मोदी विरोधकांचे पितळ उघडे

modi
भारतात गेल्या काही दिवसांपासून काही विशिष्ट विचारांचे लोक देशात असहिष्णुता पसरत चालल्याचा जाणीवपूर्वक अपप्रचार करत आहेत. या प्रचारामागे सत्य तर तीळमात्र नाही उलट नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याचे ज्यांना पचनी पडले नाही अशा लोकांचे हे कारस्थान आहे वरचेवर उघड होत चालले आहे. कारण मधल्या काळामध्ये या लोकांचा एकदमच उठाव झाला आणि आता त्यातले सत्य लोकांना समजायला लागल्यामुळे या लोकांची कारस्थान मंदावली आहेत. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून असहिष्णुता वाढत चालली आहे असा बोभाटा करून आपले राजकीय समाधान करून घेणार्‍या काही धंदेवाईक मोदी विरोधकांना गेल्या दोन दिवसात तीन मोठ्या चपराकी बसल्या आहेत. देशात असहिष्णुतेचे वातावरण नाही असा खुलासा भारतीय जनता पार्टीच्या किंवा संघ परिवाराच्या कोणा प्रवक्त्याने केला असता तर ती या कथित पुरोगाम्यांना चपराक कधीच ठरली नसती. परंतु या तीन चपराकी संघ परिवाराच्या बाहेरील मान्यवरांनी लगावलेल्या आहेत.

मुळात उत्तर प्रदेशातील दादरी येथे घरात गोमांस ठेवल्यामुळे एका मुस्लिमाची हत्या झाली या कथित घटनेपासून या पुरोगाम्यांची आरडाओरड सुरू झाली आहे. खरे म्हणजे अशा पध्दतीने भारताच्या खेड्यापाड्यातून दलितांना अनेक अत्याचार सहन करावे लागतात. त्याबाबत या पुरस्कार वापसीवाल्यांनी कधी शब्दही उच्चारला नाही किंवा त्यावरून पुरस्कार वापस दिले नाहीत. मात्र एका मुस्लिमाची हत्या होताच त्यांना एकदम पान्हा फुटला. यावरून हे सिध्द होते की हा सारा आटापिटा मुस्लीम मतांसाठी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासून मुस्लिमांच्या विरोधात एकही विधान केलेले नाही. उलट मुस्लीम समाजाची प्रगती व्हावी अशी पावले टाकली आहेत. तसे झाल्यास मुस्लीम समुदाय भाजपाच्या जवळ येईल आणि त्यावेळी आपल्या दुकानांचे काय होईल याची काळजी या मंडळींना लागली आहे. म्हणून भाजपा आणि मुस्लीम यातील अंतर वाढवत नेण्यावर या लोकांचा भर आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून दादरीच्या घटनेचे अतिरंजित वर्णन करून त्यावरून सार्‍या देशामध्ये हलकल्लोळ माजवायचे त्यांनी ठरवले आहे. पण आता या दादरीच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर आला असून याच अहवालात दादरीच्या घटनेचा गोमांसाशी काहीही संबंध नाही असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दादरी येथे झालेली या मुस्लिमाची हत्या हा पूर्व वैमनस्यातून झालेला खून आहे असे या चौकशीचे निष्कर्ष आहेत.

दादरीच्या प्रकरणाचा भरपूर बभ्रा करणार्‍या वाहिन्यांनी आणि पुरोगामी संघटनांनी या चौकशी अहवालाची चर्चा दडपून ठेवली आहे. कारण दादरी प्रकरणाचा आतिशयोक्त बभ्रा करण्याने जेवढा टीआरपी वाढतो तेवढा सत्य सांगितल्याने वाढत नाही हे त्यांच्या लक्षात आलेले आहे. एकंदरीत देशातली असहिष्णुता विषयक चर्चा ही टीआरपी वाढवण्यास टपलेल्या माध्यमांचे कारस्थान आहे. आता त्यांनी या निष्कर्षाला प्रसिध्दी दिली नसली तरी त्यामुळे असहिष्णुतेचा बभ्रा करणार्‍या ढोंगी लोकांचे पितळ मात्र उघडे पडले आहे. या असहिष्णुतावाल्यांना यापेक्षा मोठी चपराक बसली आहे ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. टी. एस. ठाकूर यांच्यामुळे. न्या. ठाकूर यांनी असहिष्णुतेची चर्चा ही राजकीय स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे आणि त्यांचे हे म्हणणे खरे आहे. कारण बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून एकाही पुरस्कार वापसीवाल्याने पुरस्कारही परत केलेला नाही आणि असहिष्णुतेवर चर्चाही केलेली नाही. त्यामुळे देशातली असहिष्णुतेची चर्चा ही राजकारण प्रेरित आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच केली जात आहे हे उघड झालेले आहेच पण त्याला आता देशाच्या सरन्यायाधीशांनीही दुजोरा दिलेला अाहे.

असहिष्णुतेचे वाढते प्रकार म्हणून ज्या घटनांचा उल्लेख केला जात आहे ते सगळे प्रकार म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे साधे प्रकार आहेत आणि त्यांचा बंदोबस्त करण्यास सर्वोच्च न्यायालय समर्थ आहे असेही सरन्यायाधीशांनी बजावले आहे. याउपरही कोणा विचारवंताला देशात असहिष्णुता वाढत चालली असल्याचे वाटतच असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन तसे सिध्द करून द्यावे. एका बाजूला अशा दोन चपराकी बसल्या असताना नामवंत उद्योगपती रतन टाटा यांनीही देशात सहिष्णुता ही ओतप्रोत भरून असल्याचे म्हटले आहे. भारतात सर्व धर्माचे लोक प्रदीर्घकाळापासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि नांदत राहतील असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. देशातली असहिष्णुता ही अस्तित्वात नसताना तसा बभ्रा तर केला जात आहेच परंतु त्याच्या नावावर वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोक करत आहेत. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जाहीर गोमांस भक्षण परिषद भरवली जाणार आहे. गोमांसावरून हिंदूंच्या भावना या नाजूक आहेत हे सर्वांना माहीतच आहे. मग ते माहीत असतानासुध्दा मुद्दाम गोमांस भक्षणाचे जाहीर कार्यक्रम करून या लोकांना काय साधायचे आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्याला गोमांस आवडत असेल त्यांनी त्याचे भक्षण करावे, त्याचे समर्थ करावे हे ठीक आहे किंबहुनात तो आपला हक्क आहे असे न्यायालयापुढे सांगावे आणि गोहत्या बंदी कायदा कसा झूठ आहे हे सिध्द करून द्यावे. लोकशाहीचा हा एक भागच आहे. परंतु त्याऐवजी गोमांस भक्षणाचे जाहीर कार्यक्रम करून हिंदूंच्या भावना डिवचणे हा समाजात फूट पाडण्याचाच प्रकार आहे. असा कार्यक्रम केला की हिंदू चिडतात आणि त्यांच्या भावना प्रक्षुब्ध होऊन समाजात अशांतता निर्माण होते. हे लोकांना माहीत आहे. किंबहुना त्याचसाठी त्यांचा प्रयास चाललेला आहे.

Leave a Comment