भुतांच्या जत्रेचे गांव

mela
भारताचा ग्रामीण भाग म्हणजे वर्षातून एकदोन वेळा तरी भरणार्‍या जत्रांचे आगार. देवीदेवतांचे उत्सव, नवीन धान्य येण्याचे दिवस हे जत्रांचे दिवस असतात. पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणीही चतुःश्रुंगीची जत्रा आजही भरते. भारतात अनेक ठिकाणी देवांच्या जत्रांबरोबर पशु जत्राही भरतात. गाढवे, बैल, उंट, घोडे अशा प्राण्यांच्या खरेदीविक्रीसाठीही जत्रा भरतात. उत्तरप्रदेशातील मिर्जापूर येथील बरही गावातील बेचूबीरच्या समाधीपाशी भरणारी जत्रा मात्र या सार्‍यांहून खूपच वेगळी आहे. कारण येथे भूतांची जत्रा भरते.

भूते, हडळी, समंध, जाखिणी ,चेटक्या या जमातीचा भारतीयांवरचा पगडा फारच मोठा आहे. या अंधविश्वासातूनच ही जत्रा येथे भरते. या जत्रेत भूतप्रेताची बाधा झालेल्या व्यक्तींना त्यापासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. बेचूबीर बाबा असल्या बाधांपासून लोकांना मुक्त करतात असा विश्वास आहे. ही जत्रा पोलिसांच्या डोळ्यादेखतच भरते आणि गेली साडेतीनशे वर्षे ती भरते आहे.

या जत्रेसाठी देशभरातून दूरदूरहून लोक येतात. भूताची बाधा झालेले येथे येऊन बेचूबीरबाबासमोर फिर्याद देतात आणि बाबा त्यांना त्रासापासून मुक्ती देतात. बेचूबाबांचे वंशज या समाधीची देखभाल करतात. येथे भूतबाधा झालेल्यांबरोबरच निपुत्रिक जोडपीही अपत्य व्हावे म्हणून समाधीला नवस बोलतात आणि नवस फेडण्यासाठी येणार्‍यांची संख्याही येथे मोठी असते असे सांगितले जाते.

Leave a Comment