे प्रयत्नशील असतात. मात्र आपला कायदा किडनी विकत घ्यायला परवानगी देत नाही. नात्यामध्ये, ओळखीमध्ये प्रेमापोटी किडनी दान केले गेले पाहिजे.

पैशासाठी नव्हे असे कायद्याचे म्हणणे आहे. पण खरोखर कोणी कोणासाठी असे किडनी दान करत नसते. पोटची मुलेसुध्दा आईवडिलांसाठी किडनी देत नाहीत. एखाद्या प्रकरणामध्ये पतीसाठी आपली किडनी द्यायला तयार होणारी पत्नी दिसते. मात्र ती किडनी मॅच झाली पाहिजे. एकंदरीत प्रेमापोटी होणारे दान फारच विरळ. त्यातच ती किडनी मॅच झाली नाही तर ते दानाचे दातृत्वसुध्दा वाया जाते. एकंदरीत आपल्या कायद्याचे हे बंधन जाचक ठरले आहे. त्यामुळे चोरून किडनी विकत घेतली जाते आणि ती तशी चोरून रुग्णाच्या शरीरात बसवली जाते. कारण किडनी दानास लोकांना प्रवृत्त करणारे काही एजंट आहेत ते काही रुग्णालयांसाठी काम करत असतात. गरीब आणि गरजू लोकांचा शोध घेत असतात. ते ज्यांच्यासाठी काम करतात ते रुग्णालय कोठेतरी चेन्नईमध्ये असते आणि एजंटांच्या जाळ्यात अडकणारे गरजू लोक देशाच्या कोणत्याही भागातले असू शकतात. तेव्हा चेन्नईमधल्या रुग्णाला किडनी देणारा दाता महाराष्ट्रातलाही असू शकतो. मग असा महाराष्ट्रातला दूरवरचा माणूस चेन्नईतल्या रुग्णाला प्रेम, परिचय आणि सहानुभूती यापोटी किडनी कशी देऊ शकतो? तो तसा देऊ शकत नाही म्हणूनच चोरून व्यवहार करावा लागतो आणि त्यातूनच एक मोठे रॅकेट जन्माला येते.

अशा रॅकेटमधूनच चेन्नईच्या झोपडपट्ट्यांमधील अनेक गरीब लोकांनी लाखो रुपयांचा मोबदला घेऊन आपली किडनी दिलेली आहे. असे लोक उघडपणे फिरतात, किडनी देताना केलेल्या शस्त्रक्रियेच्या खुणा त्यांच्या शरीरावर असतात परंतु प्रत्यक्षात झालेला आर्थिक व्यवहार गुप्त असतो कारण तो चोरून केलेला असतो. अशा प्रकारचे रॅकेटस् अनेक मोठ्या रुग्णालयांशी जोडले गेलेले आहेत आणि रुग्णालये देशाच्या विविध राज्यात आहेत. असे रॅकेटस् सतत कार्यरत असतात. अनेकांना फशी फाडून त्यांच्या किडन्या काढून घेतल्या जातात आणि त्यांना कबूल केलेली रक्कम न देता फसवलेही जाते. मात्र फसवल्या गेलेल्या एखाद्या व्यक्तीने रॅकेट उघड केले तर मात्र बभ्रा होतो. म्हणून आपण नेहमीच पाहतो की कधीतरी हरियाणातले असे रॅकेट उघड होते तर कधी हैदराबादचे रॅकेट प्रकाशात येते. रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणि त्यात दुखावल्या गेेलेल्या कोणीतरी तक्रार केली तरच रॅकेट उजेडात येते. आता महाराष्ट्रात तशी वेळ आली आहे. महाराष्ट्रातले अनेक शेतकरी शेतावर झालेले कर्ज अनावर झाल्यामुळे आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांना किडनी विकून पैसे मिळवण्याची युक्ती सुचवली तर ते आपल्या गळाला लागतील हे गेल्या काही दिवसांपासून या रॅकेटमधल्या एजंटांना लक्षात आले आहे आणि काही शेतकर्‍यांचे किडन्या काढून घेतल्याचे दिसून आले आहे. शेतकर्‍यांना कर्ज फेडीसाठी किडनी दान करावे लागावे ही दुर्दैवी स्थिती आहे.

Leave a Comment