नियम पाळलाच पाहिजे

rules
आपण दरवर्षी विविध यात्रांच्या बातम्या वाचताना चेंगराचेंगरी झाल्याचे वाचत असतो. धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणी गर्दी करणारे लोक बरेच बेशिस्तपणे वागतात आणि त्याचे परिणाम म्हणून अनेकांचे जीव जातात. त्यांना शिस्त लावण्यासाठी काहीतरी नियोजन केले पाहिजे, असे म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात तशी शिस्त लावताना प्रशासनाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रशासन आणि यात्रा भरवणार्‍या खासगी संस्था यांच्यात संघर्ष होतो. असा प्रकार सध्या सोलापुरात सुरू आहे. सोलापूरच्या सिध्दरामेश्‍वरांची यात्रा ही महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा आहे. तिला महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील लाखो लोक येत असतात. गेल्या ९०० वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. यात्रा कमिटी आणि मंदिर समिती यांच्याकडून या यात्रेचे आणि यात्रेतील सर्व व्यापारी गाळ्यांचे नियंत्रण केले जाते. हिंदू धर्मातील कोणत्याही यात्रेमध्ये हौसे, गवसे आणि नवसे अशा तिघांची गर्दी होतच असते. या तिन्हीवर लक्ष ठेवून यात्रांचे नियोजन नीट केले नाही तर एखादी अघटित घटना घडू शकते. मात्र अशी अघटित घटना टळावी यासाठी मंदिर समित्या आणि यात्रा कमिट्या काय करतात हा संशोधनाचाच विषय असतो.

परंपरेने यात्रेचे नियोजन करणार्‍या या गैर सरकारी यंंत्रणा यात्रेच्या नियोजनाचा फार बारकाईने विचार करत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी गैरप्रकार घडतात. आपण दरवर्षी यात्रेच्या ठिकाणी झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात होणारे अनेकांचे मृत्यू यांच्या बातम्या वाचत असतो. यात्रा आणि उत्सवांचे नीट नियोजन न करणे आणि गर्दीच्या नियंत्रणाची कसली योजना न आखणे यामुळे असे प्रकार घडत असतात. असे प्रकार घडून गेले मोठा आरडाओरडा होतो आणि मोठी टीकेची झोड उठवली जाते. यात्रांना एवढी मोठी गर्दी जमते पण सरकार त्या गर्दीच्या नियोजनासाठी काय उपाययोजना करते असा प्रश्‍न विचारून सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते आणि सरकारने यात्रांच्या नियोजनासाठी काहीतरी उपाययोजावेत असे मोठे मानभावी सल्ले दिले जातात. वास्तविक पाहता असे सल्ले देणारे लोक आणि पत्रपंडित यांना यात्रेच्या नियोजनाची कसलीही माहिती नसते. खरे म्हणजे यात्रांच्या नियोजनाविषयी खूप नियम आहेत. यात्रा म्हणजे एक जमावच असतो आणि जमावाच्या साक्षीने तसेच सहभागाने यात्रेत विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे होत असतात. एरवी यात्रेच्या बाहेर अधिक लोकांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. तशीच यात्रेलाही आवश्यक असते. परंतु बहुतेक यात्रा कमिट्या पोलिसांच्या अशा परवानग्या घेण्याची काळजी घेत नाहीत.

आपली यात्रा परंपरेने चालत आलेली आहे आणि ती धार्मिक महत्त्वाची आहे या बहाण्याने हे लोक परवानगी घेण्याची टाळाटाळ करतात. हजारो यात्रा भरतात त्यातल्या काही यात्रांमध्ये अघटित प्रकार घडतात. बहुतेक यात्रा सुखरूपच पार पडत असतात. तेव्हा यात्रा भरवणार्‍यांच्या मागे सगळ्या परवानग्यांचा काच कशाला लावायचा म्हणून प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करते. प्रशासनाचे हे दुर्लक्ष मोठे घातक असते. कारण बहुतेक यात्रा सुरळीत होतात याचा अर्थ उपाययोजना करू नयेत असा होत नाही. पण वर्षानुवर्षे यात्रा कमिट्यांची बेपर्वाई आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या दोन्ही गोष्टी यथास्थित सुरू आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ही बेपर्वाईची परंपरा मोडण्याचा निर्णय घेतला आहे. ९०० वर्षांपासून सोलापुरात भरवल्या जाणार्‍या सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेचे नियोजन काय आहे, असा प्रश्‍न त्यांनी यात्रा कमिटीला विचारला आहे. यात्रेत काही अघटित घडू नये यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, अशीही विचारणा करून त्यांनी यात्रा कमिटीला कायदा दाखवला आहे.

वर्षानुवर्षे प्रशासनाचा असा कसलाही हस्तक्षेप न होता यात्रा भरवण्याची सवय असल्यामुळे यात्रा कमिटीला तुकाराम मुंढे यांचा हा हस्तक्षेप अपमानास्पद वाटायला लागला आहे आणि त्यांनी यात्रा नियोजनाच्याबाबतीत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करताना थोडासा नकारात्मक सूर लावला आहे. ९०० वर्षात कधीच दुर्घटना घडली नाही मग नियमांचा आग्रह कशाला, असा यात्रा कमिटीचा सवाल आहे. या सवालामध्ये तर्कशुध्दता नाही. कारण ज्या यात्रांच्या ठिकाणी गैरप्रकार घडतात तिथेही वर्षानुवर्षे काही अघटित घडलेले नसतेच. परंतु आता लोकसंख्या वाढली आहे. यात्रेतले व्यापार वाढले आहेत त्यामुळे कोणत्याही यात्रेत कधीही काहीही घडण्याची संभावना आहे. तेव्हा ९०० वर्षे काही घडले नाही म्हणून आता आम्हाल नियम दाखवू नका असे म्हणणे बरोबर नाही. जिल्हाधिकार्‍यांनी नियम दाखवला की यात्रा कमिटीला वाईट वाटते. परंतु कायद्याने बोलायचे झाल्यास यात्रा कमिटीला निरुत्तर व्हावे लागते. आपल्या देशामध्ये लोकांना कायदे पाळणे हे नेहमीच अपमानास्पद वाटते. त्यामुळे कोणी कायदा दाखवायला लागला की त्याची हेटाळणी केली जाते आणि तो कायद्यावर बोट ठेवत आहे अशी हेटाळणीयुक्त भाषा वापरली जाते. वास्तविक कायद्यावर बोट ठेवणे हे आवश्यकच असते. कोणी कायद्यावर बोट ठेवायला लागला की त्याची हेटाळणी करायची आणि काही अघटित प्रकार घडला की प्रशासनावर टीका करायची अशी दुहेरी भाषा आपण वापरत असतो. तेव्हा कायद्यावर बोट ठेवणे ही काहीतरी वाईट गोष्ट आहे ही लोकांची कल्पना बदलली पाहिजे. सोलापूरच्या सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटी आणि जिल्हाधिकारी यांच्यात सुरू असलेली ओढाताण ही प्रातिनिधिक आहे. देशात सर्वत्र असे प्रकार सुरू असतात.

Leave a Comment